Top 15 News: ‘उबाठा खरे व्होट दरोडेखोर’, विजयादशमीला PM मोदींकडून देशातील ३ शत्रूंचा उल्लेख आणि सलमान खान घेणार ‘बिग बॉस २०’मधून ब्रेक, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.

‘उबाठा खरे व्होट दरोडेखोर’;
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Top 15 News: मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला बहुमत असतानाही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याचा उल्लेख करत त्यांनी ठाकरेंना ‘व्होट दरोडेखोर’ म्हटले. शेतकऱ्यांना मदत केल्याचा दावा करत विरोधकांना त्यांनी सवालही केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरील वक्तव्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, भाषणानंतर व्यासपीठावरील माईकच्या व्यवस्थेवरून शिंदेंनी आयोजकांची नाराजी व्यक्त केली.
‘१३ कोटी मतदारांची नावं कमी केली’;
उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी मदत, कायदा-सुव्यवस्था आणि मतदार यादीतील कथित घोळावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘१३ कोटी मतदारांची नावं कमी केली,’ असा आरोप करत त्यांनी सत्तापरिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला. टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तिरंगा आणि आंदोलनातील सभ्यतेवरून सवाल केले. झेन-जी आंदोलकांचे समर्थन करत त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही केली.
‘आधी भांडुप जिंका, मग देश जिंकायच्या गोष्टी करा’;
चित्रा वाघांचा संजय राऊतांवर पलटवार
शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातील टीकेला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. मतदार यादीतील गडबडीच्या आरोपांवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचाही वाघ यांनी समाचार घेतला. ‘आधी भांडुप जिंका, मग देश जिंकायच्या गोष्टी करा,’ असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. तसेच, स्वतःचा पक्ष आणि आमदार सांभाळता आले नाहीत, त्यांनी सत्तांतराच्या गप्पा मारू नयेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही टीका केली.
‘शेतकरी बांधावर मरतोय, पोरगं शहरात’;
सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात
शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकरी संकट, पेपरफुटी आणि चारा छावण्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘आमची जगण्या-मरण्याची झुंज, तर शिंदे-फडणवीसांची खुर्चीसाठी झुंज सुरू आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. तसेच, ६०० पीएसआय भरतीत पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला. लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या कारवायांवरून गृहमंत्री फडणवीसांना सवाल करत, ‘बिष्णोई गँग तुम्हाला आव्हान देत आहे, तुम्ही काय केलं?’ अशी विचारणा त्यांनी केली.
‘जरांगेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही’;
रामदास कदमांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपाला शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले. ‘बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख,’ असा इशारा त्यांनी दिला. जरांगे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही कदम यांनी केली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शिंदे यांनी १० टक्के आरक्षण दिल्याचा दावा करत त्यांनी जरांगेंवर निशाणा साधला. तसेच, एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आणि मराठा समाजाचे दैवत असल्याचे सांगत, त्यांच्याविरोधातील आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही, असे कदम म्हणाले.
‘आमदार-खासदार फोडण्याचे रेटही वाढले’;
रोहित पवारांचा राज्य सरकारला टोला Top 15 News:
वाढती महागाई आणि राजकीय घोडेबाजारावरून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. बार्शीतील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोटारसायकलच्या किमतीची तुलना आमदार-खासदार फोडण्याच्या कथित दरांशी केली. ‘२०१२ मध्ये ५० हजार रुपयांना मिळणारी मोटारसायकल आता दीड लाखांवर गेली आहे. त्याचप्रमाणे आमदार फोडण्याचे दर २५ कोटींवरून ५० कोटींवर, तर खासदारांचे दर १०० कोटींवर गेले आहेत,’ असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याने सभेत हशा पिकला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.
दसरा मेळावा म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं व्यासपीठ’;
महेश सावंत यांची प्रतिक्रिया।
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे व्यासपीठ असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी म्हटले. मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याबाबत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे हेच आपले नेते असल्याचे सांगितले. महागाई, बेरोजगारी, एमपीएससी पेपरफुटी आणि मतदार यादीतील कथित गोंधळावरून त्यांनी सरकारवर टीका केली. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांवरही त्यांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न जाणून घेत असल्याचे सांगत, सरकारच्या मदतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होते, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला.
