Top 10 News : ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला?, प्रत्येक खासदारांला १५ कोटींचा अॅडव्हान्स आणि मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल
Top 10 News : एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन दोनच दिवसांवर आला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सहा खासदारांपैकी तीन खासदार आधी दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. या सहा खासदारांमधील पाच खासदार हे उद्धव ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर होते. मात्र सहावा खासदार नेमका कोण याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत या सहाव्या खासदाराचं नाव हे लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रातून उघड होण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे तीन खासदार दिल्लीत पोहोचल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा बळ मिळालंय. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीकडे रवाना झालेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे तिघे चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झालेत.
ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला?
एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात आले असून दिल्लीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले असून बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र देतील, अशी शक्यता आहे. मात्र, या सहा खासदारांचा पक्षप्रवेश आज नव्हे तर 19 जून रोजी मुंबईतील शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडत आहे. हा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी सध्या शिंदेंच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. याच वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून इतर विभागप्रमुखांना द्या..
माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग (FDI) अचानक अॅक्शन मोडवर आला असून गेल्या महिनाभरात कारवाईचा धडाकाच लावलाय. त्यातच आता बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वेगळीच मागणी केलीय. “महाराष्ट्रात कायदेशीर आदेशाची अंमलबजावणी तुकाराम मुंढे करत आहेत आणि त्यांच्या कारवाईमुळेच भ्रष्टाचार व भेसळखोरांचे धाबे दणाणलेत. राज्यात सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. तुकाराम मुंढे ज्याप्रमाणे काम करत आहेत तसंच काम आपणांसह सर्व खातेप्रमुखांनी करावं अशी जनतेची भावना आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढून ते थोडं थोडं आपणांसह राज्यातील सर्व खाते प्रमुखांना द्यावं, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार?
हवामान विभागाचा वर्तवला अंदाज
राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सध्या मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले असून, पावसाअभावी अनेक भागांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडा संपायला आला तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात मॉन्सूनची प्रगती ठप्प झाली आहे. imd च्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून येण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक उष्णता व दमट हवामानाचा सामना करत आहेत. हवामान विभागाने आज राज्यात उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक हवामान प्रणालींचा अभाव असल्याने मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. अरबी समुद्रात मॉन्सून अडखळल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांहून अधिक काळ पुढे सरकलेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
प्रत्येक खासदारांला १५ कोटींचा अॅडव्हान्स;
संजय राऊतांच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ Top 10 News :
६ खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक दावा केला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्री तब्बल १५ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स दिला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पैशांचा मोठा गैरव्यवहार आणि घोडेबाजार सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश;
7 जणांच्या मुसक्या आवळल्या
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानप्रणित दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दहशतवादी नेटवर्कचा भंडाफोड करत सात जणांना ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानी शहाजाद भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुज्जर हे दोघे भारतात नेटवर्क चालवत होते. पंजाबमार्गे पाकिस्तानहून बेकायदेशीर शस्त्रे , जिवंत काडतुसे, अंमलीपदार्थ हे दिल्लीत पुरवली जात होती. पोलिसांनी कारवाईदरम्यान आरोपींकडून पाच पिस्तुल, ४१ जिवंत काडतुसे, सात मोबाईल, कार जप्त करण्यात आली आहे. विशेष पथकाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय तरुणांना जाळ्यात अडकवत होते. भरपूर पैसे कमावण्याचं आमिष देऊन नेटवर्कचा भाग बनवत होते. त्यानंतर भारतीय तरुणांचा शस्त्रे आणि अंमलीपदार्थ पुरवण्याच्या कामात वापर केला जायचा.
“खलाशांची सुरक्षा आपली सार्वजनिक जबाबदारी”
जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा?
मध्यपूर्वेतील निर्माण झालेल्या संघर्षादरम्यान, अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरून भारताने तीव्र संताप व्यक्त केला. हाच मुद्दा आता ग्रुप ऑफ सेव्हन म्हणजे जी ७ शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळी पंतप्रधानांनी “पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांमधील प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. या संघर्षामुळे या प्रदेशातील आमच्या मित्र देशांमध्ये जीवित आणि वित्ताची हानी झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी व्यापारातील व्यत्ययामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक भारतीय नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.” ओमानच्या आखातात अमेरिकन सैन्याने पलाऊचा ध्वज असलेल्या ‘सेतेबेलो’ या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
युद्ध संपले तरी महागाईची धग कायम राहणार
तज्ज्ञांचा अंदाज
अमेरिका-इराण युद्धसमाप्तीसाठी झालेल्या प्राथमिक करारामुळे जागतिक बाजारपेठेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही इंधन, विमानप्रवास, किराणा माल, खते अन् मालवाहतुकीचे दर तातडीने कमी होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञ आणि उद्योग विश्लेषकांचे मत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोंडीमुळे तेल, खते, अन्नधान्य आणि विविध वस्तूंच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचे परिणाम पुढील काही महिने जाणवत राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.अर्थतज्ज्ञ, उद्योगविश्वातील विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातून तेलपुरवठा पुन्हा सुरळीत झाला तरी स्थानिक पेट्रोल पंप, सुपरमार्केट आणि अन्य किरकोळ बाजारपेठांत ग्राहकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी काही काळ जावा लागेल.त्यामुळं युद्ध थांबलं असल तरी युद्धाचे परिणाम कायम राहणार आहेत.
मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर;
अर्जेंटिनाचा अल्जेरियावर दणदणीत विजय
२० वर्षांचा अनुभव घेऊन मैदानावर उतरलेल्या लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) त्याचा करिष्मा दाखवून दिला. ३८ वर्षीय मेस्सीचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असल्याने, तो मैदानावर येताच वातावरण एकदम भावनिक झालेला दिसले. अर्जेंटिनाचे चाहते आपल्या भावनांना अश्रू्ंद्वारे वाट मोकळी करून देताना दिसले. मेस्सीनेही चाहत्यांचा विश्वास कायम राखताना तीन भन्नाट गोल करून फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अर्जेंटिनासाठी गोल करणारा युवा व वयस्कर, खेळाडूचा मान त्याने पटकावला आणि महान फुटबॉलपटू पेले यांचाही विक्रम त्याने मोडला. मेस्सीच्या या करिष्माई हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने ३-० अशा फरकाने अल्जेरियाला नमवले. यावेळी मैदानात त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
‘बोल बोल राणी’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
सईच्या लूकची चर्चा… Top 10 News :
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे या दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.विशेष म्हणजे ‘बोल बोल राणी’च्या माध्यमातून १५ वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून, एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. रहस्य, थ्रिल या सगळ्याचा अनुभव हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना येईल. टीझरमध्ये सई ताम्हणकरचे वेगवेगळे लूक लक्ष वेधून घेतात.




