Mumbai Indians Record : मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली जगातील पहिली फ्रँचायझी
Mumbai Indians Record : वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक होताच मुंबई इंडियन्सने अशा एका शिखरावर गवसणी घातली आहे

Mumbai Indians 300 T20 Matches Record : आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सुरू झालेल्या लढतीने क्रिकेट विश्वात एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक होताच मुंबई इंडियन्सने अशा एका शिखरावर गवसणी घातली आहे, जिथे आतापर्यंत जगातील कोणतीही फ्रँचायझी टीम पोहोचू शकली नव्हती.
आयपीएलच्या १९ व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरताच मुंबई इंडियन्सने ३०० टी-२० सामने पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या इतिहासात ३०० सामने खेळणारा मुंबई इंडियन्स हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी सामन्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या नावे या विक्रमाची नोंद झाली.
जगातील तिसरा संघ, फ्रँचायझीमध्ये अव्वल!
It’s game No. 300 for Mumbai Indians, as they become only the third team after Pakistan and Somerset.#MIvsKKR #IPL2026 #MumbaiIndians pic.twitter.com/vdqEfm79Me
— OneCricket (@OneCricketApp) March 29, 2026
टी-२० क्रिकेटच्या एकूण इतिहासात ३०० सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्स आता पाकिस्तान (३०३ सामने) आणि समरसेट (३०३ सामने) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईने आतापर्यंत आयपीएलमध्ये २७८ सामने खेळले आहेत, तर उर्वरित २२ सामने चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये खेळले आहेत. या यादीत मुंबईनंतर हॅम्पशायर (२९६) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२८७) यांचा क्रमांक लागतो.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले संघ:
- पाकिस्तान – ३०३ सामने
- सॉमरसेट – ३०३ सामने
- मुंबई इंडियन्स – ३०० सामने
- हॅम्पशायर – २९६ सामने
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – २८७ सामने
हार्दिक आणि रोहितवर मोठी जबाबदारी –
गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्यासमोर संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे. या हंगामात माजी कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. गेल्या वर्षी रोहितची बॅट शांत होती, मात्र ३०० व्या ऐतिहासिक सामन्यात ‘हिटमॅन’ मोठी खेळी करून मुंबईला विजयाची भेट देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





