Top 10 News : प्रवीण दरेकरांचं जरांगेंना ओपन चॅलेंज, “एलजीबीटी समुदाय हा समाजाचाच भाग” आणि ‘गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?’, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती.

प्रवीण दरेकरांचं जरांगेंना ओपन चॅलेंज (Top 10 News)
मुख्यमंत्र्यांवरील टीकेला दिले उत्तर
Top 10 News : मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. जात पडताळणी समितीला न्यायालयीन अधिकार असून कोणताही मंत्री त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा सिस्टिममध्ये राहून काम करण्याचे महत्त्व सांगत, जरांगे यांनी निवडणूक लढवून विधिमंडळात यावे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.
राज्यात १ ते १२ साठी शिक्षकांची भरती
पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30,209 शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 उत्तीर्ण उमेदवारांना 11 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे. जिल्हा परिषदांच्या 13,352, महापालिकांच्या 1,954, नगरपालिकांच्या 280 आणि खासगी शैक्षणिक संस्थांच्या 12,148 पदांचा यात समावेश आहे. उमेदवारांना पोर्टल व एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे.
राज्यात धो धो पाऊस कोसळणार,
पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची सक्रियता कायम आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही शेतीची कामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
एलजीबीटी समुदाय हा समाजाचाच भाग
मोहन भागवत यांचं मोठं विधान
मुंबईतील एका संवाद कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी समलैंगिक विवाहाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. एलजीबीटी समुदाय हा समाजाचाच भाग असल्याचे सांगत, समलैंगिक विवाहासाठी योग्य कायदेशीर चौकट आणि समाजाचे प्रबोधन आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. विवाहसंस्था केवळ दोन व्यक्तींसाठी नसून कुटुंब आणि पुढील पिढी घडवण्यासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाला शिक्षित करून आणि सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण करूनच अशा बदलांना स्वीकार्यता मिळू शकते, असे ते म्हणाले. तसेच लोकशाहीत आंदोलन हे संवादाचे माध्यम असून, मतभेदांवर चर्चा आणि सर्वसंमतीने तोडगा काढावा, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक,
महाराष्ट्रात राजकीय खळबळ Top 10 News :
नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित आणि त्यांच्या कुटुंबाबाबत कथित आक्षेपार्ह व जातिवाचक वक्तव्य असलेल्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर रोहन गावित यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चौधरी यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, हे ऑडिओ एआयच्या मदतीने बनावट तयार करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर,
‘हॅन्डलूम डे’ साजरा करण्याचा दिला संदेश
राष्ट्रीय हँडलूम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वदेशी आणि हँडलूम उत्पादनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. इंस्टाग्रामवरील एका रीलद्वारे त्यांनी 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी आंदोलनाची आठवण करून दिली. हँडलूम उत्पादने खरेदी करून विणकर कुटुंबांना आर्थिक बळ द्यावे, असे ते म्हणाले. तरुणांनी हँडलूमचे कपडे परिधान करून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करावेत, जेणेकरून अधिक लोकांना प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारतासाठी हँडलूम क्षेत्राला पाठबळ देणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
AI डीपफेकवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत काढावे लागणार
AI द्वारे तयार होणारे डीपफेक फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर नियम लागू केले आहेत. नव्या आयटी नियमांनुसार, बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह AI कंटेंटवर सोशल मीडिया कंपन्यांना 3 तासांच्या आत कारवाई करून तो हटवावा लागणार आहे. तसेच AI निर्मित कंटेंटवर स्पष्ट लेबल आणि मेटाडेटा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीपफेक, खोटी माहिती, बनावट ओळख, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारा कंटेंट यावर कठोर बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
‘युद्ध लवकरच संपणार
इराणबद्दल ट्रम्प यांचा धक्कादायक दावा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येऊ शकतो, असा दावा केला आहे. इराणला अण्वस्त्रे मिळू नयेत यासाठी महत्त्वपूर्ण मोहीम राबविल्याचे सांगताना त्यांनी युद्धाऐवजी राजनैतिक तोडग्याला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराच्या मसुद्यावर चर्चा प्रगत टप्प्यात असून कतारही मध्यस्थी करत आहे. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कायम असला तरी दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाच्या समाप्तीच्या शक्यता वाढल्या आहेत.
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा महामुकाबला!
महिला आशिया कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने
महिला आशिया कप 2026 मध्ये क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबल्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यूएईमध्ये 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताचा पहिला सामना 30 ऑगस्टला थायलंडविरुद्ध, तर 3 सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. आठ संघांच्या या टी-20 स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि यूएई सहभागी होणार आहेत.
‘गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?’
अभिनेत्री निकिता रावलची रणबीर कापुरवर टीका Top 10 News :
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. अभिनेत्री निकिता रावल हिने रणबीर कपूरवर टीका करत त्याने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. 2011 मधील एका मुलाखतीत रणबीरने गोमांस खात असल्याचे सांगितल्याचा संदर्भ देत, अशा व्यक्तीने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणे योग्य नसल्याचे तिने म्हटले. निकिताने ‘#BoycottRanbir’ मोहीम सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे. रणबीरने कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, त्याने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी तिने केली आहे.





