Top 10 News: तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश, रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात आणि लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, वाचा अशा टॉप १० बातम्या
Top 10 News: सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवले आहे.

तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश
Top 10 News: सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तुषार दोशी हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत,सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळामुळे आणि राजकीय संघर्षामुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर विधानपरिषदेत निलंबनाची घोषणा झाली होती. मात्र तो निर्णय सभापतींनी स्थगित केला होता. दरम्यान सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस यंत्रणेने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत.
रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात
दोन दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत थेट सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते. याबाबत आता मोठी माहिती पुढे आलीय. तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रायगड मधील रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झालीय.
आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द याठिकाणी बहुमजली इमारत उभी केलीय. रुपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची ही केस असून यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरु असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.
बॅनरवरील फोटोतून आमची निष्ठा ठरवू नये
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्या सोबतच मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमसाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने तटकरे यांच्यावर जोरदार टीका होतीय. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. अदिती तटकरे यांनी याबाबत दिलगिरी करत बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये असं म्हटलंय. तसेच फोटो लावण्यात आला नसल्यानं दिलगिरी व्यक्त केली मात्र काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहे असं म्हणत टीकाकारांना उत्तर दिलंय.
खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलिसांनाही धक्का
अशोक खरात प्रकरणी तपासात विविध माहिती समोर येतीय. अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत आणखी एक धक्कादायक पोलिसांच्या हाती लागलीय. अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाइलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. खरातच्या या मोबाइलमधून अनेक धागेदोरे समोर येतायेत.
अशोक खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह असल्यानं या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनलाय. खरातचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं ‘डमी’ स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय आहे. तर अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नाहीय. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर येतीय त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालंय.
काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात Top 10 News:
भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला भीषण अपघात झालाय. आज सकाळी नागपूरजवळ एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातातून खासदार पडोळे आणि त्यांचे सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याकरिता खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडाऱ्यातून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. सकाळी त्यांचा ताफा नागपूरजवळील हल्दीराम समोर आला त्याचवेळी मागून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की खासदारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, एअरबॅग्ज आणि वेळेत मिळालेल्या संरक्षणामुळे डॉ. पडोळे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र एकाच मार्गावर आणि एकाच पद्धतीने खासदार पडोळे यांच्यासोबत तिसरा अपघात झाला आहे. त्यामुळे यामागे घातपाताचा कट तर नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जातीय.
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत फुट?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 284 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बंगालमध्ये एकूण 294 जागा असून काँग्रेस या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. मात्र 10 जागांसाठीचे उमेदवार अद्यापह जाहीर केले नाहीये. यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली असून अधीर रंजन चौधरी हे 30 वर्षानंतर ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसची युती होण्याची चर्चा सुरू होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी युती करण्यास नकार दिल्याने काँग्रेस त्यावेळी देखील स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी देखील कॉँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. इंडिया आघाडी म्हणून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हा एकत्र आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इंडिया आघाडी फुटली आहे का? अशा चर्चा सुरू आहे.
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेकडून आता लष्करी हल्ल्याच्या तयारीच्या बातम्या समोर येत असताना इराणने अमेरिकेला आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. पर्शियन गल्फमध्ये कोणतीही सैन्य कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. इराणचे ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्फाघरी यांनी कठोर शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी आरोप केला की डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या दबावाखाली काम करत आहेत. जर अमेरिकेने सैन्य हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकन सैनिक पर्शियन गल्फमध्ये शार्कचं खाद्य बनतील, असा इशाराही त्यांनी दिला.अमेरिकेच्या पेंटॅगॉनकडून इराणविरुद्ध दीर्घकालीन सैन्य मोहिमेची योजना तयार केली जातीय. या योजनेत खर्ग आयलंड आणि होर्मुज सामुद्रधुनीजवळील भागांचा समावेश असू शकतो. मात्र, या योजनेला अंतिम मंजुरी ट्रम्प देतील की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
अमेरिकेत ट्रम्पविरोधात ‘नो किंग्स’ आंदोलन
जगात युद्धाचा भडका उडालाय, पण हे युद्ध आता रणांगणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ज्यांनी जगावर युद्ध लादलं, त्यांच्याच खुर्च्या आता धोक्यात आल्यात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात तब्बल 90 लाख नागरिक ‘नो किंग्स’ आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले.तर इस्रायलमध्येही पंतप्रधान नेत्यानाहूंविरोधात ‘नो वॉर’चे नारे घुमतायत, त्यामुळे आपल्याच देशात ट्रम्प आणि नेत्यानाहू एकटे पडल्याचं दिसतंय. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हुकूमशाहीविरोधात हे तिसरं आंदोलन आहे.
‘नो किंग्स’ची अमेरिकेत 3 हजार ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची धोरणं, वाढती महागाई तसेच इराणसोबतचे युद्ध या मुद्दावरून नागरीकांकडून आंदोलन करण्यात आलं.दुसरीकडे फक्त अमेरिकाच नाही, तर इस्रायलची राजधानी तेल अवीव सुद्धा आंदोलनांनी पेटलीय..पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.”आम्हाला युद्ध नको, शांतता हवी,” म्हणत इस्रायली जनता आपल्याच सरकारला जाब विचारतेय.
मुंबई इंडियन्सची वानखेडेवर विजयी ऐतिहासिक सलामी
आयपीएल 2026 मधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवत हंगामाची विजयी सुरुवात केली. तब्बल 14 वर्षांनंतर मुंबईने स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकत चाहत्यांना मोठी भेट दिली. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दमदार खेळ करत 4 विकेट्स गमावत 220 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. मोठं लक्ष्य उभं राहिल्यानंतर मुंबईवर दबाव असणार असं वाटत होतं, पण रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करत सगळं चित्रच बदलून टाकलं. 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला. मुंबई इंडियन्ससाठी हा विजय अत्यंत खास आहे. 2012 नंतर मुंबईला एकदाही आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. सलग 13 हंगाम सलामीचा सामना हरण्याचा नकोसा विक्रम मुंबईच्या नावावर होता. मात्र, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने हा ‘कलंक’ पुसून काढला आणि विजयाचा गुलाल उधळला.
लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू Top 10 News:
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येतीय. बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. एका गुणी अभिनेत्याच्या अपघाती निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलीय. अभिनेता राहुल बॅनर्जी ओदिशातील तलसारी बीचवर शूटिंग करत होता. शूटिंगसाठी अभिनेता समुद्रात उतरला आणि यादरम्यान त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. राहुल हे ‘भोले बाबा पार करेगा’ या टीव्ही मालिकेच्या शुटिंगसाठी दिघाय उपस्थित असताना ही दुर्दैवी घटना घडली. मालिकेचं शुतुंग संपल्यानंतर राहुल समुद्रात पोहण्यासाठी गेला असता तो लाटांमध्ये अडकला आणि त्यानंतर काही क्षणातच तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता. दरम्यान, एका हरहुन्नरी कलाकाराच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरलीय.





