Top 10 News : साखर स्वस्त होणार? ते ४ वर्षांखालील मुलांना ‘ही’ औषधे देऊ नका..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या…
Top 10 News : साखर स्वस्त होणार? ते ४ वर्षांखालील मुलांना ‘ही’ औषधे देऊ नका..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या...

Top 10 News : १) राज्यात साखर स्वस्त होणार? सरकारकडून केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव
ऐन सणासुदीत साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण आलाय. देशातील अनेक भागांत साखरेचा दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतलाय. वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी खाण्यासाठीची आणि व्यावसायिक वापरासाठीची साखर वेगळी करावी, अशी मागणी करण्यात आलीय. खाण्यासाठीच्या साखरेसाठी स्वतंत्र कोटा ठेवून तिचा दर कमी ठेवावा, तर बिस्किटे, शीतपेयांसह उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेसाठी स्वतंत्र व्यावसायिक दर निश्चित करावा, असा प्रस्ताव आहे. दरम्यान, साखर आयातीबाबतही केंद्र सरकारकडून नियोजन सुरू आहे. तसेच ऊसाची FRP आणि साखरेची MSP लिंक करण्याची मागणी राज्य सरकारने केलीय. (Top 10 News)
२) ग्रामसेवकांना मोठा दणका; राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामसेवक अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतलीय. राज्यातील सर्व ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता बायोमेट्रिक आणि GPS प्रणालीद्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य करण्यात आलेय. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. ग्रामसेवक वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय कामे प्रलंबित राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. यापूर्वीही बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली होती, मात्र काही ठिकाणी त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. आता डिजिटल पद्धतीने हजेरीची सक्ती करण्यात आलीय. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. (Top 10 News)
३) बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. कोल्हापुरातील तेली समाजाच्या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी बावनकुळे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले असून, त्यांच्या कामाच्या वेगाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झालाय. “आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे,” असेही ते म्हणाले. बावनकुळे सत्ताधारी पक्षात असल्याने समाजाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांची अधिक असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. तेली समाजासाठी महामंडळ स्थापन करून मोठा निधी द्यावा, संताजी महाराजांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात समाज भवन उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पारंपरिक तेल व्यवसायासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्याचे आवाहनही त्यांनी बावनकुळेंना केले. “बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. (Top 10 News)
४) रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर परिसरात आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहायक अजित दशावतारे यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीय. पोलिसांच्या माहितीनुसार, २२ ऑगस्टच्या रात्री मुलगी घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला असता, रुई परिसरातील स्वामी समर्थ रेसिडेन्सीजवळ ती मृतावस्थेत आढळली. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांच्या पथकांनी तपास केला. CCTV फुटेजमध्ये मुलगी रात्री ९.५८ वाजता लिफ्टने इमारतीच्या गच्चीवर गेल्याचे दिसून आले. सकाळी बिल्डिंगच्या बाजूला मुलगी मृतत अवस्थेत आढळून आली. या घटनेने बारामती तालुक्यात खळबळ उडालीय. (Top 10 News)
५) पालकांनो सावधान! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधे देऊ नका; केंद्राचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चार वर्षांखालील मुलांना क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेली काही सर्दी-खोकल्याची संयुग औषधे देण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. या औषधांच्या लेबलवर, पॅकेज इन्सर्टवर आणि जाहिरात साहित्यावर चार वर्षांखालील मुलांसाठी वापरू नये, असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तज्ज्ञ समिती आणि ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या औषधांच्या मिश्रणामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देऊ नयेत. औषध घेण्यापूर्वी त्यावरील घटक आणि वयोमर्यादा तपासणेही आवश्यक आहे. (Top 10 News)
६) डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा, ‘होर्मुज खाडी अमेरिकेचा भाग’ म्हणत इराणला थेट आव्हान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडालीय. ट्रम्प यांनी होर्मुज खाडी अमेरिकेचा भाग असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. इराणसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या जलमार्गावरून दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणनेही तीव्र प्रतिक्रिया दिली असून, अमेरिकेची भूमिका बदलत नाही तोपर्यंत होर्मुज खाडी खुली केली जाणार नाही, असा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून होर्मुज खाडीबाबत अमेरिकेचा दावा केला होता. जगातील महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या या खाडीवरून अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढल्यास त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावरही होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
७) Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन, दररोज 2GB डेटा आणि ‘हे’ खास फायदे
Jio ने ग्राहकांसाठी 999 रुपयांचा भन्नाट प्रीपेड प्लॅन आणलाय. या प्लॅनची वैधता तब्बल 98 दिवस असून, दररोज 2GB हाय-स्पीड डेटा म्हणजे एकूण 196GB डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMSची सुविधा आहे. विशेष म्हणजे Jio Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन, 50GB क्लाउड स्टोरेज आणि Google Gemini AI Proसह विविध AI सुविधांचा लाभही मिळतो. 5G फोन आणि नेटवर्क उपलब्ध असल्यास अनलिमिटेड 5G डेटाचाही फायदा मिळू शकतो. दुसरीकडे Airtelचा 979 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसाठी आहे. यात दररोज 2GB डेटा, कॉलिंग, 100 SMS, अनलिमिटेड 5G, Xstream Playद्वारे OTT ॲक्सेस, Adobe Express Premium आणि इतर फायदे मिळतात. त्यामुळे जास्त वैधतेसाठी Jio, तर OTT फायद्यांसाठी Airtel विचारात घेता येईल. (Top 10 News)
८) टाटा मोटर्सच्या कार महागणार? १ सप्टेंबरपूर्वी बुकिंगचा फायदा मिळणार?
नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कार आणि SUVच्या किमतीत १ सप्टेंबर २०२६पासून २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांनाही लागू होणार आहे. उत्पादन खर्च, महागाई आणि वाढता ऑपरेटिंग खर्च यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितलेय. या दरवाढीत Tiago, Altroz, Tigor, Punch, Nexon, Curvv, Sierra, Harrier आणि Safari यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक मॉडेल्सच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटच्या किमतीही वाढणार आहेत. कंपनीने अद्याप प्रत्येक व्हेरिएंटनुसार नवीन किंमती जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे १ सप्टेंबरपूर्वी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना जुन्या किमतीचा फायदा मिळू शकतो, मात्र यासाठी डीलरची बुकिंग पॉलिसी आणि बुकिंगची तारीख महत्त्वाची ठरणार आहे. (Top 10 News)
९) रिलीजपूर्वीच यशच्या ‘टॉक्सिक’ची जोरदार कमाई; अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवा रेकॉर्ड!
साऊथ सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. २१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या बुकिंगमध्ये भारतात आतापर्यंत ४.७३ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचे सांगितले जात असून, थेट अॅडव्हान्स बुकिंगमधून सुमारे १८.८४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. राखीव सीट्सचा समावेश केल्यास ही कमाई २७ कोटींच्या पुढे गेल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटकात चित्रपटाची सर्वाधिक क्रेझ असून अनेक शो वेगाने हाऊसफुल्ल होत आहेत. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा पॅन-इंडिया अॅक्शन थ्रिलर २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. (Top 10 News)
१०) देवदत्त पडिक्कलचे श्रीलंकेत सलग दुसरे शतक; टीम इंडियाचा नंबर-३ चा प्रश्न मिटवला!
कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटीत १६७ धावा करणाऱ्या पडिक्कलचे या मालिकेतील हे सलग दुसरे शतक ठरले. भारताची अवस्था २ बाद ६६ अशी असताना, पडिक्कलने कर्णधार शुबमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्याने १६८ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाची डोकेदुखी मिटली असून, दुखापतग्रस्त साई सुदर्शनसमोरील अडचणी वाढल्या आहेत. (Top 10 News)




