Top 10 News: राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, काँग्रेसच्या आमदाराला 20 कोटींची ऑफर? आणि आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार
अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा
Top 10 News: राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील मानखुर्द येथे चाळीचा भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर पुणे जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकजवळही दरड कोसळल्याने वाहतूक वळवण्यात आली. दरम्यान, या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाच्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणेसह 13 शहरांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शासकीय, खासगी व महापालिका शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, लोणावळा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघर येथेही शाळा बंद राहतील. प्रशासनाने पालकांना मुलांना घराबाहेर न पाठवण्याचे आवाहन केले असून नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे सांगितले आहे.
मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारलेल्या मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना सोमवारी घडली. लोणावळा आणि तळेगाव परिसरात गेल्या दोन दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने डोंगरावरील राडारोडा छताच्या भागातून खाली कोसळत आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरिकांना सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास शक्यतो टाळण्याचे आवाहन केले आहे. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या आमदाराला 20 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण तापले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे सेनेकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार लिंगाडे यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. दरम्यान, राऊतांच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार पलटवार केला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी, “संजय राऊत मनात येतील ते आकडे सांगतात. त्यांच्या दाव्यांना कोणताही तथ्याधार नाही,” असा टोला लगावत आरोप निराधार असल्याचे म्हटले.
चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या,
अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अकोला शहरात एका नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये जिवंत आळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. कौलखेड येथील संतोष शेंदूरसे यांनी आपल्या मुलासाठी दुकानातून चॉकलेट खरेदी केले होते. घरी रॅपर उघडताच चॉकलेटमध्ये जिवंत आळ्या वळवळताना दिसल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने मुलाने चॉकलेट खाल्ले नव्हते, त्यामुळे संभाव्य अन्नबाधा टळली. या प्रकरणी शेंदूरसे यांनी अन्न व औषध प्रशासन तसेच ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली असून संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
सुन रहे हो न विनोद!
नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल Top 10 News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साणंद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘पंचायत’ वेब सीरिजमधील “सुन रहे हो न, विनोद” हा लोकप्रिय डायलॉग वापरत उपस्थितांची मने जिंकली. सीजी सेमी आऊटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या अत्याधुनिक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हा उल्लेख केला. कार्यक्रमात सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्सचे चेअरमन वेल्लायन सुबैया यांनी वापरलेल्या गुजराती म्हणींचा संदर्भ घेत मोदींनी आपल्या खास शैलीत हा संवाद फेकला. त्यांच्या या अनपेक्षित वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून मोदींच्या विनोदी शैलीची पुन्हा चर्चा रंगली आहे.
गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात..’
बंडखोरांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील कथित बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांना थेट इशारा दिला. “मला थांबवायचे असेल तर आधी मला मारावे लागेल. हिंमत असेल तर उघडपणे भाजपमध्ये सामील व्हा,” असे त्या म्हणाल्या. पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि जनतेचा पाठिंबा कायम असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षातील काही खासदार आणि आमदारांनी स्वतंत्र गट तयार केल्याच्या चर्चेदरम्यान त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. दरम्यान, टीएमसीच्या पश्चिम बंगाल अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अयातुल्ला अली खामेनींच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय
ट्रम्प आणि अमेरिकेच्या नाशाच्या दिल्या घोषणा
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यदर्शनासाठी तेहरानच्या ग्रँड मसल्ला येथे लाखो नागरिकांनी गर्दी केली. शिया परंपरेनुसार काळे कपडे परिधान करून नागरिकांनी शोक व्यक्त करत घोषणाबाजी केली. 3 ते 9 जुलैदरम्यान अंत्यविधीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मात्र रशिया, चीन, भारत आणि तुर्कीसारख्या देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी उपस्थिती लावली नाही. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानवतावादी कारणास्तव इराणला एका आठवड्याची सूट दिल्याचा दावा केला असून, त्यानंतर अमेरिकेच्या अटींचे पालन करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
ब्राझीलला दणका; नॉर्वेने मारली बाजी
अर्लिंग हालंड विजयाचा शिल्पकार
पाच वेळचा विश्वविजेता ब्राझीलला यंदाच्या फुटबॉल विश्वचषकातून राऊंड ऑफ 16 मध्येच गाशा गुंडाळावा लागला. नॉर्वेने 2-1 असा धक्कादायक विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्लिंग हालंडने 79व्या आणि अखेरच्या क्षणी आणखी एक गोल करत नॉर्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्राझीलकडून 67व्या मिनिटाला नेमारने बरोबरीचा गोल केला होता. नॉर्वेचा गोलरक्षक ओर्जन नायलंड यानेही अप्रतिम बचाव करत विजयात मोलाची भूमिका बजावली. 1990 नंतर प्रथमच ब्राझीलचा संघ क्वार्टरफायनलपूर्वी स्पर्धेबाहेर पडल्याने फुटबॉल विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ!
अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत Top 10 News:
बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला असून त्याने गौरी स्प्रॅटसोबत मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल निवासस्थानी खासगी समारंभात लग्न केले. विशेष विवाह कायद्यानुसार झालेल्या या सोहळ्याला कुटुंबीय, जवळचे मित्र आणि काही निवडक पाहुण्यांची उपस्थिती होती. आमिरचे हे तिसरे, तर गौरी स्प्रॅटचे दुसरे लग्न आहे. कोणताही मोठा दिखावा न करता साध्या पद्धतीने विवाह पार पडला. काही महिन्यांपूर्वी आमिरने गौरीची माध्यमांसमोर ओळख करून दिली होती. आता त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





