Top 10 News : जयंत पाटील-तावडेंची गुप्त भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन आणि इंग्लंडने भारताला लोळवले, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या मुंबईतील भेटीनंतर शरद पवार गट महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट
देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Top 10 News : भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या मुंबईतील भेटीनंतर शरद पवार गट महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातून कोणताही नवीन पक्ष एनडीएमध्ये येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार फोडण्याचा भाजपचा कोणताही प्रयत्न नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तावडे-पाटील भेटीनंतर रंगलेल्या राजकीय तर्क-वितर्कांना फडणवीसांच्या वक्तव्याने पूर्णविराम मिळाला.
संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन,
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपूरमधून सुरुवात
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. बैठकीत अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरण, संघटनाबांधणी आणि आगामी विधिमंडळ अधिवेशनावर चर्चा झाली. राज्यभर ‘रामरक्षा आंदोलन’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनानंतर पुढील आठवड्यात नागपूरमध्ये या आंदोलनाची सुरुवात होणार असून स्वतः उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्यानंतर विदर्भासह राज्यभर आंदोलनाचा विस्तार केला जाणार आहे. राम मंदिराच्या दानचोरी प्रकरणी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आमदारांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन प्रभावीपणे उभे करावे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.
राज्यात आजही अतिवृष्टी
वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज
राज्यात सलग पाचव्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास महत्त्वाचे असल्याचा इशारा देत पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह कोकणातील अनेक भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे पूर, दरड कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खडकवासला धरण तुडुंब भरलं,
मध्यरात्रीच्या अंधारात दरवाजे उघडले
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या मुठा नदीत 22,880 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी राजपूत नगर, पुलाचीवाडी, एकता नगरी आणि निंबजनगर परिसराची पाहणी केली. नदीपात्रातील पाणीपातळी वाढल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून वाहतूक विस्कळीत होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये सध्या 14 टीएमसी म्हणजेच 48 टक्के पाणीसाठा आहे.
तुळजाभवानी मातेची हजारो एकर जमीन लाटली;
आकडेवारीसह जयंत पाटील यांचा गंभीर आरोप Top 10 News :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम जमिनींबाबत गंभीर आरोप केले. निजामाने देवीला दिलेल्या 4,121 एकर इनाम जमिनींपैकी हजारो एकर जमीन खासगी व्यक्तींच्या ताब्यात गेल्याचा दावा त्यांनी केला. काही जमिनींची बेकायदेशीर विक्री झाली असून, मुख्य न्यासाला माहिती न देता जमिनींची नावे बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. जगदंबा न्यासाच्या 403 एकर जमिनीचे हस्तांतरण, 63 एकर जमिनीची कथित बेकायदेशीर विक्री आणि 261 एकर जमीन 73 खासगी व्यक्तींच्या नावावर नोंदवल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
राम मंदिरात 40 दिवसांत 70 वेळा चोरी
SITच्या अहवालात धक्कादायक खुलासे
राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणात एसआयटीच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 27 एप्रिल ते 5 जून 2026 या 40 दिवसांत तब्बल 70 वेळा चोरी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दानपेटीतून नोटांची बंडले काढताना दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. दानपेटीतील रकमेच्या मोजणीसंदर्भातील सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याने ही चोरी शक्य झाल्याचे एसआयटीने म्हटले आहे. प्रकरणानंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असून, आर्थिक कामकाजातील निष्काळजीपणावरही अहवालात बोट ठेवण्यात आले आहे.
‘आता कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर बस चालणार’
नितीन गडकरींची माहिती
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील बसेस भविष्यात हायड्रोजन इंधनावर धावू शकतील, अशी महत्त्वाची संकल्पना मांडली. दिल्ली भाजपच्या युवक परिषदेत बोलताना त्यांनी महानगरपालिकेने वेगळा केलेल्या कचऱ्यावर बायोडायजेस्टरद्वारे प्रक्रिया करून हायड्रोजन वायू तयार करता येईल, असे सांगितले. या इंधनाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. भविष्यात पाण्यापासूनही हायड्रोजन निर्मिती करून त्यावर वाहने चालविण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त करत कचऱ्यापासून इंधन निर्मिती हा शाश्वत पर्याय ठरू शकतो, असेही नमूद केले.
अमेरिका-इराण युद्धबंदी धोक्यात?
आखातात २४ तासांत ३ तेलवाहू जहाजांवर हल्ले
अमेरिका-इराण युद्धबंदी करारानंतरही आखातातील तणाव पुन्हा वाढला आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत गेल्या 24 तासांत तीन तेलवाहू जहाजांवर हल्ले झाल्याने जागतिक इंधन पुरवठा आणि सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. ब्रिटनच्या सागरी सुरक्षा यंत्रणेच्या माहितीनुसार, मंगळवारी एका अज्ञात ड्रोनने तिसऱ्या जहाजावर हल्ला केला. या घटनेत जहाजाचे किरकोळ नुकसान झाले, मात्र जीवितहानी टळली. यापूर्वी ओमान किनाऱ्याजवळ कतारच्या एका तेलवाहू जहाजाला आग लागल्याची घटना घडली होती. सलग हल्ल्यांमुळे आखातातील सुरक्षेची परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.
इंग्लंडने भारताला लोळवले,
संपूर्ण संघ 76 धावांवर गारद
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 76 धावांत सर्वबाद झाला. या पराभवामुळे इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 70 धावांची दमदार खेळी केली, तर सॅम करन 41 धावांवर नाबाद राहिला. भारताची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संघाने अवघ्या पाच षटकांत 52 धावांत पाच विकेट्स गमावल्या. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग पाचवा पराभव नोंदला गेला. या लाजिरवाण्या पराभवासह टीम इंडियाच्या नावावर काही नकोसे विक्रमही नोंदवले गेले.
कपूर खानदानाची लेक चढली बोहल्यावर;
बॉयफ्रेंडसोबत घेतले सातफेरे
बॉलिवूडचे निर्माते बोनी कपूर यांची कन्या अंशुला कपूर हिने तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत मुंबईत पार पडलेल्या शाही सोहळ्यात विवाह केला. या आनंदाच्या क्षणी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसले. जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही लग्नसोहळ्यात उपस्थित राहून उत्साहात सहभाग घेतला. डान्स, संगीत आणि जल्लोषाने रंगलेल्या या सोहळ्यात कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लेकीच्या लग्नावेळी बोनी कपूर भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. कपूर कुटुंबात नव्या नात्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.




