Top 15 News : भाजप युवा मोर्चाची नवी टीम मैदानात, मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? आणि १० महिन्याचं ‘या’मालिकेचा प्रवास संपणार, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : भाजपने युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून २९ पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाची नवी टीम मैदानात
शंभवी साळेंकडे ‘युवती प्रमुख’ची जबाबदारी
Top 15 News : भाजपने युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून २९ पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ३५ वर्षांखालील तरुणांना प्राधान्य देण्यात आले. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि प्रभारी सुनील राणे यांनी ही घोषणा केली. नांदेडच्या २८ वर्षीय शंभवी साळे यांच्याकडे ‘युवती प्रमुख’ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील युवतींचे संघटन मजबूत करणे आणि त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, हे त्यांचे प्रमुख काम असेल. आता जिल्हा आणि तालुकास्तरावरील नव्या कार्यकारिणीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
MPSC आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री
विद्यार्थ्यांना वास्तवाची जाणीव करून दिली
पुण्यात MPSC आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ७० हजार पदांची भरती होईलच असे नाही, असे सांगत वस्तुस्थिती समजून घेण्याचा सल्ला दिला. MPSC अध्यक्षांना हटवण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या थेट अधिकारात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपोषणाऐवजी प्रश्नाच्या मुळाशी जाऊन मार्ग काढण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना ९ किंवा १० ऑक्टोबरला मुंबईत बोलावले. दरम्यान, पुण्यात इतर दोन ठिकाणीही MPSC विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत.
सहकाराच्या सत्तेसाठी कट्टर वैरी एकत्र!
विखे-थोरातांच्या संभाव्य युतीने राजकीय गणिते बदलली
महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अहिल्यानगरमध्ये पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र निलेश लंके यांनी अर्ज दाखल करत विरोधाची भूमिका घेतली आहे. सांगलीत जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. पुण्यात संग्राम थोपटे यांच्याविरोधात नितीन थोपटे इच्छुक आहेत. तर सातारा बँकेच्या निवडणुकीत मंत्री, खासदार आणि आमदार मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे.
महाराष्ट्रात कुठे पाऊस, कुठे ऑक्टोबर हिट?
कोकण-पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात सरींची शक्यता
राज्यात बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली असली, तरी काही जिल्ह्यांत आज पावसाच्या सरींची शक्यता आहे. IMDच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांसह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावरही हलका पाऊस होऊ शकतो. सांगली, सोलापूरसह काही भागांत सरींचा अंदाज आहे. गडचिरोलीत वादळी पावसाची शक्यता असून, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग
स्फोटांच्या मालिकेने परिसर हादरला Top 15 News :
हिंगोली शहरातील गर्दीच्या मारवाडी गल्ली (कपडा गल्ली) परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी रात्री भीषण आग लागली. गोदामातील फटाक्यांचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात सापडले. या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गोदामात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला होता.
MPSC आंदोलनाची सरकारकडून गंभीर दखल;
एकनाथ शिंदेंचा विद्यार्थ्यांना दिलासा
MPSC आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सचिवांना दूर करण्यात आले असून गुणवत्तेला अर्थात मेरिटला महत्त्व दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. MPSC अध्यक्षांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून ते राज्यपालांशी चर्चा करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळाची झळ पशुधनालाही;
शेतकरी जनावरे विक्रीला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा फटका आता पशुधनालाही बसत आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असून चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. चारा महागल्याने आणि पाण्याचे स्रोत आटल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी नाईलाजाने बैलजोडी, गायी आणि म्हशी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. दुग्ध व्यवसायावरही परिणाम झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी तातडीने चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यासह चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.
अजित पवारांच्या आठवणीत विक्रम काळे भावुक
सतीश चव्हाणांच्या प्रचारसभेत दादांची भासली उणीव
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारसभेत आमदार विक्रम काळे हे दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. प्रचारसभेत अजित पवारांची उणीव जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने प्रचारादरम्यान त्यांच्या अनुपस्थितीची भावना प्रकर्षाने जाणवली. काळे यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
घटनेपूर्वी त्यांनी कोणाची नावं सांगितली होती;
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी किशोरी पेडणेकरांचा सवाल
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले. पुर्णेकर हे विभागप्रमुख असून कुटुंबातील सदस्यासारखे होते, असे त्यांनी सांगितले. हत्येच्या महिनाभर आधी त्यांनी ‘माझं काही बरं-वाईट झालं तर…’ म्हणत काही व्यक्तींची नावे सांगितली होती, असा दावा पेडणेकरांनी केला. FIR दाखल होऊन आरोपींना अटक झाली, मात्र आरोपपत्र कधी दाखल होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरही तपासाची मागणी केली.
