Top 10 News: अजितदादांच्या राष्ट्रवादीत धूसफूस?, इबोला व्हायरसची भारतात एन्ट्री आणि ‘रुपाली चाकणकरांचा रोल न करण्यासाठी मला धमक्या’, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नुकतीच झालेली बैठक कमालीची वादळी ठरली...उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय़....

अजितदादांच्या राष्ट्रवादीत धूसफूस? ;
राष्ट्रवादीच्या बैठकीला पटेलांची दांडी
Top 10 News: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नुकतीच झालेली बैठक कमालीची वादळी ठरली…उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय़….अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि नेत्यांमधील मतभेद या बैठकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेत.पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले…त्यामुळे बैठकीत पटेलांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं… “अजितदादांच्या निधनानंतर आम्हीच नेहमी टीकेचे धनी का व्हायचं? आमच्यावर सतत टीका होत असताना पक्षातील कुणीही आमच्या बाजूने खंबीरपणे उभं राहत नाही,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार सुनील तटकरे आपले मुद्दे मांडत असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना मध्येच टोकल्यानं बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला. तसचं सुनील तटकरे यांनी आपले मत मांडायला सुरुवात करण्यापूर्वीच पार्थ पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय…
बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव;
नमाजाला विरोध
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आला आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच, वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं जारी केले आहेत. गुरुवारी सकाळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरतीसुद्धा केली. यावेळी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. तसेच, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘संविधानाला छेद देणारं काही होऊ नये
मुस्लीम धर्मियांच्या बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राजकारण तापले आहे. त्यातच बकरी ईदच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय. भारतीय संविधानाने सगळ्या धर्मांना अधिकार दिलेत. त्यामुळे कोणीही धार्मिक भावना भडकवू नये, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. रामदास आठवले यांनी हे वक्तव्य करुन बकरी ईदच्या कुर्बानीवरुन इरेला पेटलेल्या भाजपला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे यावर भाजप काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.
नवतपात सूर्याचा कहर ;
नागपुरात २४ तासांत १० जणांचा मृत्यू
वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असून उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा बळी गेला आहे. नागपुरात नवताप सु्र्याने कहर केला आहे. नवतपाच्या सुरुवातीलाच विदर्भात भीषण उष्णतेचा प्रकोप दिसून येत आहे. नागपुरात उष्णघातामुळे २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकाडा वाढण्याची शक्यता आहे. यंदा हिट वेव्हकॅब दिवस वाढल्याने नागरिकांच्या जीवला धोका पोहचत आहे. नागपूरचा पारा ४५.७ अंशांवर, उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर विदर्भातील ११ शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे.उष्ण लाटेचा फटक्याने भिक्षेकरी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही मृत्यू झालाय. रेल्वे स्थानकावर ५ जणांचा मृत्यू झालाय. यात तीन प्रवासी आणि दोन अज्ञात व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश.
अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला ;
राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर? Top 10 News:
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेनं नागरिकांची अक्षरशः लाही लाही होतेय. त्यामुळे मान्सूनची प्रतिक्षा असतानाच , हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनचं आगमन 30मेपर्यंत लांबण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्यामुळे श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनचा पुढचा प्रवास थांबलाय. त्यामुळे राज्यात देखील मान्सूनसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय…दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस विदर्भासह काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. इतकंच नव्हे तर यंदाचा मे महिना गेल्या 114 वर्षांतील दुसरा उष्ण महिना ठरलाय.
तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा;
तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारांच्या यादीत काल एक मोठा बदल झाला, जेव्हा भारताची राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराने बाजारमूल्याच्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराला मागे टाकले आणि 5 ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलासह जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार बनला, तर भारत 4.9 ट्रिलियन डॉलर्ससह सहाव्या स्थानावर घसरला. तैवानच्या या स्तरापर्यंतच्या प्रगतीमध्ये एआयने (AI) मोठी भूमिका बजावली आहे. एआयमधील जागतिक गुंतवणुकीच्या जलद वाढीमुळे आणि सेमीकंडक्टर व एआय-संबंधित स्टॉक्समधील वाढत्या स्वारस्यामुळे, केवळ तैवानच नव्हे तर दक्षिण कोरियादेखील चर्चेत आहे आणि दोन्ही देशांच्या शेअर बाजाराचे मूल्य गगनाला भिडत आहे.
इबोला व्हायरसची भारतात एंट्री;
लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट
काही दिवसांपासून आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या जीवघेण्या अशा इबोला विषाणूने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दरम्यान भारतामध्येही इबोला विषाणूच्या संसर्गासारखी लक्षणे असलेला एक रुग्ण सापडला आहे. यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे एका ३७ वर्षीय व्यावसायिकामध्ये इबोलाच्या संसर्गासारखी लक्षणे आढळून आली. त्यानंतर या व्यावसायिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. यासह त्याच्या संपर्कातील ३ व्यक्तींनाही अहमदाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय.
अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला;
इराणही अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही संपायचं नाव घेत नाहीये. कतारची राजधानी दोहामध्ये दोन्ही देशांत युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेनं इराणवर हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे आखातातील युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जातेय. इतकंच नव्हे तर अमेरिकेवर हवाई हल्ल्यानंतर इराणनं पुन्हा एकदा युद्धाची तयारी केल्याची चर्चा रंगू लागलीये. तर दुसरीकडे, लष्करी सज्जता आणि मुस्लिम देशांना एकत्र आणण्याची खेळी इराणनं खेळलीये. तर कतारमध्ये सुरू झालेल्या चर्चेत अमेरिका इराणची सागरी नाकेबंदी हटवण्यास तयार झालीये. तर या बदल्यात इराण होर्मुझ जलमार्ग खुला करणार आहे. या सामंजस्य करारावर आता दोन्ही देश कशी अंमलबजावणी करतात याकडे जगाचं लक्ष लागलंय…
राजस्थानचे ‘रॉयल्स’ आता क्वालिफायर-2मध्ये
आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरसामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 47 धावांनी दारूण पराभव केला आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगाशी आला. राजस्थानचा युवा वैभव सुर्यवंशी याने हैदराबादच्या गोलंदाजांना असं काही धो-धो धुतलं की, अख्खी ऑरेंज आर्मी मैदानावर फक्त पाहत राहिली. वैभवने हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः धुळदाण उडवत अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांचा पाऊस पाडला. या लाजिरवाण्या पराभवासह सनरायझर्स हैदराबादचे आयपीएल 2026 मधील आव्हान संपुष्टात आले आहे, तर राजस्थानने थेट क्वालिफायर-2 मध्ये धडक मारली आहे.
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका
भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणावर लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी चित्रपटात काम करू नये, यासाठी त्यांना धमक्या आल्याचा खळबळजनक दावा दीपाली सय्यद यांनी केलाय. खरात प्रकरणावर चित्रपट येत असताना आणि रोल करत असताना कोणीही कलाकाराला दबावात आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे, असे शिवसेनेतील नेत्या तथा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येत आहे.





