Top 10 News : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग येणार?, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आणि देवोलीना भट्टाचार्जीने तुकाराम मुंढेंसाठी केली पोस्ट, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : शिवसेनेतील राजकीय घडामोडींनंतर आता ‘ऑपरेशन टायगर’च्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव दौऱ्यावर असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत मिश्कील विधान करत, “कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहेत,” असा दावा केला.

‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग येणार?;
प्रताप सरनाईकांचा मोठा दावा
Top 10 News : शिवसेनेतील राजकीय घडामोडींनंतर आता ‘ऑपरेशन टायगर’च्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव दौऱ्यावर असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत मिश्कील विधान करत, “कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहेत,” असा दावा केला. तुळजापूरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून कैलास पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सरनाईकांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे जवळचे मित्र असल्याने सरनाईकांच्या या वक्तव्यामुळे कैलास पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, पाटील यांनी अद्याप ठाकरे गटासोबतची आपली निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची सजावट
स्वातंत्र्य दिनानिमित्त २ टन विविध फुलांचा वापर
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणीला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान करण्यात आले असून, तिरंग्याच्या रंगांमध्ये सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. पुण्यातील श्रीमंत मोरया प्रतिष्ठानकडून ही फुलांची सेवा अर्पण करण्यात आली. सजावटीसाठी तब्बल २ टन विविध फुलांचा वापर करण्यात आला असून, गुलाब, ऑर्केट, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा आणि ब्लूडीजी यांचा समावेश आहे. मंदिर व भक्त निवास परिसरात तिरंगी विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडली;
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अशक्तपणासह चक्कर, ताप आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवत असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यात धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध ठिकाणी त्यांनी इशारा बैठका घेतल्या. मोठा प्रवास आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दौऱ्यांमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची माहिती आहे. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील सरकारवर आक्रमकपणे टीका करत आहेत.
८२ जणांचा शौर्य व सेवा पदकांनी गौरव
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नावांची घोषणा
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात ३०१ शौर्य पदके जाहीर झाली असून, त्यापैकी महाराष्ट्रातील २० पोलीस आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशिष्ट सेवेसाठी ९२ पदके, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६४ पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड आणि सुधारात्मक सेवा क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण व विशिष्ट सेवेसाठी पदकांनी गौरवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार!
पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भाला यलो अलर्ट Top 10 News :
महाराष्ट्रात आज, १५ ऑगस्टला काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून, आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण;
प्रथमच ‘वंदे मातरम्’चे औपचारिक गायन
देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वंदे मातरम्’चे औपचारिक गायन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. देशाला संबोधित करताना मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला. “आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे,” असे ते म्हणाले. देश नव्या संकल्पासह पुढे जात असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने हा सोहळा विशेष ठरला.
पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत!
प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी
अमेरिकेच्या NOAAच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने ‘एल निनो’बाबत पुढील नऊ महिन्यांचा अंदाज जारी केलाय . त्यानुसार जानेवारी २०२७पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान कमी होण्याची शक्यता असून, पुढील वर्षीच्या मॉन्सूनपर्यंत ‘न्यूट्रल’ स्थिती निर्माण होऊ शकते. सध्या प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील तापमान सरासरीपेक्षा २.९ अंशांनी अधिक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान विक्रमी तीव्रतेचा ‘एल निनो’ निर्माण होण्याची शक्यता ६९ टक्के असल्याचा अंदाज आहे. मात्र, नोव्हेंबरनंतर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. जून २०२७पर्यंत तापमान सरासरीच्या जवळ येण्याची शक्यता असून, न्यूट्रल स्थितीचा पुढील मॉन्सूनवर मोठा प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे ऐतिहासिक आकडेवारीवरून दिसते.
जपानमध्ये विक्रमी पावसाचा कहर!
एका तासात ११५ मिमी पाऊस; पूर-भूस्खलनाने मोठी हानी
टोकियोजवळील चिबा प्रांतात गुरुवारी रात्री विक्रमी मुसळधार पाऊस झाला. काही भागांत एका तासात तब्बल ११५ मिमी पावसाची नोंद झाली, जी ऑगस्टच्या संपूर्ण महिन्यातील सरासरी पावसाइतकी आहे. अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन होऊन मोठी जीवितहानी झाली असून, हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुमारे ७ हजार प्रवासी नारिता विमानतळावर रात्रभर अडकले, तर ४ लाखांहून अधिक लोकांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले. जवळपास ४५ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जपानच्या हवामान संस्थेने चिबाच्या काही भागांसाठी सर्वोच्च लेव्हल-५ इशारा जारी केला. बचावकार्य सुरू असून, पाऊस कमी झाला असला तरी पूर आणि भूस्खलनाचा धोका कायम आहे.
महिला आशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज;
जेमिमा रॉड्रिग्स बाहेर, प्रतिका रावलला संधी
महिला आशिया कप २०२६ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान दुबईत होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. मात्र, स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाली असून, तिच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. संघात शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, रेणुका ठाकूर आणि अरुंधती रेड्डी यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना ३० ऑगस्टला थायलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरला हाँगकाँग चायना, तर ५ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध सामना होईल.
‘एका प्रामाणिक अधिकाऱ्याने महाराष्ट्र हादरवला”
देवोलीना भट्टाचार्जीने तुकाराम मुंढेंसाठी केली पोस्ट Top 10 News :
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने कौतुक केले आहे. देवोलीनाने एक्सवर पोस्ट करत, “एका प्रामाणिक अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे,” असे म्हटले. तुकाराम मुंढेंसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक विभागात असते, तर कायदा मोडण्यापूर्वी गुन्हेगारांनी विचार केला असता, असेही तिने नमूद केले. प्रामाणिकपणाची मोठी किंमत मोजावी लागते, असा उल्लेख करत FDA विभागातील भेसळ आणि गैरप्रकारांविरोधातील कारवाईसाठी मुंढेंना पुरेसा वेळ मिळावा, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. मे २०२६मध्ये FDA आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत.





