Top 10 News : घरगुती गॅस महागला ते युद्धाला १२ मार्चला मिळणार पूर्णविराम?; जाणून घ्या Top 10 News एका क्लिकवर…

Top 10 News : 1. घरगुती गॅस ६० रुपयांनी महागला; व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारतावरही होऊ लागला आहे. आज ७ मार्च, शनिवारपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर होते. काल रात्री उशिरा अचानक ही दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे आता गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वधारल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता १८८३ रुपयांना मिळणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस महागल्याने आता बाहेरचे जेवणही महागण्याची शक्यता आहे.
2. UPSC मध्ये अनुज अग्निहोत्री देशात पहिला; कोचिंगविना मिळवले यश!
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर झाला असून, राजस्थानच्या रावतभाटा येथील अनुज अग्निहोत्री याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ९५८ उमेदवारांच्या निवडीमध्ये अनुजने हे यश मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एम्स जोधपूरमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुजने प्रशासकीय सेवेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. विशेष म्हणजे, कोणत्याही खाजगी कोचिंगविना केवळ ऑनलाइन अभ्यासाच्या जोरावर त्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली.
पहिल्या प्रयत्नात त्यांची निवड DANICS साठी झाली होती. यासाठी ते दिल्लीमध्ये ट्रेनिंगदेखील करत होते. परंतु त्यांनी या यशाला मागे टाकत पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि तो आज देशातील अव्वल आयएएस (IAS) अधिकारी बनला आहे. त्याचे वडील टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. Top 10 News :
3. शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ‘तकलादू’; राजू शेट्टींची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ही कर्जमाफी ‘तकलादू’ असल्याचे म्हटले आहे. “राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दोन लाखांवरील रक्कम शेतकरी कुठून भरणार? ही योजना शेतकऱ्यांसाठी की बँकांसाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
4. बळजबरीने धर्मांतर केल्यास होणार तुरुंगवास; राज्य सरकारचा नवा कायदा
राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर महिला, अल्पवयीन आणि अनुसूचित जाती-जमातींचं धर्मांतर केल्यास दोषींना अधिक कठोर शिक्षा ठोठावली जाईल.
राज्यात अनेक ठिकाणी बळजबरीनं आणि चुकीची माहिती देऊन धर्मांतर झाल्याचं उघड झालं होतं. तसंच धर्मांतरामुळे सांस्कृतिक ओळख बदलण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायद्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. त्यानुसार आता धमकी, खोटी माहिती किंवा आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणे गुन्हा मानला जाणार आहे.
मात्र या विधेयकावरून राजकीय वाद सुरू झाले आहेत. राज्य सरकारचं विधेयक आणि प्रस्तावित कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
5. दोनपेक्षा जास्त मुले जन्मल्यास मिळणार 25,000 रुपये!
वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या पारंपारिक धोरणाला फाटा देत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्याचा प्रजनन दर १.५ पर्यंत खाली घसरल्याने चिंता व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी नवीन ‘लोकसंख्या व्यवस्थापन धोरण’ विधानसभेत मांडले.
या धोरणानुसार, ज्या कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले जन्माला येतील, अशा मातांना प्रसूती काळात सरकारकडून २५,००० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. राज्यातील ५८% कुटुंबांकडे सध्या केवळ एकच मूल असून, जन्मदर असाच कमी राहिल्यास भविष्यात तरुणांची संख्या घटून वृद्धांची लोकसंख्या वाढण्याची भीती नायडू यांनी व्यक्त केली आहे. याचा थेट फटका राज्याची अर्थव्यवस्था, शेती आणि उद्योगांमधील मनुष्यबळाला बसू शकतो.
तसेच, दक्षिण भारतातील लोकसंख्या घटल्यास लोकसभेतील राज्याचे प्रतिनिधित्वही कमी होऊ शकते, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
6. जुनी वाहने मोडीत काढल्यास नवीन खरेदीवर करसवलत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने ‘स्क्रॅपिंग’ धोरणाला चालना दिली असून, जुन्या वाहनांवरील पर्यावरण कर (ग्रीन टॅक्स) थेट दुप्पट केला आहे. यानुसार, जुन्या दुचाकींवरील कर २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये, तर पेट्रोल कारसाठी ६ हजार आणि डिझेल कारसाठी ७ हजार रुपये कर मोजावा लागणार आहे.
मात्र, जुनी वाहने मोडीत काढून नवीन वाहन घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बीएस-३ मानकांची वाहने मोडीत काढल्यास नवीन खरेदीवर वाहन करात ३०% सूट, तर बीएस-४ वाहनांसाठी १६% सूट जाहीर करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी होते. महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसात होते. त्यामुळे कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी केल्यास आता ५ हजार रुपयांऐवजी १ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. यामुळे कमी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी करण्याचे प्रमाण नियंत्रणात येऊन महसूलात वाढ होऊ शकतो.
