भंडारा जिल्ह्यात एप्रिलमध्येच नद्या, तलाव कोरडे Top 10 News : राज्यभरात सूर्य आग ओकत असून पाण्याची भीषणतेनंही आता डोकं वर काढले आहे. जलसाठ्यामध्ये कमालीची घाट झाली आहे. अशातच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात अनेक उपनद्या आणि नाले कोरडे पडले आहेत. लाखनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीचं पात्र कोरडं पडलं असून, उन्हाळी भातपिकांसह बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः जमिनीच्या काळजातून पाणी शोधत आहेत. भंडारा जिल्हा असा जिल्हा आहे जिथं पाण्याचा कधी तुटवडा भासणार नाही, असं वाटायचं, तिथेचं आज उष्णतेच्या लाटेनं शेतकरी हवालदिल झालाय. लाखनी तालुक्यातील पालांदूर ते दिघोरी या मार्गावरील प्रमुख ‘चुलबंद’ नदी आज एखाद्या वाळवंटासारखी भासत आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह तर सोडाच, पण ओलावाही आता शिल्लक राहिलेला नाही. नदी कोरडी पडली असली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी मात्र आटलेले नाही. हाताशी आलेल्या उन्हाळी भात पिकाला आणि पालेभाज्यांना वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचं रान करत आहेत. अयान अहमदला पोलिसांनी भरवला केक अमरावतीमधील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात फटाके फोडून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या या आरोपीला खुद्द पोलिसांनीच केक भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे परतवाडा प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हयगय केल्याचा आरोप होत असतानाच, दुसरीकडे चक्क पोलीसच आरोपीचे लाड पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या परतवाडा येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणातील हा संतापजनक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मुख्य आरोपी अयान अहमदने भररस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापला. यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते. नॉट रिचेबल सहर शेख चक्क वानखेडे स्टेडियमवर कैसे हराया म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख सध्या ‘बनावट जात प्रमाणपत्रा’मुळे कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. मागील २४ तासांपासून सहर शेख ‘नॉट रिचेबल’ होत्या. पण सहर शेख आयपीएलच्या सामन्यावेळी दिसल्या आहेत. ‘बनावट जात प्रमाणपत्र’ प्रकरणात सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा झाली. पण मुंबई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सहर शेख उपस्थित होत्या. सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करताना गेम ओव्हर.. असे टेक्स्ट टाकलेय. त्याशिवाय एका गाणं त्यांनी पोस्ट केलेय. ते सध्याच्या त्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत असल्याचे दिसतेय. नाशिक, अमरावतीनंतर जालना हादरलं! Top 10 News : नाशिक, अमरावती नंतर जालना शहरात ही एक अत्यंत धक्कादायक संतापजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बुरखा घालायला लावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लतनगर परिसरात घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. साहिल अन्सारी याने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तरुणीने आईला सांगितल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करत आरोपी साहिल अन्सारी याला मध्यरात्री 2 सुमारास त्याच्या राहत्या घरातून अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. आरोपी हा मूळचा बिहार राज्यातील रहिवासी असून तो आपल्या वडील आणि भावासह मिल्लतनगर परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकाकडून नशेत पेपर तपासणीचा कार्यक्रम शिक्षणाचा पॅटर्न म्हणून देशभर ओळख असलेल्या लातूरमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने परीक्षा पेपर तपासताना दारूच्या नशेत सिगरेट ओढत काम केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित शिक्षक धाब्यावर आपल्या मित्रांसोबत बसलेला दिसतोय. त्याच वेळी विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. विशेष म्हणजे, एका हातात सिगरेट आणि बाजूलाच दारूचे ग्लास ठेवून पेपर तपासण्याचा हा प्रकार समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट राज्यात उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, पुणे शहरात देखील उष्णतेचा तडाखा वाढला आहे. पुण्यातील तापमान 40 ते 41 अंशावर स्थिर आहे. उष्णलहरींचा उद्रेक सुरूच असून काल (गुरुवारी, ता १६) सलग दुसऱ्यांदा लोहगावचा पारा 42 अंशावर पोहोचला होता. तर आजही उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 एप्रिल रोजी पुणे शहर आणि जिल्ह्यात तूरळक पावसाची शक्यता आहे.