Top 10 News : ‘माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही’, राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा आणि ‘टॉक्सिक’चा डोकं सुन्न करणारा ट्रेलर रिलीज ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केलीय.

‘माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही’;
जरांगेंचा फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल
Top 10 News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केलीय. यावेळी बोलताना जरांगेंनी “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कितीही वळवळ करू द्या, त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असा इशारा दिला. मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी बावनकुळे आणि शिरसाट यांच्यावर केला. चूक सुधारली नाही तर भाजप खड्ड्यात गेल्याचे समजा, असा इशाराही त्यांनी दिला. “आधी समाज आणि नंतर पक्ष” हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा;
१३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
महाराष्ट्रात रविवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या १३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी झाडांखाली किंवा उघड्यावर थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA ची नजर;
भेसळीवर कडक कारवाईचा इशारा
दूध, पनीर आणि खाद्यतेलांनंतर आता ‘अल्कोहोलिक’ आणि ‘नॉन-अल्कोहोलिक’ पेयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. पुण्यात गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यूच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन, गुणवत्ता आणि लेबलिंगवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. “खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा मुंढे यांनी दिला. पुण्यातील ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना सोशल मीडियाच्या आहारी न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा आणि अपयशातून शिकण्याचा सल्ला दिला. FDAच्या तक्रार निवारणासाठी टोल-फ्री क्रमांक सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्याची पाण्याची चिंता मिटली;
खडकवासलासह चारही धरणे १०० टक्के भरली
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणे काठोकाठ भरली आहेत. भीमा खोऱ्यातील २५ धरणांपैकी नऊ धरणे १०० टक्के भरली असून, चार धरणे ९९ टक्क्यांवर आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे आंद्रा धरणही १०० टक्के, तर पवना धरण ९८.३१ टक्के भरले आहे. जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच वर्षांतील विक्रमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाची चिंता कमी झाली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के;
अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे Top 10 News :
नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री सुमारे १० वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा आणि शहरातील अन्य भागांत धक्के जाणवले. ग्रामीण भागातही काही ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवले. धक्क्यांमुळे काही घरांतील भांडी व वस्तू पडल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘पद माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं’;
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथमच आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. भुवनेश्वरमधील जीएम विद्यापीठात बोलताना त्यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान काही लोकांनी ‘जेन झी’ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतः केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा त्यांनी केला. “मंत्रिपद माझ्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं,” असेही प्रधान म्हणाले. दरम्यान, ओडिशातील राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देताना आपण शेतकऱ्याचा मुलगा असून विरोधाला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पटनायक यांच्या टीकेलाही प्रधान यांनी प्रत्युत्तर दिले.
‘1000 तरुणांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी’;
राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रयागराजमधील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातून बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “देशात 1,000 तरुणांपैकी केवळ 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळते,” असा दावा त्यांनी केला. भारताची सर्वात मोठी ताकद देशातील 40 कोटी युवक असल्याचे राहुल गांधी म्हणाले. शिक्षणावर मोठा खर्च करूनही तरुणांना रोजगार मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या GST मुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी नोकऱ्यांमधील पेपरफुटीचाही मुद्दा उपस्थित करत त्यांनी रोजगाराच्या संधी वाढवण्याची गरज व्यक्त केली. तसेच, भारतीय तरुणांच्या डेटाशिवाय AI ला अर्थ नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
मोजतबा खामेनी यांची प्रकृती चिंताजनक;
नव्या नेतृत्वावरून चर्चांना उधाण
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत गंभीर वृत्तांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इस्रायली माध्यमांनी त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्यांदरम्यान इराणच्या एका वृत्तसंस्थेने मोजतबा खामेनी यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून,मात्र इराणच्या धिकाऱ्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या प्रकृतीबाबत अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान, ते सर्वोच्च नेतेपद सांभाळण्यास असमर्थ ठरल्यास इराणच्या संविधानातील कलम १११ नुसार राष्ट्रपती, न्यायपालिकेचे प्रमुख आणि गार्डियन कौन्सिलमधील एका धार्मिक कायदेतज्ज्ञाची तात्पुरती परिषद कारभार पाहू शकते.
लिओनेल मेस्सीच्या वडिलांचे निधन;
वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असलेल्या जॉर्ज यांनी अर्जेंटिनातील रोसारियो येथील एका खासगी क्लिनिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. ७ ऑगस्टच्या रात्री त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. जॉर्ज मेस्सी हे लिओनेलच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे आधारस्तंभ होते. त्यांनी मेस्सीच्या सुरुवातीच्या फुटबॉल प्रवासापासून करार आणि व्यावसायिक बाबींपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मेस्सीच्या बालपणीच्या क्लब न्यूवेल्स ओल्ड बॉईजने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने अर्जेंटिना आणि जागतिक फुटबॉलविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार
‘टॉक्सिक’चा डोकं सुन्न करणारा ट्रेलर रिलीज Top 10 News :
सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ सिनेमाचा तब्बल ४ मिनिटे ३८ सेकंदांचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये यशचा खतरनाक गँगस्टर अवतार पाहायला मिळतो. हाय-ऑक्टेन ॲक्शन, दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त व्हिज्युअल्सने ट्रेलरची उत्सुकता वाढवली आहे. कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा आणि तारा सुतारिया यांच्या भूमिकांचीही झलक दिसते. गीथू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रेम, सत्ता, विश्वासघात आणि भावनिक संघर्षाभोवती फिरतो. ‘टॉक्सिक’ २६ ऑगस्ट २०२६ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.





