Top 10 Sports News : रोनाल्डोची अभिनयाच्या विश्वात एन्ट्री ते IPL मधील सर्वात मोठी ट्रेड डील; जाणून घ्या क्रीडा विश्वातील घडामोडी
Top 10 Sports News : रोनाल्डोची अभिनयाच्या विश्वात एन्ट्री ते IPL मधील सर्वात मोठी ट्रेड डील; जाणून घ्या क्रीडा विश्वातील घडामोडी

Top 10 Sports News :
1. टीम इंडियाच्या विमानाचा अपघात टळला
खेळाडूंनी सोडला सुटकेचा निश्वास
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघातील खेळाडूंना वेलिंगटन विमानतळावर उतरण्यापूर्वी मोठ्या थराराचा सामना करावा लागला. शुबमन गिल, केएल राहुल, अंशुल कंबोज आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्यासह सपोर्ट स्टाफ एअर न्यूझीलंडच्या विमानाने हॅमिल्टनहून वेलिंगटनला निघाले होते. दुपारी १२:४५ च्या सुमारास विमान धावपट्टीच्या अगदी जवळ असताना जोरदार वादळी वारे आणि टर्ब्युलन्समुळे पहिले लँडिंग अयशस्वी ठरले. वैमानिकांनी तत्काळ प्रसंगवधान राखत विमान पुन्हा ५,००० फुटांवर नेले. काही काळ हवेत घिरट्या घातल्यानंतर, २६ मिनिटांच्या विलंबाने विमान सुरक्षितरीत्या उतरले. या थरारक घटनेत सर्व खेळाडू सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही. (Top 10 Sports News)
2. रोनाल्डोची अभिनयाच्या विश्वात एन्ट्री!
‘डे 1s’ मालिकेतून करणार अभिनयाचा श्रीगणेशा
फुटबॉलच्या मैदानावर आपल्या खेळाने जगभरातील चाहत्यांना भुरळ घालणारा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आता थेट टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसणार आहे. ‘डे 1s’ या नव्या टीव्ही मालिकेतून तो अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेची निर्मितीही रोनाल्डो स्वतः करणार असून त्याच्यासोबत प्रसिद्ध ब्रिटिश चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक मॅथ्यू वॉन यांचीही साथ असणार आहे.रोनाल्डोने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली.
3. आयपीएल २०२७ पूर्वी सर्वात मोठी ट्रेड डील !
हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात १८ कोटी रुपयांची मोठी ट्रेड डील झाली असून, यावर आयपीएलने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. या करारानुसार अष्टपैलू हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्सकडून खेळणार आहे, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. २०२४ मध्ये मुंबईच्या कर्णधारपदी आल्यानंतर हार्दिकला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते, तसेच चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. आता हार्दिकच्या एक्झिटनंतर मुंबई इंडियन्सची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माकडे जाणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे, अर्शदीपच्या आगमनामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक भक्कम झाली आहे.
4. सचिनचा ऐतिहासिक ठेवा चाहत्यांसाठी होणार खुला!
‘बॅटोग्राफी’ प्रदर्शनात सचिन उलगडणार क्रिकेटचा प्रवास
सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २६ ऐतिहासिक बॅट्स आणि इतर मौल्यवान स्मृतीचिन्हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट देण्याचा निर्णय घेतलाय. १०० शतकांच्या प्रवासातील संस्मरणीय बॅट्स, हेल्मेट, जर्सी आणि वैयक्तिक नोट्स या विशेष दालनात पाहता येणार आहेत. या प्रदर्शनाला ‘बॅटोग्राफी’ असे नाव देण्यात आले आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी, म्हणजेच सचिनच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीच्या १३ व्या वर्धापनदिनी या दालनाचे अनावरण होणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या क्रीडा रसिकांना आता सचिनच्या गौरवशाली प्रवासाची आणि ऐतिहासिक विक्रमांची अनुभूती अगदी जवळून घेता येणार आहे. (Top 10 Sports News)
5. झिम्बाब्वेने विश्वविक्रमाला घातली गवसणी!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणालाच न जमलेला केला पराक्रम
कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात आजवर कोणत्याही दिग्गज संघाला न जमलेला पराक्रम झिम्बाब्वेने करून दाखवला आहे. शारजाह येथे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत ५०० पेक्षा अधिक धावा ठोकण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम रचला आहे.झिम्बाब्वेने पहिल्या डावात ५०४, तर दुसऱ्या डावात ५ बाद ५२३ धावा केल्या. यात क्रेग इर्विनचे नाबाद द्विशतक, तर ब्रेंडन टेलर, ब्रायन बेनेट आणि वेस्ली मधवीरे यांच्या शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे अफगाणिस्ताननेही ५१४ धावा करत चोख प्रत्युत्तर दिले. फलंदाजांच्या या वादळामुळे सामन्यात तब्बल १,५४१ धावांचा डोंगर उभा राहिला आणि झिम्बाब्वेचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
6. क्रिकेटर रिंकू सिंग अडकणार विवाहबंधनात!