तर राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उद्या तर विदर्भात रवीरापर्यंत तर कोकणात आज काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. महिला आरक्षणासंदर्भातली घटनादुरूस्ती लागू संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर कालपासून प्रदीर्घ चर्चेला सुरुवात झाली, घटनादुरुस्तीसह एकूण तीन विधेयके संसदेच्या अधिवेशनात अंतर्गत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचनेबाबत महत्त्वाची तीन विधेयके मांडण्यात आली आहेत. महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती तसेच परिसीमनासाठी कायद्यात तरतूद करणारी दोन विधेयके चर्चेसाठी सभागृहाला सादर करण्यात आली आहेत. लोकसभेत काल दिवसभर वादळी चर्चा झाली असून आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झाले होते. परंतु ते लागू करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. त्याशिवाय 33 टक्के महिला आरक्षण 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लागू करण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी एकमुखाने विरोधात भूमिका घ्यायचं ठरवलं होतं परंतु प्रत्यक्षात घटनादुरुस्ती रोखण्यात विरोधी पक्षांना यश येणार का ते आज समोर येईल. ट्रम्पकडून आणखी एका शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा केलीय. ही शस्त्रसंधी 10 दिवसांसाठी असेल. याविषयी ट्रम्प यांनी सांगताना, त्यांची काही वेळापूर्वी लेबनॉनचे सन्मानीय राष्ट्रपती जोसेफ ऑन आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी 10 दिवसांच्या शस्त्रसंधीपासून सुरुवात करण्यास सहमती दर्शवली. अमेरिकेच्या वेळेनुसार सायंकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी सुरु होईल. इस्त्रायलच्या हल्ल्यात मरणाऱ्या लेबनॉनच्या नागरिकांची संख्या 2196 वर पोहोचलीय. तब्बल 34 वर्षानंतर पहिल्यांदा दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटले. ही भेट वॉशिंग्टन डीसीमध्ये विदेशमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत झाली. श्रेयस अय्यरच्या कॅचने मुंबईचे डगआऊट स्तब्ध आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरला. तर पंजाब किंग्सने 5 सामन्यात चार विजय मिळवले. एक सामना अनिर्णित राहिला. सध्या 9 गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या झेलने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल 2026 च्या हंगामातील सर्वोत्तम झेल घेतला. मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने चेंडू सीमारेषेजवळ टोलावला. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कॅच पकडली. षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत उंच उडी मारत श्रेयस अय्यरने टिपला. यावेळी श्रेयस अय्यरचं शरीर बाऊंड्री लाईनच्या वर हवेत बाहेर होतं. श्रेयस बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाणार इतक्यात त्याने समोर उभा असणाऱ्या झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला आणि झेल पूर्ण केला. श्रेयस अय्यरच्या या झेलमुळे मागेच बसलेलं मुंबई इंडियन्सचं संपूर्ण डगआऊट स्तब्ध झालं. प्रसिद्ध गायकाने गुपचूप लग्न उरकलं Top 10 News : बॉलिवूडचा लोकप्रिय पार्श्वगायक जुबिन नौटियालने आपल्या लाखो चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जुबिन लग्नबंधनात अडकला आहे. जुबिनने उत्तराखंडमधील आपल्या मूळ गावी निसर्गरम्य वातावरणात बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केलंय. प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालने उत्तराखंडमधील होमटाउन म्हणजेच डेहराडूनची निवड केली. जुबिनला त्याचे आयुष्य खासगी ठेवायला आवडते. त्यामुळे जुबिनने लग्नसोहळा अगदी साधा आणि खाजगी ठेवला होता. त्याला मोठे, आलिशान लग्न नको होते आणि त्याला त्याचा हा खास दिवस फक्त त्याच्या जवळच्या नातेवाईकांसोबत साजरा करायचा होता. जुबिन नौटियालने काही खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.