Top 10 News : देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रात मोठी जबाबदारी?, झुरळांनी बेगॉनला हरवलं आणि आकांक्षा चमोला पुन्हा एकदा ट्रोल, वाचा टॉप 10 बातम्या
Top 10 News : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रात मोठी जबाबदारी?
दिल्ली दौऱ्याने चर्चाना उधाण
Top 10 News : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती असली, तरी चर्चेचा तपशील उघड करण्यात आलेला नाही. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची संधी मिळू शकते, असा दावा केला. मात्र प्रल्हाद जोशी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून, फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विविध तर्कवितर्क रंगले आहेत.
झुरळांनी बेगॉनला हरवलं!
संदीप देशपांडे यांची मोदींवर टीका
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांच्या पोस्टमधील व्यंगचित्र आणि कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा आनंद साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या विविध पोस्ट आणि प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार;
या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पुढील दोन ते चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे घाटमाथ्यास रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलैमध्ये राज्यात सरासरीपेक्षा तीन टक्के कमी पाऊस झाला असून, मराठवाड्यात सर्वाधिक 33 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का!
वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन लोट्सचा ‘विजय’
गडचिरोलीतील धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. १७ पैकी १३ जागा जिंकून सत्तेत आलेल्या काँग्रेसकडे आता केवळ चार नगरसेवक उरले आहेत. या घडामोडीमुळे धानोरा नगरपंचायतीवरील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. बावनकुळे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा अपघाती मृत्यू
पक्षाच्याच माजी जिल्हाप्रमुखावर आरोप
अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दुचाकीला चारचाकीची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर संशय व्यक्त करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला
प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला. शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केला. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी देशहित आणि नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्पष्ट केले.
भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अमित शाहांची प्रतिक्रिया
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत, भाजपसाठी पदापेक्षा देश, तरुण आणि विद्यार्थी महत्त्वाचे असल्याचे म्हटले. पेपरफुटीप्रकरणी आवश्यक सुधारणा करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारून प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली. दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजीनाम्याचे स्वागत करत शिक्षण व्यवस्थेत पारदर्शक सुधारणा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्ष करणार?
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी यांची मोठी घोषणा
नीट-यूजी परीक्षा वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी मोठी घोषणा केली. विधानसभा व लोकसभा निवडणूक लढवण्याचे किमान वय 25 वरून 21 वर्षे करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विशेष अधिवेशनात ठराव मंजूर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 21 वर्षांचे युवक आयएएस-आयपीएस होऊ शकतात, तर आमदार-खासदार का नाही, असा सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याचीही त्यांनी मागणी केली.
भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्सचं पहिलंच पदक
झंडू कुमार यांनी रचला इतिहास
कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात पहिले पदक जमा झाले आहे. पॅरा पॉवरलिफ्टिंगच्या हेवीवेट प्रकारात झंडू कुमार यांनी कांस्यपदक पटकावले. त्यांनी 181 आणि 190 किलो वजन यशस्वीपणे उचलत 130.9 गुण मिळवले. पोलिओ, आर्थिक अडचणी आणि संघर्षांवर मात करत त्यांनी हे यश मिळवले. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवले आहेत. दरम्यान, पॅरा स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बाउल्समध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेश केला आहे.
गौरवपेक्षा माझा कुत्रा आला असता तरी…’;
आकांक्षा चमोलाच्या वक्तव्यावरून ट्रोलिंग
‘लॉक अप 2: सच या सजा’ या शोमध्ये अभिनेत्री आकांक्षा चमोला पुन्हा चर्चेत आली आहे. शोदरम्यान तिने, “गौरव खन्नापेक्षा माझा कुत्रा भेटायला आला असता तरी मला जास्त आनंद झाला असता,” असे वक्तव्य केले. तिने त्या क्षणी माजी पतीऐवजी आपल्या जवळच्या व्यक्तीची गरज असल्याचे स्पष्ट केले. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी तिच्यावर टीका केली, तर काहींनी तिच्या भावनांचे समर्थन केले. यापूर्वीही आकांक्षाने शोमध्ये गौरव खन्नासोबत घटस्फोट घेणार असल्याचा आणि आपण बायसेक्शुअल असल्याचा खुलासा केला होता.