VVIP पाहुणे लावणार हजेरी
भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंग येत्या ४ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. तो मछलीशहरच्या सपा खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत लखनौमधील प्रसिद्ध हॉटेल रमाडा येथे विवाहगाठ बांधेल. अलिगढ येथून रिंकूची वरात निघणार असून, त्यात ५० ते ६० खास पाहुणे सहभागी होतील. सध्या घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असून रिंकूच्या आईने होणाऱ्या सुनेसाठी खास पिवळी साडीही खरेदी केली आहे. फेब्रुवारीत वडिलांच्या निधनामुळे पुढे ढकललेला हा सोहळा आता पार पडत आहे. या शाही लग्नाला शाहरुख खान, अखिलेश यादव, गौतम गंभीर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे दिग्गज हजेरी लावणार आहेत. तसेच विवाहानंतर अलिगढमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.
7. युवा ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका!
१७ वर्षीय शौर्या अंबुरेने जिंकले ऐतिहासिक कांस्यपदक
जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्राच्या १७ वर्षीय शौर्या अंबुरेने युवा ऑलिम्पिक २०२६ मध्ये ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले आहे. सेनेगलमधील डकार येथे झालेल्या महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत शौर्याने १३.५९ सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवत भारताचा तिरंगा फडकावला. अवघ्या ०.०२ सेकंदांनी तिचे रौप्यपदक हुकले. शौर्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे शस्त्रक्रिया आणि नऊ महिन्यांच्या कठीण रिहॅबिलिटेशननंतर तिने ट्रॅकवर पुनरागमन केले. निवड चाचणीत अपघात होऊनही मिळालेल्या दुसऱ्या संधीचे तिने सोने केले. या स्पर्धेत सहभागी होणारी ती भारताची एकमेव ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट होती. तिच्या या यशामुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
8. टेनिस स्टार सोराना कर्स्टियाची निवृत्ती!
हाँगकाँग ओपनमधील पराभवासह २० वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम
रोमानियाची स्टार टेनिस खेळाडू सोराना कर्स्टिया हिच्या २० वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीवर अखेर पडदा पडला आहे. हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित कर्स्टियाला रशियाच्या २१ वर्षीय अलेक्सांद्रा शुबलाद्जे हिने २-६, ३-६ असे पराभूत केले. या अनपेक्षित पराभवासह तिचा शेवटचा व्यावसायिक हंगाम संपुष्टात आला आहे. २००६ मध्ये पदार्पण करणाऱ्या ३४ वर्षीय कर्स्टियासाठी यंदाचा हंगाम अत्यंत संस्मरणीय ठरला. तिने यंदा ४२ विजय नोंदवत क्लूज-नापोका स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम १५ वे जागतिक मानांकन गाठले. पुनरागमनाची शक्यता फेटाळत तिने कोर्टवरून सन्मानाने निरोप घेतला असून, क्रीडा विश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Top 10 Sports News)
9. दुबईत भारतीय बॉक्सरने पाकिस्तानला चारली धूळ!
अदनान अहमदची ऐतिहासिक कामगिरी
जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर उत्तर प्रदेशच्या बदायूं येथील युवा बॉक्सर अदनान अहमदने दुबईत भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अदनानने पाकिस्तानचा तगडा बॉक्सर अबूबकर शेख याचा एकतर्फी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.विशेष म्हणजे, हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर अदनानला गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये लाखोंचे पॅकेज मिळाले होते. मात्र, बॉक्सिंगच्या वेडापायी त्याने ही सुरक्षित नोकरी सोडून रिंगणात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे भारतापासून अमेरिकेपर्यंत त्याच्या या जिद्दीचे कौतुक होत आहे.
10. भारतीय हॉकी संघ पुन्हा आशियाचा सम्राट!
सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी २०२६ च्या थरारक अंतिम फेरीत भारताने जपानचा ४-१ असा धुव्वा उडवत विक्रमी सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरले आहे. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल खाल्ल्याने भारतीय संघ पिछाडीवर पडला होता आणि मध्यंतरापर्यंत जपानने १-० अशी आघाडी टिकवली होती.मात्र, उत्तरार्धात भारताने आक्रमक पलटवार केला. ४२ व्या मिनिटाला शिलानंद लाखराने बरोबरी साधली. त्यानंतर दिलप्रीत सिंग, जुगराज सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांनी अवघ्या सात मिनिटांत तीन गोल डागत जपानचा पराभव निश्चित केला. संपूर्ण स्पर्धेत अजेय राहत भारतीय संघाने आपणच आशियातील हॉकीचे सम्राट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे.