बाणगंगा तलावाच्या प्रदूषणावर मनसे आक्रमक
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा Top 15 News :
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंडदान आणि इतर धार्मिक विधींमुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता तसेच माशांवर परिणाम होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या डी वॉर्ड कार्यालयात जाऊन सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले. तलावाच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास पितृपक्षाच्या समारोपाच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.
‘आता सवलती देणे कठीण’;
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे महत्त्वाचे वक्तव्य
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटी निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही देशांसाठी आता आणखी सवलती देणे किंवा घेणे कठीण असल्याचे सांगितले. टॅरिफ, बाजारपेठेतील प्रवेश आणि व्यापारातील असमतोल हे प्रमुख मुद्दे अद्याप कायम आहेत. २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा करून व्यापार करारावर चर्चा केली. मात्र, अंतिम करारासाठी दोन्ही देशांमध्ये अजूनही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती होणे बाकी आहे.
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल?
दोन बड्या मंत्र्यांची राज्यसभेच्या यादीतून नावे गायब
भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवार जाहीर केले असून केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांची नावे यादीत नाहीत. दोघांचा राज्यसभा कार्यकाळ २५ नोव्हेंबर २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत त्यांना पुन्हा संसदेत आणावे लागेल किंवा मंत्रिपद सोडावे लागू शकते. दरम्यान, केंद्रातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे १३ खासदार असल्याने कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चा सुरू आहे.
रशियात ‘किलर व्हायरस’ची चर्चा
लॅब कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर २०० जण निरीक्षणाखाली
रशियातील सायबेरियातील शेलेखोव येथील अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमधील २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास २०० जणांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर न्यूमोनिक प्लेगची शक्यता व्यक्त होत असली, तरी रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी लॅबमधून घातक रोगजंतू लीक झाल्याचे अद्याप पुष्टी केलेले नाही. WHOनुसार प्लेग हा बॅक्टेरियामुळे होतो आणि वेळेत योग्य अँटीबायोटिक्स मिळाल्यास उपचार शक्य आहेत. सध्या कोरोनासारख्या जागतिक संकटाचा धोका असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
भारत-पाकिस्तान सामन्याला पुन्हा ग्रहण!
PCB च्या ‘त्या’ अटी आयोजकांनी फेटाळल्या
भारत-पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम क्रिकेटवरही कायम असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या WCLच्या तिसऱ्या हंगामातून पाकिस्तान चॅम्पियन्सने माघार घेतली आहे. PCBने ना हरकत प्रमाणपत्र देताना भारतीय संघाने मागील वर्षीच्या घटनांबद्दल लेखी माफी मागावी आणि यावेळी हस्तांदोलन करावे, अशा अटी घातल्याचे वृत्त आहे. मात्र, WCL आयोजकांनी या मागण्या फेटाळल्याने पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे १० ऑक्टोबरला होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला आहे. पाकिस्तानने मात्र अधिकृत निवेदनात केवळ PCBच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे.
१० महिन्याचं ‘या’मालिकेचा प्रवास संपणार Top 15 News :
‘मराठी मिडियम’ची १२ ऑक्टोबरपासून एन्ट्री
स्टार प्रवाहवर १२ ऑक्टोबरपासून ‘मराठी मिडियम’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. प्रसिद्ध रीलस्टार अभिनेत्री श्रद्धा पवार सरस्वतीच्या प्रमुख भूमिकेत दिसणार असून, मराठी शाळा वाचवण्यासाठी तिच्या संघर्षाची कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित होईल. त्यामुळे ऐश्वर्या नारकरांची ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिका आता दुपारी १ वाजता दाखवली जाणार आहे. दरम्यान, ‘वचन दिले तू मला’ मालिकेचा ११ ऑक्टोबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. अवघ्या दहा महिन्यांत मालिका बंद होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.





