Top 10 News: एकनाथ शिंदे पुन्हा गुपचूप अमित शाहांच्या भेटीला ; आजपासून पुण्यात जमावबंदी लागू आणि अक्षय कुमार बनला भोजपुरी ‘आयटम बॉय’, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असतानाच आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येतीय.

एकनाथ शिंदे पुन्हा गुपचूप अमित शाहांच्या भेटीला
Top 10 News: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असतानाच आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येतीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुपचूप दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.विशेष म्हणजे या भेटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट आणि माजी मंत्री होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीविषयी चर्चांना उधाण आलंय,. अनेक प्रयत्नानंतर अमित शाह यांनी शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटीसाठी येण्याचा निरोप पाठवला. त्यानुसार रविवारी एकनाथ शिंदे खासगी विमानाने दिल्लीत पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत एवढी गुप्तता बाळगली होती की, त्यांच्यासोबत एकही सहाय्यक नव्हता. अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे बंगळुरुला गेले आणि तिथून ते ठाण्यात परतल्याचे सांगितले जाते. भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही समोर आले नाही.
विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र
विधान परिषदेच्या जागावाटपावरुन सत्ताधारी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकांचे सत्र सुरु आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तसेच बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मतांची गोळाबेरीज वाढविण्यासाठी शिवसेनेची ही खेळी सुरु आहे. तसेच रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बविआचे क्षितीज ठाकूर यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधी रवींद्र फाटक यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे शिंदेंकडून धक्कातंत्र वापरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
विदर्भात भयंकर उष्णतेचा कहर;
एकाचवेळी 500 वटवाघुळांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उष्णता कमालीची वाढली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहे. परिणामी उष्माघाताने अनेकांचे जीव गेले आहेत. याचा फटका आता जंगलातील प्राण्यांनाही बसताना दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे अचानक 500 वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हवामान खात्याकडून मंगळवारी अमरावती , वर्धा , चंद्रपूर आणि गडचिरोलीत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला. तर नागपूर व अकोला या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
पुणेकरांनो सावधान!
आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी
पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केलीय. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास वे आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभागप्रमुखांना इंधन न बचतीबाबत तातडीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असंही अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर निर्देश दिले आहेत.
लातूरमधील प्रसिद्ध डॉक्टर देखील CBI च्या रडारवर Top 10 News:
नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. लातूरमधील प्रसिद्ध प्रसूती रोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. सीबीआयच्या पथकाने संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी लातूरमधील अस्थायी कार्यालयात आणल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात लातूरमधील पाचव्या डॉक्टरांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी डॉ. मनोज शिरुरे यांच्या चौकशीनंतर एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची, त्यांच्या नातेवाईक असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांची तसेच आणखी एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ पाचव्या डॉक्टरांची चौकशी सुरू झाली आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा,
तर विदर्भ उष्णतेनं होरपळला
राज्यात हवामानाची दोन टोक पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भ वाढत्या उष्णतेने होरपळला असून दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. आज विदर्भातील ४, मराठवाड्यातील २ जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय. तसेच मुंबईसह, पालघर आणि ठाण्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. उकाड्याने हैराण झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान या दुहेरी टोक गाठलेल्या हवामानाने नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली. पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून काही दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे उकाड्याने लाही लाही झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.
अण्णाद्रमुकला मोठा धक्का;
तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. अण्णा द्रमुकच्या तीन बंडखोर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. यामुळं अण्णा द्रमुकच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 47 वरुन 44 वर आलीय. अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते सी.वी.षणमुगम आणि एस.पी.वेलुमणी यांच्या गटातील आमदारांनी राजीनामे दिलेत .विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या तिघांनी टीव्हीकेचे मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. यामुळं अण्णाद्रमुकचे राजीनामे देणारे तीन आमदार टीव्हीकेत दाखल होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. तर आज विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
शांततेच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले
इराण आणि अमेरिका यांच्यातील थांबलेला संघर्ष पुन्हा उफाळून येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण अमेरिकन लष्कराने दक्षिण इराकमध्ये हवाई हल्ले केले. यामुळे पश्चिम आशियातील तणावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमेरिकन लष्कराचा दावा आहे की, हे हल्ले स्वसंरक्षणासाठी करण्यात आले होते; यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रे आणि नौदल सुरुंग पेरण्याच्या कामात गुंतलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते.’हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’ला लागून असलेल्या ‘बंदर अब्बास’ शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. मिळालेल्या माहितीनुसार, इराणी जहाजे त्या भागातील जलक्षेत्रात नौदल सुरुंग पेरत होती. या घटनेनंतर, इराणने आपल्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींना ‘हाय अलर्ट’वर ठेवले आहे.
२५ व्या ग्रँडस्लॅमसाठी नोवाक जोकोविचचा महासंघर्ष!
२ तास ५१ मिनिटांच्या थरारानंतर मिळवला विजय
फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी मानांकित खेळाडूंनी विजयी वाटचाल केली. दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला मात्र सलामीच्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने फ्रान्सच्या जिओवानी पेरिकार्डला पराभूत केले, मात्र यासाठी चार सेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा आणि २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा करीत असलेल्या नोवाक जोकोविच याला यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सलामीचा अडथळा ओलांडण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. जिओवानी पेरिकार्ड याने पहिला सेट ७-५ असा जिंकून आघाडी मिळवली. नोवाक जोकोविच याने पुढील तीन सेटमध्ये ७-५, ६-१, ६-४ असे यश मिळवत सलामीचा अडथळा पार केला. तिसरे मानांकन मिळालेल्या नोवाक जोकोविचला विजयासाठी दोन तास आणि ५१ मिनिटांची झुंज द्यावी लागली.
अक्षय कुमार बनला भोजपुरी ‘आयटम बॉय’;
ट्रोलिंग, मीम्स तुफान व्हायरल Top 10 News:
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत आला आहे. आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे नवे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्यात अक्षयचा भोजपुरी ‘आयटम बॉय’ अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत. गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या गाण्यात अक्षय कुमार पूर्णपणे भोजपुरी स्टारच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. रंगीबेरंगी सेट्स, विचित्र डान्स स्टेप्स आणि गंमतीशीर एक्सप्रेशन्समुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरले आहे.





