राज ठाकरे यांची सोशल मीडियावर बेधडक पोस्ट Top 10 News: अशोक खरात प्रकरणामुळे राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय. याच प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर बेधडक पोस्ट केलीय. यामध्ये कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात असल्याचं माझ्या कानावर आलंय, असं त्यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केलाय. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन विधिमंडळातील वातावरण प्रचंड तापले होते. शिंदे सेनेच्या आमदारांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह 100 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषारी दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. या सगळ्या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात शिवसेनेकडून खेळण्यात आलेली राजकीय खेळी आणि शंभुराज देसाई यांच्या आरोपांबाबत नाराजी बोलून दाखवली. तसेच सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावरूनही मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय. मोठा भाऊ म्हणून भाजपची भूमिका सामंजस्याची आहे. पण साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी फडणवीसांना स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता दोन्ही पक्षातील वाद निवळणार की त्याला वेगळं वळण लागणार, हे पाहावं लागणार आहे. महिला आयोग अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही नाशिकमधील महिला अत्याचार आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला. चाकणकर यांचा पायउतार झाल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून महिला आयोगाचे अध्यक्षपदी काढून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची माहिती आहे. भाजपनं महिला आयोगाच अध्यक्षपद आता आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रह धरला असून बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला महामंडळ देण्यात येणार असल्याचं समजतय. महिला आयोग पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतय. महिला आयोग पद महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तर, राष्ट्रवादीच्या वाट्याला असणारे महिला आयोग पद स्वतःकडे घेऊन त्या बदल्यात महिला आर्थिक विकास महामंडळ देऊ असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात येत असल्याचे समजते. आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार शालार्थ आयडीतील घोटाळा समोर आल्यानंतर भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेतला आहे. राज्यातील सर्वच सुमारे १७ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार केले जाणार आहे. त्यात या शाळांवरील सुमारे तीन लाख शिक्षकांची संपूर्ण माहिती समाविष्ट केली जाणार आहे.नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडीचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यातील सर्वच खासगी माध्यमिक शाळांमधील सुमारे तीन लाख शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचा निर्णय झाला. शालार्थ आयडीतील घोटाळा शोधण्यासाठी राज्य शासनानं ‘एसआयटी’ स्थापन केलीय. समितीचा अहवाल मेअखेर राज्य शासनाला सादर होईल. नरेंद्र मोदी 100 टक्के ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अमेरिकेच्या विरोधात एकही शब्द बोलले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे. मोदी १०० टक्के ट्रम्प यांच्या कंट्रोलमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींनी संसदेत २५ मिनिटं भाषण केलं. अमेरिकेविरोधात चकार शब्दही काढले नाहीत. शतप्रतिशत ते ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारत सरकारने पहिल्यांदा अमेरिकी उत्पादनांसाठी कृषी क्षेत्र खुलं केलं, असा आरोपही त्यांनी केला. ट्रेड डीलवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला. मोदींनी व्यापार करार करून भारताचं कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलं. आपल्याकडे लहान शेत आहेत. तर अमेरिकेत मोठमोठे शेत असतात. आपल्याकडे शेतकरी बऱ्याचदा हाताने काम करतात. तिकडे मोठमोठ्या मशीन असतात. जर अमेरिकेचा माल भारतात यायला लागला तर, आपले शेतकरी उद्ध्वस्त होतील. त्यामुळे कोणत्याच पंतप्रधानांनी अमेरिकेसाठी कृषी क्षेत्र खुलं केलं नव्हतं, असं राहुल गांधी म्हणाले. महिला आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली Top 10 News: लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षण लागू करण्याच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने गती देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत संसदेच्या दालनात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या काही खासदारांशी चर्चा झाली असून हा कायदा लागू करण्याबाबत सहमत असल्याचे पाहायला मिळाले. महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्याचा विचार केंद्र सरकारच्या स्तरावर सुरू आहे. या प्रस्तावामुळे नव्या जनगणना आणि मतदारसंघ फेररचना या दोन्ही अटी टाळून महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे १४.