Top 10 News : “गणेश नाईक कद्रू मनाचा अन् अल्पसंतुष्ट माणूस”, पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका आणि ‘तो म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल…’ वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

शिवसेना फुटणार याची कुणकुण मला होती;
उद्धव ठाकरेंनी अखेर बोलून टाकलं
Top 10 News : राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगलीय. ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांदरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम चर्चा पूर्ण झाली असून, आता केवळ प्रवेशाची तारीख ठरायची आहे, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील या बंडखोरांविषयी मोठं विधान केलंय. ‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं मी कोणालाही अडवणार नाही’ असं त्यांनी म्हटलंय. तसंच सर्वांना वाटते कि मला काही कळत नाही पण हे बंडखोर पक्ष सोडून जाणार असल्याची कुणकुण मला अगोदरच लागली होती असं म्हणत जबरदस्तीने कोणाला थांबवून ठेवण्यात काही अर्थ नसल्याचेही त्यांनी म्हटलंय.
मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट;
४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून
राज्यात शेतकरी मान्सूनची चातकासारखी वाट पाहत असताना दुसरीकडे पावसाअभावी सर्वत्र पाणी टंचाईची झळ सोसावी लगतीय. मात्र पाऊस पडणार तरी कधी? हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. राज्यातील दक्षिण भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात मात्र मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली आहे.दरम्यान, हवामान विभागाने आज कोकणासह राज्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून उन्हाचा चटका कायम राहण्याची आणि विजांसह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
गणेश नाईक कद्रू मनाचा अन् अल्पसंतुष्ट माणूस
शहाजी बापूंचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदे यांचे नाव पत्रिकेतून वगळल्यानंतर शिवसेनेचे सर्वच नेते आक्रमक झाले असून आता शहाजी बापू पाटील यांनीही गणेश नाईकांवर शेलक्या शब्दात टीका करताना त्यांना त्यांचा इतिहास आठवून दिला आहे. गणेश नाईक हा कद्रू मनाचा आणि अल्पसंतुष्ट माणूस आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमात पालकमंत्र्याचे नाव असणे हे पालकमंत्री पद निर्माण झाल्यापासून पाळले जाते. गणेश नाईक हे भाजपचे निष्ठावंत वगैरे अजिबात नाही. 1997 मध्ये महायुतीचे सरकार असताना या गणेश नाईक यांनी शरद पवार यांना संपर्क साधून मनोहर जोशी यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा डाव अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी शहाजी बापू पाटील यांनी केलाय.त्यासोबतच एक दिवस नव्या मुंबईच्या राजकारणातून गणेश नाईक हे संपलेले दिसतील असा टोलाही शहाजी बापू यांनी लगावला आहे.
पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका;
सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालेल्या पुणेकरांना आता पुन्हा एकदा महागाईचा आणखी एक मोठा झटका सहन करावा लागणार आहे. कारण पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा दरवाढ करण्यात आलीय. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयांची, तर पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ करण्यात आलीय. दरम्यान, MNGL कडून मध्यरात्री पासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून सोमवारी म्हणजेच काल रात्रीपासून हि दरवाढ लागू करण्यात आलीय. दरवाढीनंतर सीएनजीची किंमत 95.75 प्रति किलो झाली असून महागाईचा फटका आता सीएनजी धारकांनाही बसणार आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.
अल्पवयीन मुलांचा वापर करण्याच्या रॅकेटमधून पैशांचा बाजार
खासदार विशाल पाटील यांचे गंभीर आरोप
सांगलीच्या मिरज तालुक्यातील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याची रविवारी त्याच्या घरी डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सांगलीत घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना वापरण्याचा एक पॅटर्न आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घेण्यासाठी उद्युक्त करणारी पोलिसांची एक टोळी सांगलीत कार्यरत आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलांचा वापर करण्याच्या रॅकेटमधून पैशांचा बाजार मांडला आहे, असा आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला. वेदांत बंडगरची हत्या केल्याच्या घटनेनंतर सांगलीत संतापाची लाट उसळली होती. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार घेतल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी आशा होती. पण, परिस्थिती बिकट होत चालल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जातायेत. त्यावरूनच विशाल पाटील यांनी हे गंभीर आरोप केलेत .
