Top 15 News : “मनोज जरांगे माझे भाऊ”, iPhone 18 Pro सोबत Appleचा फोल्डेबल फोनही लाँच आणि राणी मुखर्जीचा मराठमोळा अंदाज, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू असून आज त्यांचा उपोषणाचा १२वा दिवस आहे.

“मनोज जरांगे माझे भाऊ”;
अमृता फडणवीसांनी जेवणाचं दिलं निमंत्रण
Top 15 News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू असून आज त्यांचा उपोषणाचा १२वा दिवस आहे. प्रकृती खालावत असतानाही कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “जरांगे पाटील माझे भाऊ आहेत, त्यांना मी घरी जेवायला येण्याचं निमंत्रण देते,” असं त्या नागपुरातील दहीहंडी महोत्सवात म्हणाल्या. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाणे हद्दीत ९ आणि १० सप्टेंबरला मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वित्त विभागासाठी राष्ट्रवादीची पुन्हा मागणी;
सुनेत्रा पवार घेणार अमित शहांची भेट
भाजपकडे असलेला राज्याचा वित्त व नियोजन विभाग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गाभा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पीय कामकाज सुरळीत राहावे म्हणून वित्त व नियोजन विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, सहा महिन्यांनंतरही विभाग भाजपकडेच आहे. निधीवाटपात वित्त विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याने हा विभाग राष्ट्रवादीला परत मिळावा, अशी पक्षाची भूमिका आहे. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि २७ सप्टेंबरच्या नाशिकमधील पक्षाच्या शिबिराबाबतही बैठकीत चर्चा झाली.
MPSC गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली;
आता ३ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑफलाइन OMR पद्धतीने होणार होती. आता सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांची उपलब्धता, सणासुदीचा काळ, वाहतूक व्यवस्था, इतर परीक्षांचे नियोजन आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून पुढील सूचना तपासून घ्याव्यात असंही सांगण्यात आलंय.
विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस,
४८ तासांत माफीची मागणी
पुण्यातील गणेशोत्सवातील DJ साउंड सिस्टिमविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. बापट यांनी देवी-देवता, गणेशोत्सव आणि हिंदू धार्मिक परंपरांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा फौजदारीसह कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ध्वनीप्रदूषण किंवा उत्सवांबाबत मत मांडण्याच्या अधिकाराला विरोध नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. मात्र, धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
गणरायाच्या स्वागताला पाऊस येणार?
राज्यात पुन्हा सरींची शक्यता
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांत तापमान वाढून उकाडा जाणवत आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, नाशिकचा घाटमाथा आणि नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी सरी कोसळू शकतात. दरम्यान, ११ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील पाच खासदारांचा ‘संसद रत्न’ पुरस्काराने सन्मान Top 15 News :
महाराष्ट्रातील पाच खासदारांचा आज नवी दिल्लीत ‘संसद रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के, भाजप खासदार स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि डॉ. हेमंत सावरा यांचा समावेश आहे. खासदारांच्या संसदेमधील कामगिरीचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो. प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर, संसदीय चर्चेतील सहभाग तसेच खासगी विधेयकांमधील योगदान अशा विविध निकषांच्या आधारे खासदारांची निवड केली जाते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात या पाचही खासदारांना संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सरकारला जाग कधी येणार?’;
MPSC विद्यार्थ्यांसाठी भावनिक आवाहन
धाराशिवहून पुण्यात MPSCची तयारी करण्यासाठी आलेल्या प्रथमेश देशमुखच्या आत्महत्येच्या घटनेवरून सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी, निकालाला होणारा विलंब याचा विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. गावातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरभाडे, मेस आणि शिक्षणाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत परीक्षांचे नियोजन बिघडल्याने विद्यार्थ्यांवर मोठा ताण येतो, असा दावा करण्यात आला. ‘अजून किती प्रथमेशचे जीव गेल्यावर सरकारला जाग येणार?’ असा सवालही करण्यात आला. तसेच MPSC विद्यार्थ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता एकमेकांना धीर देण्याचे आवाहन करण्यात आले.
‘मारबत महोत्सव’ आता जागतिक स्तरावर झळकणार!
नागपूर महापालिकेची विशेष तयारी
नागपूरच्या सुमारे १४५ वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला ‘मारबत महोत्सव’ यंदा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महापालिकेने विशेष तयारी केली आहे. पिवळी आणि काळी मारबत मिरवणुकीसाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्वागत मंच आणि सजावट करण्यात येणार आहे. फ्रान्स, इटली, फिनलंड आणि नॉर्वेच्या वाणिज्यदूतांसह विविध देशांचे प्रतिनिधी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मंत्री, लोकप्रतिनिधी आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरही सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.
