Top 10 News : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर गोळीबार, राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आणि ‘साखर खाल्लेला माणूस’ची प्रदर्शन तारीख जाहीर, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : अहिल्यानगरमधील श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर गोळीबार!
दुचाकीवरून आले अन् बेधडक गोळ्या झाडल्या;
Top 10 News : अहिल्यानगरमधील श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना सोमवारी रात्री घडलीय. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कहाणे सुरक्षितपणे बचावले. या घटनेनंतर श्रीरामपुरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या भागाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज;
मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 25 ते 30 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार
विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा केलीय. दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पक्षाचे हे दुसरे आंदोलन आहे. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाने या आंदोलनाची घोषणा केली. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये,”महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात कॉकरोच पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करेल. हे आंदोलन गुरुवारी दुपारी 4 वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
घरगुती एलपीजी गॅसबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय
उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या घटवली
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत एक कठोर निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार, उज्ज्वला योजनेतील सवलतीच्या सिलेंडरला आता कात्री लावण्यात आलीय. परिणामी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9 ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळेल. सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10 कोटी 55 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढलीय. त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर 700 रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानिक गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम;
पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकले मागे Top 10 News :
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक नवा आणि महाविक्रम आपल्या नावावर करणार आहेत. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आता नरेंद्र मोदींच्या नावे नोंदवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढणार आहेत. मोदी उद्या 10 जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4 हजार 397 दिवसांचा पंतप्रधानपदाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार आहेत.विशेष म्हणजे, आज 9 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या दोन वर्षे ही पूर्ण होत आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. ते सलग 4 हजार 397 दिवस म्हणजेच 12 वर्षे आणि 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते. लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून उद्या मोदींचा सलग 4 हजार 398 दिवस म्हणजेच 12 वर्षे 15 दिवस पूर्ण होणार आहेत.
घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार
केंद्र सरकारचे संकेत
देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात गॅस आणखी महाग होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत.केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वाढत्या दरांवर स्पष्टीकरण देताना एलपीजी गॅस आता अत्यंत मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होतोय. गॅसची मूळ किंमत वाढलीय. शिवाय, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता तब्बल 40 ते 45 दिवस लागत आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि विम्याचा खर्च कमालीचा वाढलाय,आम्ही सर्वसामान्य जनतेच्या अडचणींबाबत तितकेच चिंतित आहोत, परंतु सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये गॅसच्या किमती वाढवणे हा सरकारचा नाईलाज झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सौर वादळ पृथ्वीवर धडकणार?
सूर्यावरील स्फोटानंतर ‘नासा’चा इशारा
सूर्याच्या पृष्ठभागावरील एका स्फोटामुळे निर्माण झालेले एक जी-थ्री जिओमॅग्नेटिक म्हणजेच एक शक्तिशाली चुंबकीय वादळ पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. अद्भूत आणि विध्वसंक असे याचे दोन्ही परिणाम दिसणार आहे. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये ‘नॉर्दर्न लाइट्स’ म्हणजेच अद्भूत प्रकाश दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सूर्याच्या पृष्ठभागावर गेले आठवडाभर होत असलेल्या तीव्र स्फोटांमुळे चुंबकीय वायूंचे प्रचंड लोट वेगाने अवकाशात फेकले जात आहेत. नासा आणि ‘स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर’ने या घटनेबाबत गंभीर इशारा दिला आहे.या सौर वादळाची उल्लेखनीय बाब म्हणजे, त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारत, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एक अद्वितीय आणि तेजस्वी दृश्य निर्माण होऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का!
H-1B व्हिसासाठी १ लाख डॉलरचे शुल्क रद्द
अमेरिकेच्या एका फेडरल न्यायाधीशांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन ‘H-1B’ व्हिसावर लागू केलेले एक लाख डॉलर्स शुल्क रद्द केले आहे. हे शुल्क म्हणजे संसदेने (काँग्रेस) मान्यता न दिलेला एक बेकायदेशीर कर असल्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी नोंदवला. यामुळे व्यावसायिक कंपन्या, विद्यापीठे आणि हजारो अत्यंत कुशल परदेशी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय. यामध्ये H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. बोस्टनच्या अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी हा निकाल दिला. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आणि H-1B व्हिसा मिळवण्याचा खर्च कमालीचा वाढवणाऱ्या या शुल्काला आव्हान देत २० डेमोक्रॅटिक राज्यांच्या ॲटर्नी जनरलने एक खटला दाखल केला होता, त्यावरील सुनावणीदरम्यान हा निर्णय आला.
सूर्यकुमारचा वानखेडेवर ‘तांडव’;
36 बॉलमध्ये 72 धावा काढत टीकाकारांना उत्तर
भारताचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादवने त्याच्या टीकाकारांना आपल्या बॅटच्या माध्यमातून उत्तर दिलंय. त्याच झालं असं कि टी-20 वर्ल्ड कप जिंकून अवघे तीन महिने झाले असतानाच, सूर्याला अचानक टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे धुरा सोपवण्यात आली. या निर्णयामुळे सूर्या नाराज असल्याच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या सर्व वादाला आणि टीकाकारांना सूर्याने आपल्या बॅटने कडक शब्दांत उत्तर दिलंय. मुंबई टी-20 लीगमध्ये ट्रायम्फ नाईट्स एमएनई आणि एमएसई मराठा रॉयल्सयांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या संतापाचे रूपांतर एका वादळी खेळीत केले आणि अवघ्या 36 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावांची खेळी करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.त्याच्या या खेळीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंडच त्याने बंद केल्याचं बोललं जातंय.
समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा;
‘साखर खाल्लेला माणूस’ची प्रदर्शन तारीख जाहीर Top 10 News :
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता समीर चौघुले पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि कौटुंबिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साखर खाल्लेला माणूस’ या नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर समीर चौघुलेच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक मनोरंजक आणि भावनिक अनुभव देणार आहे. समीर चौघुलेच्या अभिनयासह नात्यांचा गोडवा उलगडणारी कथा पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक असल्याचं दिसून येतंय.




