विलीनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती Top 10 news: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती आहे. विलीनीकरणाची कुजबूजआम्हाला होती. शिवाय शरद पवार विलीनीकरणाबाबत वारंवार जे सांगतात त्यामध्ये तथ्य असल्याचा मोठा दावा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. विलीनीकरणाच्या चर्चेची कुजबूज आपल्याला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अगोदर चर्चा नाही असे म्हणणारे शरद पवार अजित पवारांच्याअकाली निधनाने वारंवार सांगत आहेत की चर्चा होत होती, त्यामध्ये तथ्य असल्याचेहि सरनाईक म्हणाले. राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा अंतर्गत मुद्दा त्यावर जास्त भाष्य करणार नाही, मात्र ही वस्तुस्थिती असल्याचेही सरनाईक म्हणाले. खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यास बंदी राज्यातील सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी व अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलली आहेत . अर्थ विभागाची सूत्रे स्वतःकडे घेताच नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. 25 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही. तसेच नव्या निविदा काढल्या जाणार नाहीत, असे निर्देश वित्त विभागाकडून सर्व विभागांना दिलेत. फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक, उपकरणे, सुटे भाग, भाड्याने कार्यालय घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा आदी बाबींवरील खर्चाचा समावेश आहे. मात्र, औषधे खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाला औषध खरेदीसाठी परवानगी देण्यात आली असून, केंद्र पुरस्कृत योजना, त्याअंतर्गत राज्य हिस्सा तसेच बाह्य सहाय्यित प्रकल्पांतील खरेदी प्रस्तावांनाही सूट देण्यात आली आहे. आम्ही एनडीए सोबत कायम अजित दादांचा निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. आम्ही एनडीएमध्ये आहोत, ज्यांना आमच्याबरोबर यायचे आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा. त्यावर चर्चा केली जाईल असं सुनील तटकरे म्हणाले. रायगडमध्ये बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “गेली अडीच वर्षे आम्ही एनडीएमध्ये म्हणजे भाजपसोबत आहोत. आमचा सहभाग हा एनडीएमध्ये कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा. त्यानंतर यावर चर्चा होऊ शकेल.” चंद्रपूर महापौरपदाच्या वादावर दिल्लीत तोडगा राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिका महापौरपदासाठी अखेर दिल्लीत तोडगा निघालाय. यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला. तर जो गट सोबत येईल त्यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय. बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्यानं त्याची जमावाजमव करण्याची जबाबदारी ही धानोरकरांच्या खांद्यावर टाकण्यात आलीय. चंद्रपुरात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादामुळे महापौरपदाचा तोडगा निघत नव्हता. शेवटी विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या 18 समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली. तिथे खेर तोडगा निघालाय. C-TET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट Top 10 news: ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून, तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदानाची तारीख निश्चित करुन शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी ड्युटी लावली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं तारखांमध्ये बदल करण्यात आला. यामुळं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली होती. त्यावरच तोडगा काढत आयोगाने शिक्षकांना सूट दिलीय. शिंदेंच्या आमदाराकडून भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्यभर जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जात आहेत. या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘माझा नाद नाही करायचा, थांब तुझी एन्क्वायरीच लावतो…’,असे म्हणत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवाराला दम दिला. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट निशाणा साधला. सभास्थळी येताना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून संताप व्यक्त करत, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, त्यांचा धमकी दिल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाणार? जानेवारी महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, जानेवारीचा हप्ता अजून महिलांना मिळाला नाही.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं जात होतं. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ७ तारखेला मतदान आणि ९ तारखेला निकाल लागणार आहे. असा परिस्थितीतही अजूनही योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा हफ्ता लांबणीवर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येतीय. निंबाळकरांच्या विधानाने ठाकरे गटअडचणीत ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत असतात. निवडणुकीतील पराभवाचं खापर सर्रासपणे विरोधक ईव्हीएमवर फोडतात. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएमची पाठराखण केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएममधील घोटाळ्याचे दावे फेटाळून लावले. ते म्हणाले, “जर ईव्हीएममध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? मोदी साहेबांसाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची होती. मग तिथे घोळ करून मला पाडले नसते का? मी खासदार झालो याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा नाही.” “ईव्हीएममध्ये घोळ नाही, मात्र जागरूक राहणे गरजेचे आहे.असं त्यांनी म्हटलंय.त्यांच्या या विधानानं पक्षाची चांगलीच गोची झालीय. काँग्रेसचे सात, माकपचा एक खासदार निलंबित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजे काल लोकसभेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भारत-चीन वादाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून गोंधळ घालण्यास सुरूवात झाली. त्यानंतर काँग्रेसच्या काही खासदारांनी पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकावले. त्यामुळे पीठासन सभापतींनी काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदाराला अधिवेशनाच्या कार्यकाळापर्यंत निलंबित केलं. यामध्ये काँग्रेसच्या गुरदीप सिंह औजला, मणिकम टागोर ,अमरिंदर सिंह राजा वारिंग, किरण कुमार रेड्डी, हिबी ईडन, डीन कुरियाकोस , प्रशांत पडोले यांचा तर माकपाच्या एस वेंकटेशन या खासदारांचा समावेश आहे. ब्राझीलमध्ये भीषण रस्ता अपघातात १५ जणांचा मृत्यू Top 10 news: ब्राझीलमध्ये एक भीषण रस्ता अपघात झालाय, ज्यामध्ये १५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. ईशान्य ब्राझीलमधील अलागोस राज्यातील ग्रामीण भागात हा अपघात झाला. ६० यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस वळणावर जाताना रस्त्याने उलटली. या अपघातात मुले आणि महिलांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. बस उलटल्याने काही प्रवासी बाहेर पडले, तर काही बसखाली चिरडले गेले. बस क्रेनने सरळ करण्यात आली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी १५ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.