TOP 15 : नेहा बोराची याचिका फेटाळली ते इंटरनेट केबल्स नष्ट करण्याचे इराणचे टार्गेट; जाणून घ्या आजच्या TOP 15 News
TOP 15 News: राज्य, देश-विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी...

TOP 15 News :
1. MPSC पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक! रोहित कोलटक्केला बेड्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात विशेष तपास पथकाने नवी मुंबईतून मोठी कारवाई केली आहे. आयोगात कार्यरत असणारा सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्के याला अटक करण्यात आली आहे. या हायप्रोफाईल पेपरफुटी प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित कोलटक्के याने MPSC चे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्याकडून औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर मिळवला होता.
लेंडवे यांच्याकडून प्रश्नसंच मिळवून तो पुढे आर्थिक फायद्यासाठी काही उमेदवारांपर्यंत किंवा मध्यस्थांपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे. दरम्यान, या अटकेनंतर रोहित पवार यांनी पोस्ट करत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खेळ मांडणाऱ्या एकाही महाभागाला सोडणार नाही, मग तो कोणीही असो, कितीही वरपर्यंत पोहोचलेला असो वा कोणाचाही कितीही जवळचा मित्र असो. आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणाशिवाय हा लढा थांबणार नाही,” असे म्हंटले आहे.
2. उसापासून इथेनॉल बंदीच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांसमोर आर्थिक संकट
उसापासून इथेनॉल निर्मितीला सरकारने निर्बंध घातल्याने साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र इथेनॉल निर्मितीला बंदी हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेलाच ब्रेक आहे. नैसर्गिक आपत्तीपेक्षा, सरकारच्या धोरणामुळेच साखर उद्योग अडचणीत आला आहे. इंधन टंचाईच्या काळात इथेनॉलमुळेच भारताचे परकीय चलन वाचले.
दुष्काळ, साखरेचा तुटवडा हे तात्कालीन संकट आहे. देशाच्या दीर्घकालीन हितासाठी इथेनॉल निर्मितीबाबत फेरविचार करण्याची गरज आहे, असे वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने साखरेचा तुटवडा भासू नये म्हणून सरकारने इथेनॉलसाठी होणारा साखरेचा वापर तात्पुरता शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
3. ‘मोदींना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडलं?’ सुशीलकुमार शिंदेंचा सवाल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांचा नातू शिखर पाहरियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त झळकावलेल्या बॅनरबाजीचे समर्थन केले. “पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडले?” असा सवाल करत त्यांनी, आपणही अलीकडेच पंतप्रधानांना भेटल्याचे सांगितले.
मात्र, यातून आपली राजकीय भूमिका बदलत नसल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान हे जितकं माझ्याशी बोलतात तितकंच शरद पवारांशी ही बोलतात. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात, असेही ते म्हणाले. “मी काँग्रेसमध्ये आहे आणि तिथलेच काम करणार. भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे सुद्धा मी बघितलेल आहे, आता नाही 25 वर्षांपूर्वी सुद्धा असच होत होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
4. “कोण कोणाला कशाला 500 कोटी देईल”
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर मंत्री छगन भजुबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कोणी कोणाला 500 कोटी दिले नाही आणि कोणी ते घेतलेही नाहीत. या फक्त पारावरच्या गप्पा आहेत. कोण कोणाला कशाला 500 कोटी देईल. द्यायचे असतील तर भाजप स्वतःहून नेऊन देईल.
त्यांचे मंत्री संपर्कात आहेतच ना… आता आपापसातील कलगीतुरे थांबवण्याची आवश्यकता आहे. लोकांना यात काही इंटरेस्ट नाही. कोणीही कोणाला संपवू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या ताकदीनुसार शक्तीनुसार राजकारणात काम करतो. ज्याचे शून्य आमदार आहेत त्याचाही पक्ष चालतो. सध्या दुष्काळावर सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे,” असे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
5. नॅशनल मोटरसायकल रॅलीचे नवी मुंबईत जंगी स्वागत
राष्ट्रीय एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून देशभरात ‘नशामुक्त भारत’चा संदेश दिला जात आहे. देशातील नऊ राज्यांमधील पोलीस कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले असून, सामाजिक जनजागृती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देत ही रॅली विविध भागांतून मार्गक्रमण करत आहे.
