खरात प्रकरणी पहिला अधिकारी अडचणीत Top 10 News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकारण्यांच्या नंतर शासकीय अधिकारी अडचणीत आल्याचं दिसून आलं. या प्रकरणात आता मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अभिजीत भांडे पाटील असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून मंत्रालयात बदली करण्यात आलीय. अभिजीत भांडे पाटील हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून त्यांचे अशोक खरातशी असलेले संबंध समोर आलेत. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जातीय. अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जातोय. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे. अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा गौप्यस्फोट Baramati Plane Crash अजित पवार जिवंत होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर ब्लॅकमॅजिक झालेले पाहिलं, मुंबईच्या घराबाहेरही झालं. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, दादांची ताकद जावी आणि आपल्याला मिळावी हा हेतू कोणाचा होता हे तपासणं गरजेचं आहे, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी अशोक खरात प्रकरणाकडेही लक्ष वेधलंय. अजित दादांचं ते पद मिळवण्यासाठी कोणी कोणी ब्लॅकमॅजिक केले हे पाहणं महत्वाचं आहे. दादा असताना ते पद मिळणार नाही म्हणून ही काळी जादू केली असा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केलाय. नाशिक प्रकरणात एसआयटी करतात, चुकीच्या व्यक्तीला अटक करतात, जलद कारवाई होते. मग दादांच्या प्रकरणात का होत नाही. दादांच्या पक्षातील नेते सुद्धा काही बोलत नाही हे दुर्दैव आहे. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचाच दबाव म्हणून जय पवार यांची पत्रकार परिषद झाली नाही, असा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केलाय. राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित मुंबईवगळून राज्यभरातील शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. यानुसार एका कुटुंबातील एकच अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. १,५०० चौरस फुटांपर्यंतचे क्षेत्र नियमानुकूल करण्यात येणार असून त्यातील ५०० चौरस फुटांचे अतिक्रमण मोफत नियमित केले जाईल. राज्यात यापूर्वी ४ एप्रिल २००२मध्ये १ जानेवारी १९९५ पूर्वीची शासकीय जमिनीवर झालेली निवासी वा वाणिज्य अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबई वगळून संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी महसूल विभागाने नवीन धोरण तयार केले असून त्याला मान्यता देण्यात आली. राज्यातील ही योजना दीड वर्षांपासून बंद ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद झाली आहे का? असा सवाल राज्यातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्याला कारणही तसेच आहे, मागील दीड वर्षांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील याचं प्रमाण तब्बल ६०० पेक्षा जास्त आहे, दीड दोन वर्षानंतरही वद्धांना या योजनेतून तीर्थदर्शनाला जाता आलेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली होती. निवडणुकीआधी योजना सुरू झाल्यानंतर अनेकांना याचा लाभ मिळाला. अनेक जेष्टांनी देव दर्शन केले. पण सध्या या योजनेसाठी सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहे. राज्य सरकारने योजना बंद झाली की सुरूच आहे, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण या योजनेसाठी आता अर्जही करता येत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली Top 10 News : काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक खालावली. त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीच्या त्रास होत असल्याने सोनिया गांधी यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक खालावली. यानंतर, त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी जानेवारी २०२६ मध्ये सोनिया गांधी यांची प्रकृती लक्षणीयरीत्या खालावली होती. त्यानंतर त्यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करत तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार करण्यात आले होते. सोनिया गांधी यांच्या छातीत त्रास होता, त्यामुळे त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे देखील रुग्णालयात उपस्थित आहेत. डॉक्टरांच्या मते, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या चांगली आहे. एप्रिलमध्ये सोन्याचे दर १ लाखांपर्यंत घसरणार? सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर घसरताना दिसत आहे. