Top 10 News : उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक, मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय आणि प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा,
दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक
Top 10 News : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील सर्व खासदारांना मुंबईत बोलावले आहे. उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव गेल्या बैठकांना गैरहजर असल्याने ते आज हजर राहणार का, याकडेही लक्ष लागलंय. शिवसेना ठाकरे गटाचे राज्यात लोकसभेचे 9 खासदार आहेत. यापैकी शिवसेना ठाकरे गटाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार पाहायला मिळते. तसेच ठाकरेंचे काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चांही रंगली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत किती खासदार उपस्थित राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय
राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी आंदोलन केलंय. मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, असं वक्तव्य रोहित पवारांचे वडिल राजेंद्र पवारांनी म्हटलंय.. रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी इथे बसलोय असं राजेंद्र पवारांनी म्हटलंय. जोपर्यंत शेतकरी व्यक्त होणार नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही, असंही राजेंद्र पवारांनी म्हटलंय. तर रोहित माझ्या किंवा त्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाला बसला नाहीये, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकाऱ्यांनी घरात बसावं कि रस्त्यावर उतरावं हे त्यांनी ठरवावं, असेही राजेंद्र पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलन स्थळी येण्याची शक्यता आहे.
अजितदादांसारखाच एकनाथ शिंदेंचांही घात होणार?
शिवसनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ
अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही एक दिवस घात झाल्याशिवाय राहणार नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी हे वक्तव्य केलं आहे. माझा हा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहचू द्या आणि त्यांना रोहित दादांची कणव येऊ द्या असेही ते म्हणाले. अजितदादा कसे गेले हे सर्वांना माहीत आहे. मला खंत वाटते की एक दिवस एकनाथ शिंदेंचांही ही असाच घात होईल असे ते म्हणाले. दत्ता मगर यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच;
आता पुण्यात FDA ने टाकली धाड
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलाय. राज्यातील विविध शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. विविध शहरानंतर आता विभागाच्या पथकाने पु्ण्यात धाड टाकली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपवर असलेल्या सगळ्या दुकानांवर अचानक धाड टाकली. आयुक्त तुकाराम मुंढे यांची टीम पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पाच ते साडेपाचच्या दरम्यान दाखल झाली होती. त्यांनी विविध दुकानांमध्ये पाहणी केली. त्यानंतर माहिती घेऊन सूचना दिल्या. दुकान खाली करून जोपर्यंत स्वच्छता होत नाही, तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या.
अखेर तारीख आली समोर
‘या’ दिवशी पावसाचं होणार आगमन Top 10 News :
प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट 20 जून उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास मंदावला असून आगमन रखडले आहे. अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बायकोसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकललं
वाशीम जिल्ह्यातील धक्कायदायक घटना
वाशिमच्या तिवळी गावात पत्नीसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकललेल्या पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं. कौटुंबीक वादातून 35 वर्षीय संतोष बकाल यांनी आपल्या 28 वर्षीय पत्नी इंद्रायणी बकाल आणि 7 वर्षीय जान्हवी बकालसह 5 वर्षीय मुलगा सोहम बकाल यांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वतः संतोष बकालने महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली शिरपूर जैन पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला. मात्र, बहीण इंद्रायणीसह दोन चिमुकल्याचा आणि जावाई संतोष बकाल यांचा मृत्यू झाल्याने आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकाने केलाय.
“पिक्चर अभी बाकी है”
शत्रुघ्न सिन्हांकडून राजकीय फेरबदलाचे संकेत Top 10 News :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय. पक्षातील 60 हून अधिक आमदार फुटले आहे. शिवाय 20 हून अधिक खासदार बंडखोरीच्या तयारीत आहे. या खासदारांमध्ये टीएमसीचे खासदार ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यांनी एका मुलाखतीत “पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. शिवाय आपण ममता बॅनर्जी यांच्या सोबतच असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी, मी ममता बॅनर्जी यांच्यासोबतच आहे आणि या पुढे ही राहीन. तसेच पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर “पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत आगामी काळात मोठे राजकीय फेरबदलाचे संकेतही दिलेत.तसेच ममता बॅनर्जी या माझ्या एकमेव नेत्या आहेत. मी केवळ त्यांचेच ऐकतो, इतर सर्व माझे सहकारी आहेत. असं सांगत त्यांनी अभिषेक बॅनर्जी हे आपले नेते नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
इराण-अमेरिका शांतता करार आजच! होर्मुझही सुरू होणार,
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; अवघ्या जगाचं लक्ष!
गेल्या चार महिन्यांपासून चालू असलेल्या इराण-अमेरिका युद्धाबाबत सकारात्मक बाब आता समोर येतीय. आज या दोन्ही युद्धग्रस्त देशांमध्ये शांतता करार केला जाईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. शनिवारी रात्रीच त्यांनी यासंदर्भात सोशल मिडियावरून माहिती दिली. तसंच, हा करार होताच जगातील सर्वांत महत्त्वाचा सागरी मार्ग होर्मुझची सामुद्रधुनीही तत्काळ सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.या करारापाठोपाठ जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी हा सागरी मार्ग खुला केला जाईल. तसेच, मागील प्रशासनाच्या तुलनेत इराणसोबतच्या संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. “आम्ही इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेसोबत दीर्घकाळासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. आशा आहे की ही सर्व प्रक्रिया जलद, सुलभ आणि सुरळीतपणे पार पडेल,” असं त्यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं. हा करार इराणला अणुवस्त्रे मिळवण्यापासून रोखेल, असं म्हटलंय. “खरं तर, आता त्यांना अणुवस्त्र नको आहे आणि खरेदी, विकास किंवा इतर कोणत्याही मार्गाने ते अणुवस्त्र मिळवणारही नाहीत”, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.
शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल;
टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. धरमशाला याठिकाणी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आणि पावसामुळे प्रत्येक बाजूसाठी २५ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या या सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. गिलने कर्णधाराला साजेशी खेळी केली नाही, तर संघाला विजयदेखील मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाला पदार्पण करणाऱ्या युवा गोलंदाजांनी उत्कृष्ट सुरुवात करून दिली. मात्र अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने ५१ चेंडूंत १०२ धावांची शानदार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु इतर फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत. भारतासाठी आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि फिरकीपटू हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या दोन युवा खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अफगाणिस्तानचा डाव २४.५ षटकांत १९४ धावांत गुंडाळला.
प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज;
लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री Top 10 News :
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झालीय. अभिनेत्री लवकरच दाक्षिणात्य सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर येतीय. प्राजक्ता लवकरच तेलुगु सिनेमात झळकणार असून, हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता माळी लवकरच तेलुगू सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात नेमके कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, प्राजक्ता माळीची या सिनेमात कोणती भूमिका असणार? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. तिचा हा आगामी तेलुगू सिनेमा याच वर्षी रिलीज होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या दाक्षिणात्य सिनेमात तिचा लूक नेमका कसा असेल? ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, तिचा आगामी दाक्षिणात्य सिनेमा अभिनेत्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरेल का? हे लवकरच समोर येईल. त्यामुळं सध्या तरी तिच्या आगामी सिनेमाविषयी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचलीय.





