TOP 10 NEWS: शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? ते ग्राहकांसाठी दिवसाला डिझेल खरेदीवर मर्यादा; जाणून घ्या आजच्या Top 10 News
TOP 10 NEWS: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी...

TOP 10 NEWS: 1. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. हे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही हायकमांडने दिल्लीला बोलावण्यात आले आहे. याबाबत नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर सेक्युलर आघाडी उभी करण्यासाठी पवार साहेब, तृणमूल काँग्रेस हे सगळे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं, या मानसिकतेत आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी या सगळ्यांकडून यासंदर्भात विचारमंथन सुरु आहे. सेक्युरल मतांना एकत्रित करणे, सेक्युलर विचार संपवणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे ह एकमेव अजेंडा आहे. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं आणि पाळंमुळं खोदण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
2. मुंबईला मान्सूनची मुंबईला प्रतिक्षाच! १४-१५ जूननंतर पावसाची शक्यता
मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असून, त्याने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालचा भाग व्यापून गुरुवारी बिहारमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, मुंबईकरांना मान्सूनसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून असली, तरी यंदा अद्याप पावसाची चिन्हे नाहीत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १४ ते १५ जूननंतर मुंबईत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि १८ जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. तोपर्यंत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागेल. यामुळे काही दिवस राज्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागेल.
3. “आतापर्यंत समजून घेतलं, यापुढे अनावश्यक हस्तक्षेप झाला तर…”
राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापन दिन पार पडला. अजित पवार यांच्या निधनानंतरचा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन असल्याने सुनेत्रा पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षातील नेत्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. “आतापर्यंत जे काही घडलं ते समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर त्याचा विचार केला जाईल. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, काम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी त्याला न्याय आणि संधी मिळणार याची खात्री देते, असं आश्वासनही सुनेत्रा पवारांनी दिलं.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अजितदादा ज्या प्रमाणे कठोर निर्णय घ्यायचे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. ते माझ्या स्वभावाला जड जाईल, पण दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल,” असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
4. पोहण्याचा सराव करण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
पोहण्याचा सराव करण्यासाठी जलतरण तलावात गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील स्वामी समर्थ स्विमिंग टँक येथे बुधवारी दुपारी घडली. यशचे वडील महेश गायकवाड यांनी त्याला पोहण्याच्या सरावासाठी आणले होते. दुपारी तीनच्या सुमारास यश इतर मुलांसोबत पोहत असताना अचानक बेपत्ता झाला. सुरुवातीला तो चेंजिंग रूममध्ये गेला असावा असे सांगण्यात आले, मात्र परिसरात न सापडल्याने संशय बळावला.
अखेर पाण्याच्या तळाशी शोध घेतला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने उरुळी कांचन येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तलावातील सुरक्षेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी स्विमिंग पूलचे मालक, त्यांचे वडील आणि कोच यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
5. कॉमेडीच्या नावाखाली मोठी चूक; अखेर गुन्हा दाखल
स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान ३७० रुपयांच्या बिर्याणी संदर्भातील वक्तव्य करणारा हिमांशू जांग्रा, वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांच्या अवयवांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारी डॉक्टर सेजल पवार आणि कॉमेडियन प्रणीत मोरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे, हिमांशू जांग्रा आणि केईएम रुग्णालयाची डॉक्टर सेजल पवार यांच्याविरुद्ध गुन्हादाखल केला आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर अश्लील, आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही (NCW) विविध प्रकरणांची गंभीर दखली घेतली असून प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रा यांना समन्स बजावले आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे आता या तिघांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
6. गृहिणी नाही तर ‘राष्ट्रनिर्मात्या’! त्यांच्या कामाचे मूल्य दरमहा ३० हजार रुपये
कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या गृहिणींना समाजाने ‘राष्ट्रनिर्मात्या’ (नेशन बिल्डर) म्हणून ओळखले पाहिजे, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एका रस्ते अपघातातील विमा दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एखाद्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यास, तिने कुटुंबासाठी केलेल्या घरगुती सेवेचे व संगोपनाचे मूल्य दरमहा किमान ३०,००० रुपये गृहीत धरूनच नुकसानभरपाई निश्चित केली जावी.