सध्या ही रॅली नवी मुंबईत दाखल झाली असून, नवी मुंबई पोलिसांकडून रॅलीतील सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचे जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती, तरुणांमध्ये जनजागृती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
6. डोंबिवलीत कॅनरा बँकेचे एटीएम सील; ४८.९२ लाखांची मालमत्ता कर थकबाकी
मालमत्ता कराची ४८ लाख ९२ हजार ८७७ रुपयांची थकबाकी असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘फ’ प्रभागक्षेत्र कार्यालयाने डोंबिवली पूर्वेतील कॅनरा बँकेचे एटीएम सील केले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील पाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेकडे मालमत्ता कराची ४८,९२,८७७ रुपयांची थकबाकी आहे. थकीत कर भरण्याबाबत बँकेला दोन वेळा पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तसेच, शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊनही कर भरण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही थकबाकीचा भरणा झाला नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
7. “माझ्याकडे सिक्रेट क्लिप्स”; रामदास कदमांना प्रसाद लाड यांचा इशारा
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून प्रकरणावरूनप शिवसेना नेते रामदास कदम यांनी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गळा कापण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप पूर्णपणे चुकीचे असून भाजपला आणि उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, इतकेच काय तर, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबाबत रामदास कदम यांनी पडद्यामागे केलेल्या वक्तव्यांच्या क्लिप आपल्याकडे आहेत, त्या आपण उघड करू, असा इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिला. तसेच महायुतीमध्ये आपण एकत्र काम करत आहोत. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांबाबत आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी समन्वयातून प्रश्न सोडवावेत, असेही लाड म्हणाले.
8. राज्यातील हवामानात संमिश्र परिस्थिती!
काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
ऑक्टोबरच्या अखेरीसही राज्याच्या विविध भागांत उन्हाचा कडाका कायम आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. एकीकडे उष्णतेचा तडाखा, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने राज्यातील हवामानात संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे.
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि कोल्हापूर येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
9. भिवंडी न्याय मंच च्या वतीने टोरंट गो बॅकचा नारा;
प्रांत कार्यालयासमोर टोरंट पावर हटवण्यासाठी धरणे आंदोलन…
भिवंडीत वीज बिले वसूल करणाऱ्या महावितरणची फ्रेंच्यायजी असलेल्या टोरंट पावर कंपनीच्या विरोधात भिवंडी न्याय मंचच्या बॅनरखाली टोरंट ‘ गो ‘ बॅकचा नारा देण्यात आला. वाढीव वीजबिले, वीजचोरी संदर्भातील खोटे गुन्हे, फास्ट मीटर,ग्राहकांशी गैरवर्तन याविरोधात आंदोलकांनी टोरंट पावरच्या विरोधात संताप व्यक्त करीत प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन केले. यावेळी टोरंट पावरला हटवावे अथवा टोरंट सोबत इतर अदानी, अंबानी यांच्या परवाना धारक वीज कंपन्यांना भिवंडीत वीज वितरणासाठी संधी द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली होती. दरम्यान भिवंडी न्याय मंच च्या शिष्ट मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन भिवंडी प्रांतांना सादर केले असून मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर जाऊन मोर्चाचा इशारा दिला आहे.
10. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत द्या;
अन्यथा नाशिक ते मुंबई बिऱ्हाड महामोर्चा काढण्याचा इशारा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई, भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये जीवननिर्वाह अनुदान आणि प्रलंबित वनहक्क दाव्यांचा तातडीने निपटारा करावा, या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत पावसातील खंडामुळे सोयाबीन, भात, कपाशी व तूर पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास नाशिक ते मुंबई पायी बिऱ्हाड महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
11. नेहा बोराची याचिका फेटाळली; उच्च न्यायालयाचा दणका
मागील आठवड्यात १६ ऑक्टोबर रोजी मंडी हाऊस येथे एका आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन दिवसांनी चौकशीच्या कालावधीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि हमीपत्र सादर करण्याची नोटीस पोलिसांनी तिला बजावली होती. या कारवाईविरोधात तिने उच्च न्यायालयात धाव घेत पोलिसांच्या भूमिकेला आव्हान दिले होते. न्यायलयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व बाजू समजून घेतल्यानंतर नेहा बोराची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने नेहा बोराला दिलेल्या धक्क्यामुळे विद्यार्थी नेत्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
12. मतदानादरम्यान उमेदवाराचा संताप; इस्लाम धर्म स्वीकारण्याचा इशारा
आग्रा येथील शिक्षक मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार आकाश अग्रवाल यांनी प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी भाजपाने निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला. तसेच माझा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. आता मी धर्मांतर करणार असून, इस्लाम धर्माचा स्वीकार करणार आहे, असा इशारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आकाश अस्रवाल म्हणाले की, “मी पुढच्या महिन्यात लखनौला जाऊन शाही ईदगाह येथे धर्मांतर करणार आहे. त्याचं कारण म्हणजे जय पराजयामुळे मला फरक पडत नाही. मात्र मी स्वतंत्र भारतात राहत आहे. मी कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढणार, कुठल्या पक्षाकडून लढणार नाही, हा माझा निर्णय आहे. एक अधिकारी मला म्हणाला की तुम्ही उमेदवार आहात देव तर नाही ना. मग आता मी त्यांना सांगू इच्छितो की मी आता माझा देवच बदलला आहे,” असे म्हणत त्यांनी धर्मांतराबाबतही मोठं विधान केलं.
13. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर समुद्राखालील इंटरनेट केबल्स नष्ट करण्याचे इराणचे टार्गेट
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अमेरिका इराणविरोधात पुन्हा सैन्य कारवाई करू शकते असं ट्रम्प यांनी म्हणताच इराणी सुरक्षा अधिकाऱ्यांनीही इशारा दिला आहे. जर अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा इराणवर हल्ला केला तर इराणने आखातातील समुद्राखाली टाकलेल्या इंटरनेट केबल्सना टार्गेट करण्याची तयारी केली आहे असा दावा इराणने केला आहे.
जर इराणवर हल्ला झाला तर समुद्राखालील केबल्सपासून सैन्य ठिकाणांपर्यंत कुठलीही जागा सुरक्षित राहणार नाही. इराण या केबल्सपर्यंत पोहचला असून त्या नष्ट करू शकतात असा दावा इराणचे सुरक्षा अधिकारी यांनी केला आहे. दरम्यान, अनेक केबल्स कापल्याने इंटरनेटचा वेग मंदावू शकतो आणि आर्थिक व्यवहार, ऑनलाइन व्यापार व क्लाउड सेवांवर परिणाम होऊ शकतो.
14. ‘आपण विश्वविजेते का आहोत हे दाखवायला आलोय’; अभिषेक शर्माचे तुफानी भाषण व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात अत्यंत दिमाखदार विजयाने केली आहे. क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने २२६ धावांचे महाकाय आव्हान अवघ्या १९.४ षटकांत ६ गडी गमावून पार केले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला.
या ऐतिहासिक लढतीपूर्वी मैदानावर उतरताना भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने सहकाऱ्यांना दिलेले अत्यंत प्रेरणादायी आणि आक्रमक भाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. यात अभिषेकने, न्यूझीलंडच्या भूमीवर तीच चूक पुन्हा होता कामा नये. किवी संघही आपल्याला कडवे आव्हान देणार आहे, त्यामुळे आपण ‘विश्वविजेते’ का आहोत हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट इशारा दिला.
15. रमेश परदेशी उर्फ पिट्या भाईच्या वडिलांचं निधन
मराठी अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्या भाईच्या वडिलांचं निधन झालं आहे. रमेश परदेशींनी त्यांच्या सोशल मीडियावरुन वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. रमेश परदेशी यांचे वडील परशुराम परदेशी यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश परदेशी यांच्या वडिलांच्या निधनानंतर प्रवीण तरडेंनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रवीण तरडे यांनी पोस्टमध्ये, “मित्राचे वडील हे सुध्दा एक खूप सुंदर नातं असतं.
आपल्या मित्राच्या मैत्रीबरोबर ते सुध्दा पिकत जातं. पिट्याचे वडील गेले, शुन्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलेला माणूस…त्यांच्यासारखी डाय बनवणारा कुशल डायमेकर माझ्या पहाण्यात दुसरा नाही. लहानपणापासूनच्या खूप आठवणी आहेत त्यांच्या, मागचे सहा महिने आजारी होते. पिटयाने खूप प्रयत्न केले, पण नाही वाचवू शकला त्यांना.. परमेश्वर दादांच्या आत्म्यास शांती देवो आणि पिट्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, ओम शांती”, असे म्हंटले आहे.
Jejuri : जेजुरीतील कडेपठारावरील डोंगररांगेत फटाक्यांमुळे वणवा