7. इराण-इस्रायल युद्धाला १२ मार्चला मिळणार पूर्णविराम?
इराण आणि इस्रायलमधील भीषण युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने युद्धविरामाचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर इराणने विनाअट शरणागती पत्करल्याशिवाय करार होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या विधानामुळे १२ मार्च २०२६ पर्यंत युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, इराणने शरणागती पत्करल्यानंतर आणि एका नवीन योग्य नेत्याची निवड झाल्यानंतर, अमेरिका इराणची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी काम करेल. त्यांनी ‘Make Iran Great Again’ (MIGA!) असा नारा दिला आहे.
यामागे जुना पॅटर्न आहे असे म्हटले जात आहे. १७ जून २०२५ रोजी जेव्हा इराण-इस्रायलमध्ये १२ दिवसांचे युद्ध सुरू होते, तेव्हाही ट्रम्प यांनी “विनाअट शरणागती” अशीच मागणी केली होती. त्या पोस्टच्या बरोबर ६ दिवसांनंतर, म्हणजेच २३ जून रोजी युद्धबंदीची घोषणा झाली होती. जर हाच ‘६ दिवसांचा पॅटर्न’ पुन्हा लागू झाला, तर ६ मार्च रोजी केलेल्या या नव्या पोस्टनंतर १२ मार्च २०२६ पर्यंत युद्धविराम घोषित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
8. हुकूमशहा किम जाँग उन यांची नवी विनाशकारी तयारी
मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे आधीच तणाव असताना आता कोरियन बेटावर युद्धाचे ढग गडद झाले आहेत. ९ मार्च रोजी अमेरिका आणि दक्षिण कोरिया संयुक्त सैन्य सराव करणार असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी ‘Choe Hyon’ या ५ हजार टन वजनाच्या अत्याधुनिक विनाशक युद्धनौकेचे अनावरण केले आहे.
या युद्धनौकेवरून स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी करून किम यांनी अमेरिका आणि मित्रराष्ट्रांना थेट आव्हान दिले आहे. ही युद्धनौका प्रगत एअर डिफेन्स सिस्टम आणि रडारने सज्ज असून समुद्र, हवा आणि जमीन अशा तिन्ही स्तरांवरून शत्रूचा खात्मा करण्यास सक्षम आहे.
या युद्धनौकेत आधुनिक एअर डिफेन्स सिस्टम प्रणाली आहे. जे शत्रूच्या फायटर जेट, ड्रोन आणि मिसाइलला हवेतच मारण्याची क्षमता ठेवते. या युद्धनौकेत प्रगतशील रडार आणि सेंसर लावण्यात आले आहेत.
किम जाँग उन यांनी उचलेलं पाऊल केवळ नियमित चाचणी म्हणून पाहिले जात नाही तर अलीकडेच इराणवरील अमेरिकन हल्ल्यांना थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर म्हणून मानले जाते.
9. रोहित शेट्टीच्या घरावर लोणकर बंधुंच्या सांगण्यावरून गोळीबार
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मकोका अंतर्गत प्रवीण लोणकर याला अटक केली होती.
अशातच लोणकर बंधुंच्या सांगण्यावरून रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी प्रवीण लोणकरचा ताबा मिळावा यासाठी परवानगी घेतल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी आता प्रवीण लोणकर याचा ताबा घेतला असून, तपासादरम्यान आरजू बिश्नोई हे नवीन नाव समोर आले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी प्रवीण लोणकरनेच रोहित शेट्टीवरील हल्ल्यासाठी शस्त्रे आणि पैसे पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई सध्या फरार असून त्यांना ‘वॉन्टेड’ घोषित करण्यात आले आहे.
10. फायनलसाठी अंपायर्स-रेफरीची घोषणा!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक अंतिम लढतीसाठी आयसीसीने अंपायर्सची घोषणा केली आहे. इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स व्हार्फ यांच्यावर ‘ऑन-फील्ड अंपायर’ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रिचर्ड इलिंगवर्थ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये अंपायरिंग करणार आहेत. जेव्हा भारताने विश्वविजेतेपद पटकावले होते, ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद मिळवले होते.
दुसरीकडे, इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज एलेक्स व्हार्फ हे पहिल्यांदाच वरिष्ठ पुरुष विश्वचषक फायनलमध्ये अंपायरिंग करणार आहेत. या दोघांनीही कोलकाता येथे पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका उपांत्य सामन्यात पंच म्हणून काम पाहिले होते. आता या हाय-व्होल्टेज सामन्यात पंचांच्या निर्णयांकडेही सर्वांचे बारीक लक्ष असेल.
हेही वाचा:
Rohit Pawar : “शेतकऱ्यांची फसवणूक आणि…”; कर्जमाफीवरून रोहित पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?