याद्वारे न्यायालयाने गृहिणींना कुशल-अकुशल कामगारांच्या बरोबरीने मानण्याची जुनी पद्धत मोडीत काढली आहे. घराचे कामकाज आणि अस्तित्वच गृहिणीवर अवलंबून असल्याने कुटुंबातील कमावते सदस्यच तिच्यावर पराधीन असतात, असे सांगत खंडपीठाने पंजाबमधील २००१ च्या अपघाती मृत्यू प्रकरणात कुटुंबाला दिलासा दिला.
7. ग्राहकांसाठी दिवसाला डिझेल खरेदीवर मर्यादा
पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन महागले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतात डिझेलची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ११ जून २०२६ रोजी एक कठोर आदेश जारी केला आहे. किरकोळ बाजारात डिझेल ९५.२० रुपये आणि ठोक बाजारात १३४.५० रुपये अशा ३९ रुपयांच्या मोठ्या फरकामुळे कारखाने व टेलिकॉम टॉवर्ससारखे बडे ग्राहक किरकोळ पेट्रोल पंपांवरून खरेदी करत होते, ज्यामुळे टंचाई निर्माण झाली होती.
आता या व्यावसायिक ग्राहकांना थेट पंपांवरून डिझेल खरेदी करण्यास पूर्ण बंदी असून त्यांना केवळ ठोक केंद्रांवरूनच खरेदी करावी लागेल. नव्या नियमांनुसार, एका वाहनाला दिवसाला कमाल २०० लीटर डिझेल मिळेल, ते केवळ टाकीतच भरून दिले जाईल आणि पुनर्विक्रीवर बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत’ थेट फौजदारी कारवाई केली जाईल.
8. भारतीय जहाजांवर अमेरिकेचे हल्ले; 3 खलाशांचा मृत्यू
अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये तीन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत भारतीय कर्मचारी असलेल्या तीन जहाजांना लक्ष्य करण्यात आले असून, यात आदित्य शर्मा, अभियंता पी. सुरेश आणि शिवानंद चौरसिया यांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ‘एमटी स्टॅबिलो’ जहाजावरील हल्ल्याची कबुली देणारे ड्रोन फुटेज जारी केल्यानंतर, भारत सरकारने नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावून निषेध नोंदवला आहे.
याशिवाय ‘एमटी मारिव्हेक्स’ आणि ‘एमटी जलवीर’ या जहाजांवरही हल्ले झाले असून, त्यावरील सर्व २४ भारतीय खलाशांना ओमान तटरक्षक दलाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. इराणच्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेनं ही कारवाई केली. इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे ओमानच्या आखातातील परिस्थिती कमालीची संवेदनशील बनली असून भारताने हे हल्ले तातडीने थांबवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
9. भारतीय वंशाच्या निखिल चौधरीची ऑस्ट्रेलियन टी-२० संघात निवड
भारतीय वंशाचा ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडू निखिल चौधरीची बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली आहे. विश्रांती देण्यात आलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेला निखिल, २०२० मध्ये काकांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, मात्र कोविड लॉकडाऊनमुळे तिथेच अडकला.
पुढे त्याने तिथेच राहून ग्रेड क्रिकेट आणि होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना बिग बॅश लीग (२०२४-२५) चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शेफिल्ड शील्डमध्ये शतक आणि पाच बळी घेणाऱ्या निखिलकडे अद्याप ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाही, परंतु आयसीसीच्या रहिवासी अटींची पूर्तता केल्यामुळे तो पात्र ठरला आहे. १७ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल.
10 .’सूरज चव्हाण देणार धप्पा, टॉपचा किंग होणार पप्पा’
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याच्या घरी लवकरच एका नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सूरजने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कॉलर उडवत “नमस्कार जय महाराष्ट्र. तुमचा सूरज भाऊ आज लय खूश आहे. लय आनंदात आहे. टॉपचा किंग तुमचा बाबा होणारे म्हणजेच तुमचा सूरज चव्हाण देणार धप्पा, टॉपचा किंग होणार पप्पा,’ असे हटके अंदाजात सांगितले.
तसेच या व्हिडिओवर त्याने मी बाबा होणार असे कॅप्शन दिले आहे. तसेच, त्याची ‘बिग बॉस’मधील सह-स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सुरजची पत्नी संजनाच्या पारंपरिक ‘चोर ओटी’ कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सूरज आणि संजना या आनंदाच्या बातमीवर सोशल मीडियावरून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:
Black Pepper: उन्हाळ्यात काळी मिरी खावी की टाळावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे