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम हा सोन्यावर होताना दिसत आहे. युद्धामुळे सोन्यासोबतच चांदीचेही दर घसरत आहेत. दरम्यान, सोन्याचे दर १ लाखांनी घसरणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, हे दर अस्थिर असण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास ११ टक्क्यांनी घसरले. १९८३ नंतर सोन्याच्या दरात एका आठवड्यात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. जवळपास सलग आठ दिवस सोन्याचे दर घसरलेत. चांदीचेही दर ३ टक्क्यांनी घसरले आहे. भारतात सोन्याचे दर हे रुपया आणि डॉलरवर निर्भर आहेत. सध्या सोन्याचे दर १,४०,००० रुपयांच्या घरात आहेत. तसेच भविष्यत सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात. एकीकडे युद्धामुळे तेलात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे आपोआप सोन्याचे दर घसरत आहेत. अमेरिकेकडून इराणसाठी १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणसोबतच्या सध्याच्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या गंभीर पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेने इराणकडे एक व्यापक १५-कलमी योजना पाठवली आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, हा प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचवण्यात आला असून, पाकिस्तानने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायलच्या चॅनेल १२ने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेत एक महिन्याची युद्धबंदी घोषित करून त्यादरम्यान वाटाघाटी करण्याची तरतूद आहे. या कालावधीत इराणच्या अणुकार्यक्रमावर कडक निर्बंध, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाहतुकीची मुक्तता आणि प्रॉक्सी गटांना पाठिंबा थांबवणे यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. इस्रायलकडून या प्रस्तावाबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली असून, इराण या कठोर अटी मान्य करेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध पाच दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे इराण- अमेरिका संघर्ष थांबणार असल्याचे संकेत मिळत असताना ही चर्चा खुद्द ट्रम्प यांनी फेल ठरवली अन् काही तासातच घुमजाव करत इराणला थेट इशारा दिला.’जर दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली, तर इराणवर पुन्हा बॉम्बफेक करू.. इतकचं काय तर इराणमध्ये सत्तांतर होईल, व्हेनेझुएलाप्रमाणे इराणमध्येही एक नेता शोधला जाईल..आम्ही अशा व्यक्तीशी बोलत आहोत, ज्याला मी सर्वात आदरणीय आणि खरा नेता मानतो. ते इराणमधील सर्वोच्च नेते नाहीत. त्यांच्याबद्दल कोणीही काहीही ऐकलेले नाही.’ अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिलीय. दुसरीकडे युद्ध थांबवण्यासाठी इराणनं अमेरिकेपुढे ज्या दोन अटी ठेवल्या होत्या त्या अटी ट्रम्प प्रशासनाने फेटाळून लावल्या. पहिली अट होती, अमेरिकेने इराणला युद्धाची नुकसान भरपाई द्यावी. तर दुसरी अट होती, अमेरिकेनेच पहिल्यांदा इराणवर हल्ला केल्याचं कबूल करावं. मात्र या दोन्ही अटी अमेरिकेनं अमान्य केल्यानं इराण युद्ध सुरुच ठेवणार आहे… त्यामुळे इराण अमेरिका संघर्ष आता कोणत्या वळणावर पोहचतो आणि ट्रम्प यांचा हाताशी असणारा इराणमधील तो नेता कोण? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलयं. RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ राजस्थान रॉयल्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलासुद्धा नवे मालक मिळाले आहेत. गतविजेत्या आरसीबीला आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट वेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांनी विकत घेतलं आहे. या सर्वांची एकत्रित १०० टक्के भागिदारी आता आरसीबीमध्ये असणार आहे. आरसीबीच्या महिला आणि पुरुष संघाचे मालकी हक्क आता या सर्व ग्रुपकडे असणार आहेत. तब्बल १.७८ बिलियन डॉलर म्हणजेच १६७०० कोटी रुपयांमध्ये हा करार झालाय. यामुळे आरसीबी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरसीबीच्या मालकी हक्काच्या कराराला अद्याप बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीय. २०२६च्या हंगामानंतर आदित्य बिर्ला ग्रुपचे आर्यमन विक्रम बिर्ला हे आरसीबीचे नवे अध्यक्ष असतील. तर टाइम्स ग्रुपचे सत्यान गजवानी हे उपाध्यक्ष असणार आहेत. ‘प्रयत्ने चिंचोकी घासता…’ Top 10 News : महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागलेत. त्यातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवरुन यासंदर्भात एक पोस्ट केलीय. अशोक खरात प्रकरणावर त्यांनी एका ओळीत मार्मिक पोस्ट लिहिलीय. “प्रयत्ने चिंचोकी घासता लाख ही मिळे…”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यापूर्वी मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही पोस्ट लिहून अशोक खरात प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले होते. जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्या आधी ते कोण असतात? असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला. दरम्यान, सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.