Top 10 News: मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट आणि कंगना-क्रिती वादात राहुल गांधींची एन्ट्री, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रशासकीय विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय!
प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश
Top 10 News: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रशासकीय विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात येणार आहे. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्त्याचा प्रलंबित निधी देण्यासह कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण विहित मुदतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आण्णासाहेब पाटील महामंडळाला दिलेले 450 कोटी रुपये लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
MPSC पेपर लीक प्रकरणात खळबळ!
भरती प्रक्रिया रद्द; रोहित पवारांचा आयोगावर गंभीर आरोप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाची भरती प्रक्रिया पेपर लीक प्रकरणामुळे रद्द केली असून आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पेपर केवळ एका विद्यार्थ्याकडे होता, हे स्पष्टीकरण मान्य नसल्याचे सांगत एजंटांच्या रॅकेटमार्फत लाखो रुपयांना पेपर विकला गेल्याचा आरोप त्यांनी केला. चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करत आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
मंत्रालयातील ‘क्रीम पोस्टिंग’वर सरकारचा हातोडा;
314 अधिकाऱ्यांना ‘गो बॅक’चा आदेश
मंत्रालय आणि मंत्र्यांच्या आस्थापनेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या 314 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. विहित प्रक्रिया न पाळता उसनवारी, प्रतिनियुक्ती किंवा मौखिक आदेशावर झालेल्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना 10 सप्टेंबर 2026 पर्यंत मूळ विभागात परत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत रुजू न झाल्यास वेतन बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईचा अंतिम अहवाल 20 सप्टेंबरपर्यंत मुख्य सचिव कार्यालयाला सादर करण्यात येणार असून मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!
खात्यात जमा होऊ लागले १,५०० रुपये
राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना याचा लाभ मिळणार असून पुढील दोन ते तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, सध्या केवळ जुलै महिन्याचाच हप्ता वितरित होत असून ऑगस्टचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर!
पुणे घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट Top 10 News:
राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी सुरू असून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यासह नाशिक आणि जळगावमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूरमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच? १२ जागा रिक्त;
युवा, महिला आणि नव्या मित्रपक्षांना संधीची चर्चा
भाजपच्या नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात 69 मंत्री असून तब्बल 12 पदे रिक्त आहेत. आगामी विस्तारात युवा आणि महिला खासदारांसह नव्या मित्रपक्षांच्या प्रतिनिधींना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीची समीकरणेही विचारात घेतली जाऊ शकतात. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, तसेच अन्य नव्या राजकीय मित्रपक्षांच्या नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जात जनगणनेवरून राहुल गांधींचं मोदींना पत्र;
OBC साठी स्वतंत्र कॉलमची मागणी
केंद्र सरकारच्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जात जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी केली आहे. सध्याच्या जनगणना फॉर्ममध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र श्रेणी नसल्याने अचूक आकडेवारी मिळण्यात अडचणी येतील, असा काँग्रेसचा दावा आहे. बिहार आणि तेलंगणाच्या धर्तीवर नवीन प्रश्नावली तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील ओबीसी संघटनांनीही स्वतंत्र कॉलमची मागणी केल्याने हा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय!
जगभरातील व्हिसा अपॉइंटमेंट्स स्थगित
अमेरिकेला जाण्याची तयारी करणाऱ्या व्हिसा अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रम्प प्रशासनाने जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमधील काही व्हिसा अपॉइंटमेंट्सच्या वेळापत्रकात बदल केला आहे. व्हिसा अधिकाऱ्यांसाठी जागतिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जदारांची अधिक सखोल आणि एकसमान पद्धतीने तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. इमिग्रंट व्हिसासाठी मुलाखती निश्चित झालेल्या काही अर्जदारांना ई-मेलद्वारे तारीख बदलल्याची माहिती देण्यात आली असून नवीन अपॉइंटमेंटची तारीख नंतर कळवली जाणार आहे.
श्रीलंकेच्या खेळाडूवर ICCची कारवाई!
बॅट आपटणे पडले महागात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील मैदानावरील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यानंतर आता श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या आयसीसीच्या कारवाईच्या कचाट्यात सापडला आहे. बाद झाल्यानंतर संतापाच्या भरात सीमारेषेजवळ बॅट आपटल्याने जयसूर्याला आयसीसीने डिमेरिट पॉइंट दिला. त्याने आपली चूक मान्य केली आहे. दरम्यान, भारताने ९ बाद ५०३ धावांवर डाव घोषित केला. देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनी शतके झळकावली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ८ बाद २६५ धावा केल्या आहेत.
कंगना-क्रिती वादात राहुल गांधींची एन्ट्री!
म्हणाले, ‘महिलांना ट्रोल करणं बंद करा’ Top 10 News:
रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील क्रिती सॅननच्या पेहरावावरून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने टीका केली होती. यावर क्रितीनेही सडेतोड उत्तर देत महिलांच्या कपड्यांवरून त्यांना जज करण्याला विरोध केला. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी क्रितीला पाठिंबा दिला आहे. क्रितीची सोशल मीडिया पोस्ट रिपोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, महिला काय घालते, काय करते आणि कुठे जाते, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. महिलांना स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल ट्रोल करणे बंद करा, असे म्हणत त्यांनी ‘स्मॅश द पॅट्रियार्की’ असा हॅशटॅगही वापरला.





