राज्यभरात इंधन टंचाईचं संकट तीव्र Top 10 News: एकीकडे राज्यात पेट्रोल-डिझेलसाठी रांगा पाहायला मिळतायत. पण दुसरीकडे याच रांगांवरून राजकारणही रंगतंय. पण या सगळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतोय तो सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाच. असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र देशात पुरेसा इंधनसाठा असल्याचं विधान केलंय. तर सरकारमधील काही मंत्र्यांनी इंधनटंचाईला साठेबाजी जबाबदार असल्याचं म्हटलंय. असं असलं तरी या साऱ्यामुळे राज्यभरात इंधन टंचाईचे भीषण संकट अधिक तीव्र होताना दिसतय. आधीच निसर्गाच्या लहरीपणानं हैराण झालेला बळीराजा आता पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या नव्या संकटामुळे पुरता हतबल झाला आहे. राज्यात अनेक भागात डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर बंद पडलेत. ज्याच्याकडे डिझेल इंजिननं पाणीउपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये. तर शेतमाल बाजारात नेण्यासाठीही शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसतोय. सीबीआयची डॉ.मनोज शिरुरेच्या घरी धाड नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉ. मनोज शिरुरे यांच्या संदर्भातील तपास अधिक तीव्र झाला असून सीबीआयच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी पुन्हा धाड टाकली आहे. काल सकाळी लातूरमध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक अंबाजोगाईकडे रवाना झाले होते. अंबाजोगाई येथे काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झाले. शिरुरे यांच्या हॉस्पिटललगत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे सापडल्याचे समजते. संबंधित साहित्य सीबीआयने ताब्यात घेत पुढील तपासासाठी सोबत नेले. महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश पोलीस स्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफा रशींनुसार तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचा विचार करून जारी करण्यात आलेत. या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या मोठ्या फेरबदलामध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ज्यामध्ये शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे,विनीता साहू यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. NEET ची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच देशभरात गेली? Top 10 News: शिवाजी मोटेगावकरनं NTAच्या मुख्य पॅनेलमध्येच आपली माणसे पेरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच फोडण्यात आल्याचं उघड झालंय. पुण्यातूनच ही प्रश्नपत्रिका राजस्थानमार्गे देशभरात पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासात उघडकीस झालंय. आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाईल्स गुरुग्राममार्गे राजस्थानपर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे, नीट परीक्षेच्या प्रश्नांसाठी तब्बल लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचंही सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालंय. भाजपाची सत्ता कधी जाणार? २०१४ नंतर भाजपा सातत्याने यशाची शिखरे गाठत असताना भाजपाचाही पराभव होऊ शकतो, असा अंदाज ॲक्सिस माय इंडियाचे संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी वर्तवला आहे. जोपर्यंत सरकारची कामगिरी चांगली आहे, तोपर्यंत भाजपा सत्तेतून बाहेर जाणार नाही, असे विधान गुप्ता यांनी केले आहे. प्रदीप गुप्ता यांच्या ॲक्सिस माय इंडिया या संस्थेने अनेक निवडणुकांच्या एक्झिट पोलचे अचूक अंदाज वर्तवले होते.भाजपाला मोठा जनाधार मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपा आणि एनडीएला आता आणखी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. जोपर्यंत त्यांची कामगिरी खालावत नाही, तोपर्यंत भाजपाचा विजय होत राहील आणि विरोधकांना पराभवाचा सामना करत राहावा लागेल, असेही गुप्ता म्हणाले. कॉकरोच जनता पार्टीने ध्रुव राठीलाही केलं ओव्हरटेक देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. गेल्या 15 मे रोजी स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला असून फक्त आठ दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे एक कोटी 18 लाख 70 हजार फॉलोअर्स झाले आहेत. समाज माध्यमाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीने फॉलोअर्सचा मिळवलेला हा सर्वाधिक आकडा आहे. देशातील सर्वात अधिक लोकप्रिय असलेला ब्लॉगर ध्रुव राठी यालाही कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत ओव्हरटेक केलं आहे.तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे. कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे. रॉयटर्सच्या अंदाजानुसार या पुनर्रचनेमुळं बँकेच्या 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 7000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जगभरात 82 हजारांहून अधिक लोक काम करतात. बँकेचे सीईओ बिल विंटर्स यांच्या मतानुसार हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी नसून तंत्रज्ञानाच्या बदलाचा भाग आहे. युद्धावरून ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात मतभेद अमेरिका-इराण युद्धामध्ये एकीकडे इराणची आण्विक कार्यक्रमावरून भूमिका अद्याप ताठर असताना दुसरीकडे अमेरिका-इस्रायलमध्येच तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यामध्ये तणावपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त अमेरिकेच्या ‘ॲक्सिऑस’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ट्रम्प यांच्याबरोबर फोनवर बोलणे झाल्यानंतर नेतान्याहू संतापले होते; तसेच इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याऐवजी लवकरात लवकर शांतता करार करण्याकडे अमेरिकेचा कल असल्याचे वृत्तात म्हटले आहे. याउलट, नेतान्याहू इराणवर पुन्हा हल्ले करून इराणची लष्करी क्षमता क्षीण करून पायाभूत सुविधा नष्ट कराव्यात, यावर ठाम आहेत. मुंबईनंतर चॅम्पियन्स चेन्नईनेही गाशा गुंडाळला! 18 वर्षं चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर संपला. अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्सने 50 धावांनी पराभव करत CSKच्या स्वप्नांना पूर्णविराम दिला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकत चाहत्यांची निराशा केली. प्रत्येक हंगामात प्लेऑफची सवय लावणारी ही टीम यंदा मात्र संघर्ष करताना दिसली. प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी CSK ला विजयाची गरज होती. मात्र त्यांना यात अपयश आले. संघाला ८९ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. दरम्यान , धोनीच्या सावलीत वाढलेला हा संघ बाहेर पडताना चाहत्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा भावनांचा पूर आणून गेला. ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला Top 10 News: ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिल्या पोस्टरपासूनच सर्वत्र चर्चा होत आहे. यामध्ये कोणते कलाकार झळकणार? या सिनेमाची कथा नेमकी काय असेल? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. रहस्य, भीती, गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळतेय.चित्रपटातील गावकऱ्यांमध्ये एकापेक्षा एक अतरंगी कलाकार दिसत असून यामध्ये जितेंद्र जोशी, ओम भूतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. मात्र, या सगळ्यात ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गूढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेमकं पात्र काय आहे? तिची गोष्ट काय आहे? असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठा वाढवतो.