Top 10 News : जयंत पाटील आणि एकनाथ शिंद यांच्यात भेट, लाडक्या बहिणींना आणखी एक झटका आणि ‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप, टॉप १० बातम्या
Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली.

जयंत पाटील आणि एकनाथ शिंद यांच्यात भेट
बंद दाराआड नेमकी काय चर्चा ?
Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. जवळपास तासभर झालेल्या भेटीत जयंत पाटील आणि शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
लाडक्या बहिणींना आणखी एक झटका !
एकनाथ शिंदेंची मोफत साडी योजना बंद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठीची मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेत दरवर्षी एक साडी दिली जात होती. मात्र वाढता आर्थिक भार, इतर योजनांचा खर्च आणि शासनाची आर्थिक दायित्वे लक्षात घेऊन वस्त्रोद्योग विभागाने योजना बंद करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे २५ लाख कुटुंबांना मिळत होता.
महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद,
विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेत गाशाच गुंडाळला
मुंबई, पुणे आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये लोकप्रिय असलेल्या एम.टी. एज्युकेअर लिमिटेड (महेश ट्युटोरियल्स)ने अचानक आपल्या शाखा बंद करण्यास सुरुवात केली आहे. गेली 38 वर्षे बारावी, नीट, जेईई, स्पर्धा परीक्षा तसेच सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी ही संस्था पालकांमध्ये विश्वासार्ह मानली जात होती. चांगल्या निकालाच्या आशेने अनेक पालक लाखो रुपयांची फी भरत होते. मात्र, अचानक शाखा बंद होऊ लागल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून शैक्षणिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
“मी तुकाराम मुंढेंचा डॉक्टर काम असल्यास सांगा”
पुण्यातील डॉक्टरवर गुन्हा
पुण्यातील एका डॉक्टरनं तुकाराम मुंढेंचे आपण डॉक्टर असून आपली त्यांच्याशी ओळख आहे, त्यांच्याकडे काही काम असल्यास आपण करुन देऊ असा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर टाकला होता. हा मेसेज टाकणं डॉक्टरला महागात पडलं आहे. या मेसेज प्रकरणी पुण्यातील डॉक्टरवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिमांशू अजवानी असं या 48 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरचं व्हाटसअप चॅट समोर आल्यानंतर FDA कडून तक्रार करण्यात आली होती. तुकाराम मुंढेंच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसल्याच तक्रारीत म्हटलंय.
जळगावात भीषण अपघात ;
कार घाटात कोसळून ३ जणांचा मृत्यू Top 10 News :
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गाडेगावजवळील घाटात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सहा जण वाहनातून प्रवास करत असताना घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन अनेक वेळा पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर वाहनाचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिक आणि आरोग्य पथकाने जखमींना तातडीने बाहेर काढून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.
‘नीट’चा निकाल जाहीर;
17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश
पेपरफुटीनंतर पुन्हा घेण्यात आलेल्या नीट-यूजी २०२६ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गुरुवारी रात्री जाहीर केला. २१ जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेला २० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. पंजाबच्या आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पानशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवत संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असून ओएमआर शीट आणि स्कोअरकार्ड डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी निकाल जाहीर करण्यात आल्याचे एनटीएने सांगितले.
अयोध्येनंतर वैष्णोदेवी मंदिरात महाघोटाळा,
मंदिरात 500 कोटींची नकली चांदी?
अयोध्येतील राममंदिरातील दान चोरी प्रकरणानंतर आता वैष्णो देवी मंदिरातील सुमारे ५०० कोटी रुपयांच्या चांदीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, तपासलेल्या सुमारे २० टन चांदीपैकी केवळ ५ ते ६ टक्के चांदीच खरी असून उर्वरित धातूंमध्ये भेसळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना २९ जुलै रोजी सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हे आरोप अद्याप न्यायालयीन तपासाधीन असून त्याबाबत अंतिम निष्कर्ष किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही.
चीनने आमच्या निवडणुकीतील २२ कोटी मतदारांचा डेटा चोरला
डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर २२ कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे. देशाला संबोधित करताना त्यांनी २५ मिनिटांच्या भाषणात हा दावा केला. ट्रम्प यांच्या मते, २०२० च्या निवडणुकीपासून चीनने मतदारांच्या माहितीमध्ये हस्तक्षेप केला असून एका अमेरिकन पत्रकाराच्या मदतीने मतदारांच्या फाइल्स बेकायदेशीररित्या मिळवल्या. मात्र, ट्रम्प यांच्या या आरोपांना अद्याप कोणतेही अधिकृत पुरावे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत आणि चीनकडूनही यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी बातमी
रोहित शर्माचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना?चर्चांना उधाण
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवरील तिसरा वनडे हा भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. 2027 विश्वचषकाच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार निवड समिती करत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. मात्र, रोहितच्या निवृत्तीबाबत किंवा संघाबाहेर करण्याबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे या वृत्तांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहितला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने 26 धावा केल्या आणि भारतालाही चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे निर्णायक ठरणार आहे.
इतिहासाशी छेडछाड सहन करणार नाही;
‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप Top 10 News :
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटावर वाद निर्माण झाला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांच्या नातू धनंजय खुडे यांनी केला. कुटुंबीयांची संमती न घेता चित्रपटाची निर्मिती झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे. चित्रपटातील वादग्रस्त बाबी दुरुस्त न केल्यास निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा आणि राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे.





