Top 10 News : अखेर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे, पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? आणि सलमानच्या नव्या हेअरस्टाईलने चाहत्यांना ‘राधे’ची आठवण , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते.

पुन्हा संकटमोचक धावून आले
तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे
Top 10 News : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते. अखेर त्यांनी तीन दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले. 22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी सांगितले. आपल्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार सरकार करत आहे. या अटीसंदर्भात काय करता येईल यासाठी आपल्याला कमिटीकडे जावे लागेल असं महाजनांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठे आंदोलन घेणार आहोत असे रोहित पवार म्हणाले. आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र हादरला!
देवाचं दर्शन घेऊन निघालेल्या 8 भाविकांचा मृत्यू
म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडलीय.भाविकांना घेऊन जाणारी एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. अपघातात सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड याठिकाणी श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय. तसेच अपघाताच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आलेत.
राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम
‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा कायम असून अल निनोच्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झालेत. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, मान्सून २० जूनपर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता वर्तवलीय. आज राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवू शकते. दरम्यान, पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केलाय.
राज्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा?
पुण्याला मोठा फटका, ग्रामीण भागाचीही अवस्था वाईट
राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या,असे निर्देश जलसंपदा मंराधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. बेकायदेशिर पाणी उपशावरही तातडीने कडक कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी विभागाच्या आधिका-यांना दिल्या.सद्य परिस्थितीत राज्यातील धरणांमधील एकुण उपयुक्त जलसाठा 25 टक्के असून,तो गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आले. यावर्षीचे पर्जन्यमान आतापर्यंत अत्यल्प झाल्यामुळे धरणात पाणी आले नाही. हे त्यामागील प्रमुख कारण आहे.विशेषत:पुणे विभागातील उपयुक्त जलसाठा गतवर्षीच्या तुलनेक कमी असल्याने परिस्थिती गांभिर्याने हाताळावी, असे निर्देशही पाटील यांनी दिलेत.
आजपासून ‘माथेरानची राणी’ पावसाळी सुट्टीवर ;
४ महिने मिनी ट्रेन घेणार विश्रांती Top 10 News :
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेन सेवा आजपासून मान्सून सुट्टीवर जातीय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं याबाबतचे आदेश जारी केले असून, १५ जून ते १५ ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत नेरळ ते अमन लॉज दरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद राहणार आहे. मात्र, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्यानं पावसाळ्यातही पर्यटकांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येणार आहे. यंदा मान्सूनचे आगमन काहीसे लांबले असले, तरी मध्य रेल्वेने नियमानुसार १५ जूनपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आज सोमवारपासून नेरळ स्थानकातून माथेरानकडे जाणारी नियमित मिनी ट्रेन धावणार नाही. मात्र, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा अविरत सुरू राहणार आहे. या सेवेमुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पावसाळ्यातील धुक्याची चादर, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि नयनरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल.
भारत-अमेरिकेत तणाव वाढला,
जहाजावरील हल्ल्यानंतर भारत आक्रमक
ओमानच्या आखातात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झालाय. ओमानच्या आखातात अमेरिकेनं भारतीय जहाजांना लक्ष्य केलं होतं. त्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या या कारवाईविरोधात भारतानं अमेरिकन राजदूतांना समन्स बजावत खडेबोल सुनावले. इतकंच नव्हे तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना फोन करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवलाय. मात्र, या हल्ल्यानंतरही अमेरिकेकडून मुजोरी कायम असल्याचं दिसतंय. भारतीय जहाजांवर हल्ला करूनही अमेरिकेनं माफी मागण्यास नकार दिलाय. अमेरिकेनं घातलेल्या आर्थिक आणि व्यापारी कोंडीचं उल्लंघन करणे आणि इराणी तेलाची अवैध वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. यामध्ये भारतीय खलाशांना कोणतीही सूट मिळणार नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलंय.
पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार?
कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची घोषणा केल्यानंतर आणि होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ पुन्हा खुली करण्याच्या निर्णयानंतर, ‘ब्रेंट क्रूड’च्या दरात ३.५ टक्क्यांहून अधिक घट होऊन ती प्रति बॅरल ८३.४८ डॉलर इतके खाली आले. त्याच वेळी, अमेरिकन क्रूड ‘वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट’ दरात जवळपास ५ टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति बॅरल ८०.६१ डॉलरवर पोहोचले. अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती; एका टप्प्यावर ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत प्रति बॅरल १२० डॉलरपर्यंत पोहोचली होती. या संघर्षापूर्वी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलरच्या आसपास होत्या. पश्चिम आशियातील तणावामुळे हॉर्मूझची सामुद्रधुनी हा जगातील २०% कच्च्या तेलाची वाहतूक होणारा एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्यात आला होता. तो पुन्हा खुला करण्याच्या घोषणेमुळे जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आ
ट्रम्प यांच्याकडून इराणसोबतच्या शांतता कराराची घोषणा
पण इराणच्या एका भूमिकेनं सस्पेन्स वाढला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री खुली करण्यास मंजुरी दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. याशिवाय अमेरिकन नौदलानं केलेली नाकाबंदी देखील हटवण्याचे अधिकृत आदेश जारी केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र, इराणकडून या डीलबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे पाकिस्तानने देखील अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. इराणनं अद्याप अधिकृत भूमिका जाहीर न केल्यानं शांतता कराराबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. इराणची वृत्तसंस्था फार्स यांच्याकडून लवकरच सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून अमेरिकेसोबतच्या शस्त्रसंधी कराराबाबत अधिकृत निवेदन जारी केलं जाईल, असं म्हटलं. इराणकडून अद्याप या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात न आल्यानं ट्रम्प यांच्या शांतता कराराला इराणची मंजुरी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दीप्ती शर्माने मोठ्या विक्रमाची नोंद;
पाच विकेट घेत पाकिस्तानाला रडवलं
एजबॅस्टन याठिकाणी झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ मधील ‘गट अ’मधील सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अफलातून कामगिरी करत ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात भारतीय महिला संघाची फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मान उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या चार षटकांत केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. या सामना-विजेत्या कामगिरीसाठी तिला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. पाकिस्तानच्या महिला संघाविरुद्ध अवघ्या १० धावांत ५ बळी घेऊन दीप्ती शर्मा आता टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी करणारी भारतीय महिला खेळाडू ठरलीय. या कामगिरीसह दीप्तीने रेणुका सिंगचा तीन वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढलाय.
‘तेरे नाम’च्या राधेची चाहत्यांना आठवण
सलमानच्या नव्या हेअरस्टाईलची सर्वत्र चर्चा Top 10 News :
बॉलिवूडमधील गाजलेल्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेता आमीर खान, अभिनेत्री करीना कपूर खान, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती अभिनेता सलमान खान याच्या नव्या हेअरस्टाइलची. या कार्यक्रमात सलमान खानने अचानक एन्ट्री करताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. यावेळी सलमान छोट्या केस आणि ब्लॅक पॅन्ट व ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे. कार्यक्रमातील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर सलमानकडे आश्चर्याने पाहत आहेत. सलमानचा हा लूक पाहून अनेकांना त्याच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘राधे’ या लोकप्रिय पात्राची आठवण झाली.




