Top 10 Sports News : ॲथलेटिक्समध्ये 56 वर्षांनंतर रौप्य, विराटचा महाविक्रम अन् आशियाडमध्ये भारत-पाक महामुकाबला; पाहा क्रीडाविश्व गाजवणाऱ्या टॉप-१० घडामोडी!
Top 10 Sports News : २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची पदके, रोहित शर्माचा निवृत्तीच्या चर्चांवर खुलासा, शुभमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड आणि इतर प्रमुख घडामोडींचा समावेश आढावा.

Top 10 Sports News :
1. नाशिकच्या शेतकऱ्याच्या मुलाची गगनभरारी!
उंच उडीत भारताला ५६ वर्षांनंतर जिंकून दिले ऐतिहासिक रौप्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या ॲथलेटिक्स ट्रॅकवर महाराष्ट्राच्या सुपुत्राने ऐतिहासिक कामगिरीची (Top 10 Sports News) नोंद केलीय. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताचा स्टार ॲथलीट सर्वेश कुशारेने २.२५ मीटरची उत्तुंग झेप घेत रौप्यपदक पटकावलंय. या चंदेरी कामगिरीसह भारतीय पुरुष उंच उडीतील तब्बल ५६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. यापूर्वी १९७० च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत भीम सिंह यांनी २.०३ मीटर उडी मारून कांस्य जिंकले होते.
2. महाराष्ट्राच्या हरिता भद्राने पदार्पणातच रचला इतिहास
अवघ्या ०.०१ सेकंदाच्या फरकाने मारली बाजी!
जपानमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नवी मुंबईची कन्या आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू हरिता भद्राने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत सेकंदाच्या १०० व्या भागाच्या (०.०१ सेकंद) फरकाने अत्यंत थरारक कांस्यपदक पटकावले. हरिताने २३.२० सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले.
3. ‘किंग’ कोहलीचा विराट पराक्रम!
सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून संघात पुनरागमन करताच विराट कोहलीने एक नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वादळी अर्धशतक ठोकत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये (Top 10 Sports News) १५ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. या कामगिरीसह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरलाय. मात्र, सचिनपेक्षा तब्बल ७४ डाव कमी खेळून त्याने सर्वात जलद १५ हजार धावा ठोकण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय.
4. ट्रक ड्रायव्हरच्या लेकीने आशियाई स्पर्धेत रचला इतिहास!
पीटी उषाचा ४२ वर्षे जुना विक्रम मोडत पदकावर कोरलं नाव
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या ॲथलेटिक्स ट्रॅकवर भारताची २८ वर्षीय धावपटू विथ्या रामराजनं इतिहास रचलाय. महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत विथ्याने ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावलं. या ऐतिहासिक शर्यतीसह विथ्यानं ‘उडणपरी’ पीटी उषा यांचा तब्बल ४२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. पीटी उषा यांनी १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ५५.४२ सेकंदांची नोंद करत हा विक्रम प्रस्थापित केला होता.
5. अनाहत सिंहने नागोयात रचला इतिहास!
महिला एकेरी स्क्वॉशमध्ये जिंकले पहिलेवहिले रौप्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील स्क्वॉश या खेळामध्ये भारताची अवघ्या १८ वर्षांची युवा सनसनाटी अनाहत सिंहने महिला एकेरी प्रकारात ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत मलेशियाच्या अव्वल मानांकित शिवसंगरी सुब्रमण्यमकडून तिला ४-११, ४-११, ७-११ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, सुवर्ण हुकले तरी आशियाई स्पर्धेच्या इतिहासात महिला एकेरी स्क्वॉशमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरलीय.
6. “कारकीर्द संपवण्याचा विचार मनात येतच नाही!
निवृत्तीच्या चर्चांवर हिटमॅनचा थेट प्रहार
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्माने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. त्याने एकदिवसीय विश्वचषकाबाबत आपली भूमिका उघड करत, मैदानातून इतक्यात पायउतार होण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितलंय. “माझ्या मनात कधीच असा विचार येत नाही की, जे काही मिळवायचे होते ते मिळवून झाले आहे. जोपर्यंत तुम्ही खेळत आहात, तोपर्यंत भविष्यात साध्य करण्यासाठी नेहमीच नवे लक्ष्य असते. मी आगामी विश्वचषकाकडे आणि त्यातील संधींकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहत आहे.” असे त्याने स्पष्ट केले.
7. …तर मीही निवडणूक लढवणार
हसीन जहाँने पती मोहम्मद शमीला दिला इशारा
२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शमी किंवा त्याचा भाऊ हसीब निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. मोहम्मद शमी आणि राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. यामुळे चर्चांना उधाण आलंय. “जर शमी किंवा त्याचा भाऊ हसीब निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार. कोणत्याही राजकीय पक्षाने मला तिकीट दिले नाही, तरीही मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरून त्यांचा थेट सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे.” असा इशाराच हसीन जहाँने दिला आहे.
8. शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड!
जलद द्विशतक झळकवणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार (Top 10 Sports News) शुबमन गिलने जागतिक क्रिकेटचे सर्व जुने विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. गुवाहाटीच्या मैदानावर गिलने अवघ्या ११७ चेंडूंत २०० धावांचा जादुई टप्पा गाठला. यासह तो एकदिवसीय क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात सर्वात वेगवान द्विशतक ठोकणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना द्विशतक ठोकणारा गिल हा पहिलाच भारतीय फलंदाज बनला आहे.
9. आशियाडमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
सुवर्णपदकासाठी होणार हायव्होल्टेज लढत
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या क्रिकेटच्या मैदानावर क्रीडाविश्वातील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित महामुकाबला रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवत, तर पाकिस्तानने बांगलादेशला नमवून अंतिम फेरीत धडक मारलीय.आता हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी थेट सुवर्णपदकासाठी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला सुवर्ण, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे.
10.जोस बटलरचा ऐतिहासिक पराक्रम!
इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात जे कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं
इंग्लड आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या टी – २० मालिकेत इंग्लंडचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने एक ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने मर्यादित षटकांच्या म्हणजेच ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठलाय. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरलाय.






