Top 15 News : ‘ऑपरेशन टायगर-4’ची तयारी?, मोदी आज मंत्र्यांची घेणार ‘क्लास’ आणि बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमिअर दणक्यात , वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी मोठा राजकीय दावा केला आहे.

‘ऑपरेशन टायगर-4’ची तयारी?
ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा
Top 15 News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात ‘ऑपरेशन टायगर-4’ होणार असून, ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि त्यानंतर नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावाही त्यांनी केला. ठाकरे गटाकडे विधानसभेत 20 आमदार असून, त्यापैकी 14 आमदारांनी पक्षांतर केल्यास राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, 14 आमदारांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षांतराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस;
प्रकृती खालावली, समर्थकांनी महामार्ग रोखला
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं उपोषण रविवारी नवव्या दिवशीही सुरू होतं. प्रकृती खालावल्याने आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीदरम्यान जरांगेंनी पाणी घेतलं आणि सलाईनही लावून घेतलं. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा पाणी आणि सलाईन बंद करत उपचार घेण्यास नकार दिला. दरम्यान, मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जरांगे समर्थकांनी वडीगोद्री येथील डाव्या कालव्याजवळ दोन वेळा रास्ता रोको केला. त्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक दिवसभरात सुमारे तीन तास विस्कळीत झाली. आंदोलनस्थळी समर्थकांची गर्दी वाढत आहे.
आमच्या तरुणांना DJ लागतोच आम्ही वाजवू देतो’;
DJ बंदीवर सुजय विखेंची स्पष्ट भूमिका
गणेशोत्सव आणि अन्य सणांमध्ये DJ बंदीवरून सुरू असलेल्या चर्चेवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थिती वेगळी असल्याचं त्यांनी म्हटलं. ग्रामीण भागात मोठ्या इमारती, रुग्णालयं आणि वाहतुकीच्या समस्या कमी असल्याने DJचा तितका त्रास होत नसल्याचं विखे म्हणाले. त्यामुळे ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करताना युवकांना DJ लागतो आणि आम्ही तो वाजवू देतो, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मात्र, शहरी भागात वाहतूक, इमारती आणि रुग्णालयांमुळे DJचा प्रश्न वेगळा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अमरावतीच्या दुर्घटनेला १४ दिवस उलटले;
चौकशी अहवाल कुठे? पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रतीक्षा
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागल्याच्या घटनेला १४ दिवस उलटले आहेत. २४ ऑगस्टच्या या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर शासनाने ११ सदस्यीय राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप अहवाल सार्वजनिक झालेला नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १ सप्टेंबरपर्यंत अहवाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सहा दिवस उलटूनही अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे पीडित कुटुंबांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दादा भुसेंच्या अधिकारांना कात्री?;
शिंदेंच्या आणखी एका मंत्र्याला धक्का
महायुती सरकारमध्ये अंतर्गत वादाची चर्चा पुन्हा रंगली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या काही महत्त्वाच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आला आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या अतिरिक्त तुकड्या आणि शाखांना मान्यता देणे, तसेच विविध मंडळांना NOC देण्याचे अधिकार आता सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे असतील. तर वर्गवाढीसाठी मान्यता देण्याचा अधिकार प्रधान सचिवांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय आपणच घेतल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे, विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री!
‘या’ 6 जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज Top 15 News :
महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने आज काही भागांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नंदूरबार, धुळे, नाशिक, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गणेश भक्तांसाठी मोठी खुशखबर!
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी २९०० बस
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेश भक्तांना बसच्या तिकिटांचं वाटप करण्यात आलं. यंदा गणेश भक्तांच्या प्रवासासाठी तब्बल २९०० बस उपलब्ध असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. गणेशोत्सवासाठी कुटुंबासह गावी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. अजूनही नागरिकांकडून नोंदणी सुरू असून, मागणीनुसार आणखी बस उपलब्ध करून दिल्या जातील, असं म्हस्के यांनी सांगितलं.
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा;
राजेश टोपेंची सरकारकडे मागणी
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. घनसावंगी मतदारसंघातील तनवाडी आणि भायगव्हाण परिसरात माजी मंत्री राजेश टोपे यांनी शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, तूर, मका, बाजरीसह मोसंबी, डाळिंब, पपई, केळी आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. चारा उपलब्ध नसल्याने पशुधन जगवणंही शेतकऱ्यांसाठी आव्हान बनलं आहे. त्यामुळे सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, नुकसानग्रस्त जमिनींचे पंचनामे करावेत आणि मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी टोपे यांनी केली.
‘आदित्य ठाकरे होमवर्क करत नाहीत;
मिहिर कोटेचांचा जोरदार टोला
आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मिहिर कोटेचा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत. पेट्रोल पंपासाठी भूखंड देण्याच्या मुद्द्यावर बोलताना कोटेचा यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “आदित्य ठाकरे होमवर्क करत नाहीत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते अशा पद्धतीने बोलतात,” असा टोला त्यांनी लगावला. पावणे दोन लाख लोकसंख्येसाठी पेट्रोल पंप नसल्याने मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने भूखंड उपलब्ध झाल्याचं कोटेचा यांनी सांगितलं. तसेच गोल्फ क्लबच्या जमिनीच्या मुद्द्यावरही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. “तुम्ही जमिनीवर नाही, त्यामुळे यावेळी फक्त आठ हजार मतांनी निवडून आला,” असंही ते म्हणाले.
