Top 15 News : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!, BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज आणि ‘हा’ सिनेमा थिएटरमध्ये सुपरफ्लॉप, OTTवर मात्र नंबर वन, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : शेतकरी आणि शेतमजुरांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेची व्याप्ती वाढली
Top 15 News : शेतकरी आणि शेतमजुरांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच शेतकरी, महिला शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अनुदान दिले जाणार आहे. दोन डोळे किंवा दोन हात-पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा, हात किंवा पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी;
विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात उकाडा वाढला होता. मात्र, आता पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणीतही जोरदार पाऊस होऊ शकतो. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे.
भंडाऱ्यात भीषण अपघात;
८ मजुरांचा जागीच मृत्यू
भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. लाखनी-साकोली मार्गावरील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स गाडीची भीषण धडक झाली. या अपघातात ट्रॅक्समधील तब्बल आठ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतक हे सर्व छत्तीसगडमधील मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे मजूर नागपूरच्या दिशेने जात होते. पेट्रोल पंपावरून आयशर ट्रक रस्त्यावर येत असताना मागून आलेल्या ट्रॅक्स चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्स थेट ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी नॅशनल हायवे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
भंडारा महाप्रसाद वाटपासाठी FDAकडून सूचना जारी
नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई
सणासुदीच्या काळात महाप्रसाद आणि सामूहिक अन्नवाटप करणाऱ्या आयोजकांसाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर, भंडारा अशा कार्यक्रमांसाठी किमान सात दिवस आधी पूर्वसूचना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर किंवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार केलं जात असल्यास ही पूर्वसूचना संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे. अन्न तयार करताना स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य तापमान, कच्चं आणि शिजवलेलं अन्न वेगळं ठेवणं, तसंच अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यास तपासणी, नमुना संकलन आणि कठोर कारवाई केली जाणार आहे.
MPSC पेपरफुटीवर SIT;
रोहित पवारांचा सरकारला टोला, म्हणाले…
MPSC औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. प्रकरणाचा SITमार्फत तपास करण्यात येणार असून, तक्रारींच्या निराकरणासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. तसेच सर्वंकष सुधारणांसाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी SITवरून सरकारवर टीका केली. अनेक प्रकरणांत SIT स्थापन झाल्या, मात्र पुढे काय झालं, याचा ताळमेळ नाही. त्यामुळे MPSC पेपरफुटीप्रकरणी SIT म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
जळगावात मतदार यादीवरून राजकारण तापलं;
सोमय्यांचा ३१ टक्के नावांबाबत दावा Top 15 News :
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जळगाव शहरातील तब्बल ३१ टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. मतदार यादीची पुनर्तपासणी करण्यासाठी आणि बांगलादेशी नागरिकांची नावे आढळल्यास ती वगळण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आपण जळगावात आल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. लाखो बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचाही त्यांनी दावा केला. दरम्यान, सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. बांगलादेशी मतदारांमुळेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष काही प्रमाणात टिकून राहिल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बांगलादेशी मतदारांच्या मतांच्या राजकारणासाठी ठाकरे पाठपुरावा करत असल्याचा दावाही सोमय्यांनी केला.
नवनीत राणा यांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांच्या अमरावतीतील निवासस्थानी यंदाचा बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नवनीत राणा यांनी बैलांची विधिवत पूजा करत त्यांना नैवेद्य दाखवला आणि कृतज्ञता व्यक्त केली. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज, पारंपरिक सजावट आणि पूजेच्या विधींमुळे निवासस्थानी ग्रामीण संस्कृतीची अनुभूती पाहायला मिळाली. यावेळी नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेल्या परंपरांचे जतन करण्याचा संदेश दिला. साधेपणा आणि पारंपरिक वातावरणात राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी बैलपोळा उत्साहात पार पडला.
नंदुरबारमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक;
७ हजार रोजगारांच्या संधी
नंदुरबार जिल्ह्यात लघुउद्योगांना चालना देण्यासाठी तब्बल ५ हजार ४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यातून सुमारे ७ हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे गुजरातमधील उद्योजक नंदुरबारमध्ये उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. नंदुरबारला ‘टेक्स्टाईल हब’ म्हणून विकसित करण्याबाबतही शासनस्तरावर विचार सुरू आहे. उद्योगांसाठी आवश्यक एनएची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, बँकांकडून कर्जासाठी आलेल्या तब्बल ७० टक्के अर्जांना नकार मिळत असल्याने सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग आणि ग्रंथालय सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
‘80s ट्रेंड’च्या नादात गोपनीयता धोक्यात? ;
सायबर तज्ज्ञांचा इशारा
सोशल मीडियावर सध्या १९८०च्या दशकातील लूकमध्ये फोटो तयार करण्याचा ‘80s ट्रेंड’ लोकप्रिय झाला आहे. मात्र, वैयक्तिक आणि कौटुंबिक फोटो तृतीय-पक्षाच्या ॲपवर अपलोड करताना सावध राहण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. फोटो अपलोड केल्यानंतर चेहऱ्याची ठेवण, हावभाव आणि इतर जैवमितीय माहितीही संबंधित ॲपकडे जाऊ शकते, असा दावा सायबर तज्ज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी केला आहे. भविष्यात या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फोटो अपलोड करण्यापूर्वी संबंधित ॲपची गोपनीयता धोरणे आणि डेटा वापराच्या अटी तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुलढाण्यात बैलपोळ्याचा उत्साह;
बळीराजा स्मारकाचे पूजन करत कृतज्ञता
बुलढाणा शहरात शेतकऱ्याचा खरा मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. जुनागाव परिसरातील मंदिरासमोरून ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान करत पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड आणि नगरपरिषद गटनेते कुणाल गायकवाड यांनी बळीराजा स्मारकाचे पूजन केले. हजारो नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. यंदा नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. बैलांची संख्या कमी असली, तरी नागरिकांची उपस्थिती मोठी होती, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज;
मोदी-जिनपिंग-पुतिन-पेजेशकियन एकाच मंचावर! Top 15 News :
18वी BRICS शिखर परिषद 12 आणि 13 सप्टेंबरला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही सात वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येणार आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियनही परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी, जिनपिंग, पुतिन आणि पेजेशकियन एकाच मंचावर दिसणार आहेत. अमेरिका-चीन व्यापार तणाव, युक्रेन युद्ध आणि ग्लोबल साऊथचा वाढता प्रभाव या पार्श्वभूमीवर परिषदेला विशेष महत्त्व आहे. मोदी-पुतिन यांच्यात संरक्षण, ऊर्जा आणि अणु सहकार्यावर चर्चा अपेक्षित आहे. तर मोदी-जिनपिंग भेटीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
जुन्या ट्रॅफिक चलानांचा निपटारा करण्याची संधी;
१२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
वाहतूक नियम मोडल्यामुळे तुमच्या वाहनावर जुने ई-चलान बाकी असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. १२ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीत तडजोडीने मिटवता येणाऱ्या पात्र वाहतूक चलानांचा कमी रकमेत निपटारा करण्याची संधी मिळू शकते. वेगाने वाहन चालवणे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग, सिग्नल तोडणे, हेल्मेट किंवा सीट बेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, पीयूसी किंवा विमा नसणे अशा प्रकरणांचा समावेश होऊ शकतो. मात्र, मद्यपान करून वाहन चालवण्यासारखी गंभीर प्रकरणे साधारणपणे लोकअदालतीत घेतली जात नाहीत. लोकअदालतीसाठी चलानाची प्रत, आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि पीयूसीची कागदपत्रे सोबत ठेवावी.
झेलेन्स्कीं थोडक्यात बचावले
विमानाला ड्रोनची धडक बसता बसता राहिली?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की प्रवास करत असलेल्या विमानाला ड्रोनची धडक बसता बसता राहिल्याचा दावा नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांनी केला आहे. मोल्डोव्हाहून ओस्लोला जात असताना ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या घटनेमागे कोण होते, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, झेलेन्स्की यांच्या राष्ट्रपती कार्यालयाने हा दावा फेटाळला असून, घटना अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी ओस्लोमध्ये नॉर्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी युक्रेनला लष्करी आणि हवाई संरक्षण मदतीबाबत चर्चा केली. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून शांतता चर्चेला पुन्हा सुरुवात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महिला आशिया कप : भारत अंतिम फेरीत;
बांगलादेशचा ४० धावांनी पराभव
महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.दुबईत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १४९ धावा केल्या. शफाली वर्माने शानदार फलंदाजी करत ४० चेंडूत ६४ धावांची खेळी केली. विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव २० षटकांत ७ गडी गमावून १०९ धावांवर थांबला. भारताकडून दीप्ती शर्माने तीन बळी घेतले.या विजयासह भारताने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशविरुद्धच्या मागील आठ टी-२० सामन्यांत भारताने सलग विजय मिळवला आहे.
थिएटरमध्ये सुपरफ्लॉप, OTTवर मात्र नंबर वन;
तापसी पन्नूच्या ‘गांधारी’लाही टाकलं मागे! Top 15 News :
थिएटरमध्ये फारसा प्रभाव न पाडणारे काही सिनेमे ओटीटीवर रिलीज होताच प्रेक्षकांची पसंती मिळवतात. असाच काहीसा प्रकार ‘धमाल 4’सोबत पाहायला मिळतोय. इंद्र कुमार दिग्दर्शित हा अॅडव्हेंचर कॉमेडी सिनेमा थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही. मात्र, 4 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर ‘धमाल 4’ ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सिनेमाने तापसी पन्नूच्या ‘गांधारी’लाही मागे टाकले आहे. अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांसारख्या कलाकारांचा या सिनेमात समावेश आहे. एका रहस्यमय खजिन्याच्या शोधाभोवती सिनेमाची कथा फिरते.