बारामतीत सतेज पाटलांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बारामती शहरातील काँग्रेस भवनासमोर काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरची परिसरात चर्चा सुरू आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सतेज पाटील यांचे अभिनंदनही या बॅनरवर करण्यात आले आहे. ‘मा. सतेज उर्फ बंटी पाटील – भावी मुख्यमंत्री’ असा मजकूर बॅनरवर असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
अकोल्यात चटणी-भाकर खाऊन शेतकऱ्यांचा दसरा;
कर्जमाफीसाठी अनोखं ठिय्या आंदोलन
अकोल्यात दसऱ्याच्या दिवशी शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कर्जमाफीची प्रकरणं प्रलंबित ठेवणं, नवीन पीककर्जासाठी जाचक अटी लावणं आणि सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचा निषेध करत शेतकऱ्यांनी चटणी-भाकर खाऊन दसरा साजरा केला. सेंट्रल बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयासह अग्रणी बँक अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार यांच्या नेतृत्वाखाली अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
‘रावण आमचे कुलदैवत’;
देवरीत आदिवासी बांधवांकडून रावणाची पूजा
देशभरात दसऱ्याला रावण दहन केले जात असताना, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कल सावटोला येथे आदिवासी बांधवांनी रावणाची पूजा-अर्चना केली. रावण हे आपले कुलदैवत असल्याची त्यांची श्रद्धा आहे. दरवर्षी परंपरेनुसार रावणाची पूजा केली जाते. समाजात जागृती वाढत असून, आगामी काळात रावण दहन रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका आदिवासी बांधवांनी मांडली. चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांतही रावणाची पूजा केली जात असल्याची माहिती समाजातील पुजाऱ्यांनी दिली. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहन आणि रावण पूजेच्या वेगवेगळ्या परंपरा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
विजयादशमीला PM मोदींचं मोठं विधान;
देशासमोरील ३ शत्रूंचा केला उल्लेख? Top 15 News:
विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचे महत्त्व अधोरेखित केले. रावण दहनानंतर बोलताना त्यांनी देशाची एकता, संस्कृती आणि सन्मान जपण्याचे आवाहन केले. रामलीला ही श्रीरामांचे आदर्श जिवंत ठेवणारी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. विजयादशमी हा अत्याचारावर मात आणि असत्यावर सत्याच्या विजयाचा संदेश देणारा सण असल्याचेही मोदी म्हणाले.
देशातील १३ राज्यांना पावसाचा इशारा;
ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि ईशान्येकडील काही राज्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रवाशांनी खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने सूचित केले आहे.
ट्रम्प यांना मोठा धक्का! लोकप्रियता ३१ टक्क्यांवर;
निवडणूक सर्वेक्षणात डेमोक्रॅट्स आघाडीवर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसल्याचे रॉयटर्स-इप्सोसच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ट्रम्प यांच्या कामगिरीला पसंती देणाऱ्यांचे प्रमाण ३१ टक्क्यांवर घसरले आहे. आगामी काँग्रेस निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला ४७ टक्के, तर रिपब्लिकन पक्षाला ३५ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि इराणविरुद्धच्या युद्धाबाबतची नाराजी ही ट्रम्प यांच्या लोकप्रियतेतील घसरणीमागील संभाव्य कारणे असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यावधी निवडणुका होणार असून, या निकालांचा ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळावर परिणाम होऊ शकतो.
भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय!
झिम्बाब्वेला ९२ धावांनी धूळ चारत रचला नवा विक्रम
रायपूर येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेचा ९२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मायदेशातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २१६ धावा केल्या. शेफाली वर्माने ६९, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने अवघ्या ४१ चेंडूंत नाबाद ९१ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला ७ बाद १२४ धावाच करता आल्या. भारताकडून नंदिनी शर्माने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
सलमान खान घेणार ‘बिग बॉस २०’मधून ब्रेक;
रोहित शेट्टी सांभाळणार ‘वीकेंड का वार’ची धुरा! Top 15 News:
‘बिग बॉस २०’च्या आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान दिसणार नाही. पूर्वनियोजित कामांमुळे पुढील आठवड्यात सूत्रसंचालन करू शकणार नसल्याचे सलमानने सांगितले. त्याच्या जागी चित्रपट निर्माता रोहित शेट्टी ही जबाबदारी सांभाळणार आहे. सलमानने स्वतः रोहितला सूत्रसंचालनाची विनंती केल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्कमुळे वातावरण तापले आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार आणि कॅप्टनपदाची बाजी कोण मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