राज्यात पावसाची दडी; पिकं जळू लागली;
कृषिमंत्री भरणेंची व्यक्त केली चिंता Top 15 News :
राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पाऊस न झाल्याने शेतातील पिकं जळू लागली असून शेती उद्ध्वस्त होण्याची चिंता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री या परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या असून, लवकरच आढावा घेतला जाईल, असं भरणे यांनी सांगितलं. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास राज्याला पावसाचा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शेतकरी अडचणीत असला तरी आत्महत्या हा पर्याय नाही. कुटुंबाचा विचार करून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, असं आवाहन भरणे यांनी केलं.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा!
मोदी आज मंत्र्यांची घेणार ‘क्लास’
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना वेग आला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडक मंत्रालयांचं कामकाज, योजनांची प्रगती आणि मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जाणार आहे. सामाजिक न्याय आणि कल्याण क्षेत्रातील कामांवर विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. शिक्षण, सामाजिक न्याय व सक्षमीकरण, कृषी यांसह संबंधित मंत्रालयांचा आढावा घेतला जाणार आहे. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीममध्ये बदल झाल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मोदींच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
‘कर्मभूमीशी गद्दारी करू नका’;
ब्रिटिश हिंदूंना मोहन भागवतांचा स्पष्ट संदेश
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्रिटनमध्ये आयोजित ‘सेलिब्रेशन ऑफ वननेस’ कार्यक्रमात ब्रिटिश हिंदूंना संबोधित केलं. हिंदू स्वयंसेवक संघ UK आणि ‘इंटीग्रल’ संस्थेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी भागवत यांनी ब्रिटिश हिंदूंच्या ब्रिटनप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक केलं. भारत ही जन्मभूमी असली तरी ब्रिटन ही कर्मभूमी असल्याने तिच्याशी निष्ठा राखणं योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं. “कर्मभूमीशी गद्दारी कुणीही करता कामा नये,” असंही भागवत म्हणाले. जन्मभूमी संस्कार देते, तर कर्मभूमी निष्ठा कशी राखावी हे शिकवते, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी जनरेशन झी आणि हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यांवरही भाष्य केलं.
ट्रम्प यांचा इराणवर डिजिटल हल्ला!
तासाभरात ७ पोस्ट; अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा दावा
अमेरिका-इराण संघर्ष थांबण्याची चिन्हं नसताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या एका तासात इराणशी संबंधित सात पोस्ट सोशल मीडियावर केल्या. यामध्ये इराणचा नकाशा, होर्मुझ सामुद्रधुनीतील तेलपुरवठा, इराणची तेल निर्यात, चलन आणि महागाईची आकडेवारी शेअर करण्यात आली. इराणी रियाल मोठ्या प्रमाणात घसरल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ‘बाय-बाय खरग’ म्हणत त्यांनी खारग बेटावरील हल्ल्याचा एआय-निर्मित फोटोही शेअर केला. अखेरच्या पोस्टमध्ये ‘इराण एक अपयशी राष्ट्र बनत आहे’, असा दावा केला. मात्र, इराणने अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये पहिल्याच दिवशी ड्रामा!
ईशानचं शतक, सूर्यवंशी-तिलकची बाचाबाची
दुलीप ट्रॉफी 2026 च्या फायनलमध्ये पहिल्याच दिवशी मैदानावर धावांसोबतच वादाचीही रंगत पाहायला मिळाली. ईस्ट झोनने ईशान किशनच्या नाबाद शतकाच्या जोरावर 4 बाद 385 धावा करत सामन्यावर पकड मजबूत केली. ईशानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 10वं शतक झळकावत 4000 धावांचा टप्पाही गाठला. दरम्यान, वैभव सूर्यवंशी आणि साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अंपायरला हस्तक्षेप करून दोघांना शांत करावं लागलं. दुसरीकडे, चीफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या मैदानातील उपस्थितीचीही चर्चा झाली. मोहम्मद सिराजने 14 षटकांत 96 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमिअर दणक्यात!
16 स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री; Top 15 News :
बहुचर्चित ‘बिग बॉस सीझन 20’चा ग्रँड प्रीमिअर 6 सप्टेंबरला दणक्यात पार पडला. सलमान खानच्या दमदार एन्ट्रीने शोमध्ये चांगलीच रंगत आली. यंदा तब्बल 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. माही विज, आम्रपाली दुबे, मेरी कोम, अर्शिफा खान, कनिका मान यांच्यासह अनेक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच एपिसोडमध्ये स्पर्धकांना मोठं सरप्राइज मिळालं. प्रत्येक सदस्याला दोन लाइफ देण्यात आल्या असून, दोन्ही लाइफ संपेपर्यंत त्याला शोमधून बाद केलं जाणार नाही. त्यामुळे यंदाचा सीझन अधिक रंजक होण्याची शक्यता आहे.





