Top 15 News: राष्ट्रवादीतील बैठकींचा धडाका!, पंजाबमध्ये दिवाळीनंतर राजकीय भूकंप? आणि ‘जेलर 2’ ओटीटीवर येणार, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, आज कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

राष्ट्रवादीतील बैठकींचा धडाका!
आज पुन्हा कोअर कमिटीची बैठक
Top 15 News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, आज कोअर कमिटीची बैठक होणार आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर पक्षातील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी देवगिरी बंगल्यावर झालेल्या आमदारांच्या बैठकीला अनेक आमदार अनुपस्थित होते. पक्ष सत्तेत असूनही कामे होत नसल्याची नाराजी काही आमदारांनी व्यक्त केली. तसेच वरिष्ठ नेत्यांमधील मतभेदांमुळे पक्ष कमकुवत होत असल्याची भावना मांडली. मात्र, पक्षांतर्गत वादाचे वृत्त सुनील तटकरे यांनी फेटाळले.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ;
राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या अटी!
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या सवलतीचा लाभ नियमित विद्यार्थ्यांनाच मिळणार असून, बाहेरून परीक्षा देणारे आणि पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी अपात्र असतील. तसेच शहरात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांच्या पाल्यांना केवळ गावात शेती असल्याने लाभ मिळणार नाही. महाडीबीटीअंतर्गत ५० टक्के सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांचे उर्वरित शुल्कही माफ होणार आहे.
पवार कुटुंबात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न;
रोहित पवारांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. भाजप अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. अजितदादा गटातील काही वरिष्ठ नेते यासाठी भाजपला मदत करत असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, अमित शाह यांच्या भेटीनंतर पक्षातील ३० आमदारांनी कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. मात्र, रोहित पवारांचे आरोप प्रसिद्धीसाठी असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ते फेटाळले.
अश्विनी भिडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका;
बेस्ट डेपो अतिक्रमणप्रकरणी ५ लाखांचा दंड
बोरिवलीतील बेस्ट बस डेपोसाठी राखीव जागेवरील अतिक्रमण न हटवल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याने हा निर्णय घेण्यात आला. अतिक्रमण हटवण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदत मागणारी पालिकेची विनंतीही फेटाळण्यात आली. तसेच मुंबई महापालिकेला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अवमान प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत आयुक्त आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाला स्थगिती देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
राज्यात पुन्हा पावसाचे संकट!
१३ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरातील ‘मुरासू’ चक्रीवादळाचा जोर कमी झाला असला तरी महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कायम आहे. हवामान विभागाने आज राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा समावेश आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेले चक्रीवादळ आता कमकुवत होत असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणारच;
प्रताप सरनाईकांचे आश्वासन Top 15 News:
एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनसबाबत चिंता करू नये. त्यांना बोनस मिळणारच, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. येत्या ५ किंवा ६ तारखेला एसटी महामंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिडको बसस्थानकाचे कामही नव्या ठेकेदाराकडून पूर्ण केले जाणार आहे. एसटी महामंडळातील चालक-वाहकांची २२ हजार पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असून, २०३७ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत;
‘महाराष्ट्र एपस्टीन’वर मिटकरींची प्रतिक्रिया!
भोंदूबाबा अशोक खरातच्या कथित काळ्या कृत्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत माजी आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित कथित अघोरी पूजेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अजितदादांच्या बंगल्याबाहेर रक्ताचा अभिषेक आणि अघोरी पूजा झाल्याच्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. चित्रपटात या संवेदनशील प्रकरणावर दिग्दर्शकांनी काय भाष्य केले आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण चित्रपट पाहणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
गोकुळमध्ये बहुमताचा कौल डावलू नका;
सतेज पाटील यांचे सरकारला आवाहन
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून आमदार सतेज पाटील यांनी शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यास विरोध केला. १३ संचालकांच्या बाजूने बहुमताचा कौल असून, तो स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले. उर्वरित १२ संचालकांनी बैठकीला उपस्थित राहून अध्यक्ष निवडीत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सहकारी संस्थांमध्ये बहुमताची व्यवस्था मोडीत काढणे अयोग्य असल्याचे सांगत, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत असा निर्णय होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय देणे हाच आमचा अजेंडा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंची खोतकरांच्या निवासस्थानी भेट;
जुन्या आठवणींना उजाळा
दुष्काळ आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पायाला फ्रॅक्चर झाल्याने उपचार घेत असलेल्या खोतकर यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तसेच जालन्यातील पाणीटंचाई, चारा-पाणी, विद्यार्थ्यांचे शुल्कमाफी आणि विकासकामांबाबत चर्चा झाली. खोतकर यांनी लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत सक्रिय व्हावे, अशी सदिच्छा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
सोलापूरच्या पाणीप्रश्नापासून AI डेटा सेंटरपर्यंत;
प्रणिती शिंदेंचे सरकारवर गंभीर आरोप!
खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासह आरोग्य आणि AI डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. दररोज पाणी देण्याचे आश्वासन देऊनही शहरात सहा दिवसांआड पाणी मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. महालॅब आणि डायलिसिस सेंटर बंद झाल्याचा दावाही त्यांनी केला. AI डेटा सेंटरमुळे उजनीच्या पाण्यावर आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत प्रकल्पातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. उद्याच्या मोर्चावरही त्यांनी टीका केली.
पंजाबमध्ये दिवाळीनंतर राजकीय भूकंप? ;
भाजप-अकाली दलाची युती जवळपास निश्चित Top 15 News:
पंजाबच्या २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये युती आणि जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाव्य फॉर्म्युल्यानुसार, भाजप ३५ ते ४० जागा, तर अकाली दल ६७ जागा लढवू शकतो. सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्रिपद अकाली दलाला देण्याची अट असल्याची चर्चा आहे. दिवाळीनंतर युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, हरसिमरत कौर बादल यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील पुनरागमनाचीही चर्चा सुरू आहे.
सोनम वांगचुक यांच्या शाळेला प्रशासनाचा दणका;
वर्ग आणि शैक्षणिक उपक्रम थांबवण्याचे आदेश!
लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या ‘डेजर्ट फ्लॉवर स्कूल’मधील वर्ग आणि शैक्षणिक उपक्रम थांबवण्याची सूचना केली आहे. आवश्यक परवानग्या न घेताच शाळेचे कामकाज सुरू केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. याप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंगमो यांना नोटीस बजावण्यात आली. शाळेसाठी देण्यात आलेल्या जमिनीचे वाटप प्रशासनाने ऑगस्ट २०२५ मध्ये रद्द केले होते. या निर्णयाला संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;
सुरुवातीच्या कलांत डेमोक्रॅटिक पक्ष आघाडीवर!
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट झाली आहे. प्रतिनिधीगृहाच्या ११५ जागांपैकी डेमोक्रॅटिक पक्षाने ७५, तर रिपब्लिकन पक्षाने ४० जागा जिंकल्या आहेत. सिनेटच्या ३९ जागांपैकी डेमोक्रॅटिक पक्षाला १५, तर रिपब्लिकन पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार जॉन ओसॉफ यांनी ट्रम्प समर्थित माइक कॉलिन्स यांचा पराभव केला. मात्र, हे सुरुवातीचे निकाल असून अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय;
सिराजला प्लेइंग-11 मधून डच्चू!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली. ऑकलंडमधील ईडन पार्कवर पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणामुळे हा निर्णय घेतल्याचे कर्णधार शुभमन गिलने सांगितले. भारताने प्लेइंग-11 मध्ये चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. नमन धीर प्रथमच न्यूझीलंडमध्ये वनडे खेळणार आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळाले नाही. मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे.
‘जेलर 2’ ओटीटीवर येणार!
न पाहिलेले ३० मिनिटांचे सीन्सही पाहता येणार? Top 15 News:
रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१२ कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होऊ शकतो. विशेष म्हणजे, ओटीटीवरील अनकट व्हर्जनमध्ये ३० मिनिटांचे अतिरिक्त फुटेज पाहायला मिळणार आहे. यात समांथा, मोहनलाल, ऋतिक रोशन आणि विजय सेतुपती यांचे थिएटरमध्ये न दाखवलेले सीन्स असण्याची शक्यता आहे. मात्र, ओटीटी प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही.