आयव्हीएफ सेंटरवर मूल बदललं, DNA टेस्टमधूनही सिद्ध
अपत्य परत आणण्यासाठी आई-वडिलांची आगतिकता
हरियाणातील गुरुग्राममधून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी आणि IVF तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका दांपत्यानं गुरुग्राममधील आयव्हीएफ सेंटरवर त्यांचं मूल बदलल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. संशय आल्यानं दांपत्याने मुलाची डीएनए चाचणी केली असता, जन्माला आलेलं मूल त्यांचं अपत्य नसल्याचं वैद्यकीय अहवालात सिद्ध झालं. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र अवघ्या 24 तासांत पोलिसांनी तपास रोखल्यामुळे पीडित दांपत्यानं आता थेट सोशल मीडियाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.राहुल राठोड आणि मीनू राठोड अशी पीडित माता-पित्यांची नावं आहेत. तब्बल 5 ते 6 लाख रुपयांचा खर्च आणि अनेक महिने वेदनादायी उपचारांना सामोरं जाऊनही पदरी फसवणूक आल्यानं या दांपत्यानं आता केंद्रीय यंत्रणांकडे धाव घेतलीय.
IT क्षेत्रात मंदीची लाट येणार?
कर्मचारी नियुक्तीत 70 टक्क्यांपर्यंत घट
आयटी क्षेत्रात आतापर्यंतचं सर्वात मोठं संकट आलं असून सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचे वर्चस्व धोक्यात आलंय. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात यासंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आलेत.कोविड-19 काळात, तंत्रज्ञान कंपन्यांनी बेछूटपणे नोकरभरती केली. ज्याला आता अतिभरती सुधारणा म्हणत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणल्या जात आहेत. तसंच, कंपन्यांनी तेव्हा गरजेपेक्षा जास्त अभियंत्यांची भरती केली होती, त्यामुळे आता खर्च कमी करण्यासाठी कंपन्या सातत्याने कर्मचारी कपात करत आहेत. या नोकर कपातीतील धक्कादायक बाब म्हणजे गिटहब कोपायलट आणि इतर जनरेटिव्ह एआय कोडिंग साधनांमुळे आयटी कंपन्यांमध्ये इंजिनिअर नियुक्तीत तब्बल 70 टक्क्यांपर्यंत घट झालीये.खरंतर, एआयमुळे जगातील सर्व क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचं संकट ओढावलंय. त्यामुळे पुढील काळात जगभरातील नोकरदारांसमोर एआय हे मुख्य आव्हान असणार आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये शुक्रवारी करारावर होणार स्वाक्षरी
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीचा ऐतिहासिक करार झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. जवळपास चार महिन्यांच्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर ऑनलाईन पद्धतीने स्वाक्षऱ्या केल्यात. डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्रध्यक्ष जे. डी. व्हॅन्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी या मसुद्यावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिली आहे. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणमधील महत्वपूर्ण कराराचा औपचारिक स्वाक्षरी सोहळा येत्या शुक्रवारी पार पडणार आहे. तर, पुढील ४८ तासांत या कराराचा सविस्तर तपशील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
बेन स्टोक्सची कर्णधारपदावरुन सुट्टी!
ECBचा मोठा निर्णय
न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर ११५ धावांनी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता मालिकेतील दुसरा सामना १७ जूनपासून ओव्हलमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या टीम मॅनेजमेंटने धक्कादायक निर्णय घेत बेन स्टोक्सला प्लेईंग ११ मधून बाहेर केलं असून, आणखी ३ खेळाडूंना संघाबाहेर ठेवलंय. या दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी जो रुटकडे सोपवण्यात आलीय. आतापर्यंत बेन स्टोक्स कसोटी संघाचा कर्णधार होता. पण पहिल्या कसोटी सामन्यानंतर बेन स्टोक्स आणि गस एटकिंसनने नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दोघांनाही प्लेईंग ११ मधून बाहेर करण्याचा निर्णय घेतलाय.
‘म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल…’
अरबाज खानच्या पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर Top 10 News :
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्यासाठी अरबाजची पत्नी शूरा खान ही आहे. काही दिवसापूर्वी शूराने तिच्या सोशल मीडियावर चॅट सेशन ठेवून तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना तिने दिलखुलासपणे उत्तरं दिली. दरम्यान, याच सेशनमध्ये एका चाहत्याने तू म्हाताऱ्याशी लग्न करून खुश आहेस का ? असा थेट सवाल केला. मात्र या प्रश्नाला कोणतेही आढेवेढे न घेता उत्तर दिलं. ती म्हणाली की, “खरंच का? ते म्हातारे नाहीत, ते एक लिमिटेड-एडिशन विंटेज मॉडल आहेत…” तिच्या या उत्तराने शूरा आणि अरबाज यांना त्यांच्या वयावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर मिळालं असल्याचं म्हटलं जातंय.अरबाजनं 2023 मध्ये शूराशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगीही आहे. अरबाज हा त्याच्या पत्नीपेक्षा साधारणपणे 23 वर्षांनी मोठा आहे. वयातील या अंतरामुळे दोघांनाही अनेकदा ट्रोल केलं जातं.