९४ टक्के इतके आहे. आराखड्यानुसार, लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढवली जाणार आहे. त्यापैकी २७३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. त्यामुळे तिसरा लोकसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव होईल. त्यातून लोकसभेमध्ये महिला खासदारांचे प्रतिनिधित्व वाढेल तसेच, या कायद्याची तातडीने अंमलबजावणी देखील होऊ शकेल, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय. कोलंबियात जवानांना घेऊन जाणारं विमान कोसळलं कोलंबियात हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलल्याची घटना समोर आलीय. या विमानातून 110 जवान प्रवास करत होते, अशी माहिती आहे. हवाई दलाचं विमान उड्डाण घेतल्यानंतर लगेचेच कोसळल्याची माहिती आहे. ही दुर्घटना दक्षिण अमेझॉन क्षेत्रातील पेरुच्या सीमेजवळ प्यूर्टो लेगुइजामो भागात झाली. स्थानिक वृत्तसंस्था ब्लू रेडिओनं दिलेल्या माहितीनुसार या विमानात 110 जवान होते. कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल देशाच्या दक्षिण भागात एक लॉकहीड मार्टिन हरक्यूलिस C-130 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेन यांनी हे विमान पेरुच्या सीमेजवळील कोलंबियाच्या दक्षिण अमेझॉनमधून उड्डाण करत होतं. याविमानात सशस्त्र दलाचे जवान होते.त्याच वेळी ही दुर्घटना झाली. पीडितांची योग्य संख्या अजून समजली नाही, दुर्घटनेचे कारण देखील समोर आले नसल्याचे त्यांनी म्हटलंय. ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना पुन्हा उधाण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्यात. ट्रम्प यांचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जातीय. एअर फोर्स वन विमानातून उतरताना ट्रम्प यांचा तोल जातो तर, खुर्चीवर बसताना ते अडखळतात, असे हे दोन व्हिडिओ असून, यावरुन आता नेटकऱ्यांंमध्ये चर्चा रंगु लागल्यात. ७९ वर्षीय ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत यापूर्वी देखील विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सध्या ७९ वय आहे. वाढत्या वयामुळे अनेकांनी त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केलीय. वाढत्या वयानुसार वाढणारा थकवा, संथ गतीनं चालण आणि त्वचेचा रंग याबाबत विविध भाष्य केली जातायत. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील अनेकवेळा ट्रम्प यांच्यावर अडखळण्यावरुन टीका केलीय. पीएसएल स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्येच होणार Top 10 News: पाकिस्तान सुपर लीग येत्या 26 मार्चपासून सुरू होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अखेर मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या खेळाडूंना परवानगी दिली आहे. मात्र, यंदाची स्पर्धा प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. बीसीबीने याबाबत दिलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, पाकिस्तानमधील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी युवा व क्रीडा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नसल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना पीएसएलमध्ये खेळण्यास हिरवा कंदील देण्यात आला. बीसीबीने पुढे स्पष्ट केले की, पाकिस्तानकडून मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर त्यांच्या खेळाडूंनी स्पर्धेसाठी पाकिस्तानकडे रवाना होण्यास सुरुवात केली आहे. “आमच्या खेळाडूंची सुरक्षा आणि कल्याण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असेही बोर्डाने ठामपणे नमूद केलंय. रजनीकांत ‘धुरंधर 2’वर फिदा आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकलीयत. अल्लू अर्जुन , महेश बाबू , अक्षय कुमार आणि विजय देवराकोंडा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर या सिनेमाचं उघडपणे कौतुक केलं. अशातच आता सिनेसृष्टीचे थलायवा म्हणजेच रजनिकांत यांनीही आता ‘धुरंधर 2’वर स्तुतिसुमनं उधळलीयत. त्यासोबतच हा सिनेमा ‘मस्ट वॉच’ असल्याचंही सांगितलंय. याशिवाय त्यांनी प्रत्येक भारतीयानं हा सिनेमा पाहावा असं आवाहनही केलंय. रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत, “काय जबरदस्त फिल्म आहे… #Dhurandhar2!!! आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप!!! रणवीर आणि पूरी कास्ट आणि क्रू ला खूप खूप शुभेच्छा… प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहण्यासारखा सिनेमा… जय हिंद…” असं म्हटलंय.