‘सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा’;
खासदार प्रणिती शिंदेंची मागणी
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. उजनी धरण भरले असले तरी पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाअभावी पिके करपली असून अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी अडचणीत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिशा समितीच्या बैठकीत आरोग्य, शिक्षण, महामार्ग आणि महावितरणासह विविध ३० विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच सोयाबीन पीक विमा तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांना मिळाला असून दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. प्रशासनाने दबावाला बळी न पडता काम करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
नंबर प्लेट लपवली अन् कॅमेऱ्यांना दिला चकवा;
व्हायरल व्हिडिओनंतर RTOची कारवाई
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नंबर प्लेट लपवून ट्रॅफिक कॅमेऱ्यांना चकवा देणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरवर RTOने कारवाई केली आहे. या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. तपासात गाडीमध्ये बटण दाबताच नंबर प्लेट झाकणारी ऑटोमॅटिक यंत्रणा बसवल्याचे आढळले. वाहनावर तब्बल १ लाख ३ हजार रुपयांचा दंड आणि ५५ ई-चालान प्रलंबित असल्याचे समोर आले. यापैकी ५१ चलान अतिवेगाचे आहेत. पिंपरी-चिंचवड RTOने यंत्रणा जप्त केली असून चालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. वाहनाचा इतर गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे का, याचाही तपास केला जाणार आहे
मोदींपासून फडणवीस-शिंदेंपर्यंत!
नेत्यांचा ‘Retro Look’ सोशल मीडियावर धुमाकूळ Top 15 News :
सध्या सोशल मीडियावर ‘Retro Look’ ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्रेंडची भुरळ तरुणाईसोबतच राजकीय नेत्यांनाही पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, पियुष गोयल यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे ८०-९०च्या दशकातील रेट्रो लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे भाजपने मोदींचा, तर काँग्रेसने राहुल गांधींचा रेट्रो फोटो शेअर केला. काही महिन्यांपूर्वी ‘घिबली’ ट्रेंडची चर्चा होती. आता रेट्रो लूकमुळे पुन्हा एकदा नेतेमंडळी चर्चेत आली आहेत. डिजिटल क्रिएटर्सनी सुरू केलेला हा ट्रेंड आता राजकीय वर्तुळातही लोकप्रिय झाला आहे.
iPhone 18 Pro सोबत Appleचा फोल्डेबल फोनही लाँच;
किंमत ऐकून बसेल धक्का!
ॲपलने iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सोबत आपला पहिला फोल्डेबल iPhone Duo लाँच केला आहे. भारतात iPhone 18 Pro ची किंमत 1,64,900 रुपये, तर Pro Maxची किंमत 1,79,900 रुपयांपासून सुरू होते. दोन्ही फोनमध्ये A20 Pro चिप, 48MP कॅमेरा, व्हेरिएबल अपर्चर आणि AI फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा बेस iPhone 18 मॉडेल लाँच करण्यात आलेले नाही. दरम्यान, iPhone Duoची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 7.6 इंचाचा आतील आणि 5.4 इंचाचा बाहेरील डिस्प्ले मिळत आहे.
अमेरिका-इराण युद्ध २०२९ पर्यंत सुरू राहणार
व्हाईट हाऊसचा धक्कादायक अंदाज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतचे युद्ध लवकर संपेल, असा दावा करत असले तरी व्हाईट हाऊसच्या अंतर्गत चर्चेत वेगळाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युद्ध जानेवारी २०२९ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता ट्रम्प यांच्यासमोर मांडली आहे. अमेरिकेचा दबाव, निर्बंध आणि लष्करी कारवाईनंतरही इराण माघार घेण्यास नकार देऊ शकतो, अशी भीती आहे. दीर्घकाळ युद्ध सुरू राहिल्यास अमेरिकेच्या लष्करावर ताण वाढण्यासोबतच जागतिक तेल बाजारातही मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रूटने पाँटिंग-स्टिव्ह वॉ यांचा विक्रम मोडला;
ठरला तिसरा सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू!
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारी बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर सुरू झाला. हा सामना इंग्लंडचा कर्णधार जो रूटसाठी खास ठरला. मैदानात उतरताच त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ यांचा विक्रम मोडला. रूटचा हा १६९वा कसोटी सामना असून, तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाँटिंग आणि वॉ यांनी प्रत्येकी १६८ सामने खेळले आहेत. रूटच्या पुढे सचिन तेंडुलकर (२००) आणि जेम्स अँडरसन (१८८) आहेत. कसोटीत रूटने १४,२०८ धावा केल्या असून, त्याच्या नावावर ४१ शतके आणि ६८ अर्धशतके आहेत.
राणी मुखर्जीचा मराठमोळा अंदाज;
पुरस्कार घेताना चक्क मराठीतून व्यक्त केल्या भावना! Top 15 News :
मुंबईत ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर प्रसाद ओक यांना विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री राणी मुखर्जीला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी राणीने हिरवी साडी, गजरा आणि हिरव्या बांगड्यांसह मराठमोळ्या अंदाजात एन्ट्री केली. पुरस्कार स्वीकारताना तिने मराठीतून भाषण करत महाराष्ट्राला आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगितले.





