खरात प्रकरणी रुपाली चाकणकररांची ७ तास चौकशी Top 10 News : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी काल तब्बल 6 तास एसआयटीकडून चौकशी झाली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकरांची खरात प्रकरणी चौकशी केली. खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीत रुपाली चाकणकरांना तेजस्वी सातपुते यांनी धडाधड सवाल विचारले. माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते, असं रुपाली चाकणकर एसआयटीसमोर म्हणाल्या. माझे आणि अशोक खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नाही, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले. तसेच अशोक खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावाही रुपाली चाकणकरांनी केला. पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला पुण्यात ‘एमडी’ ड्रग्जचा कारखाना उघडण्याचा कट उधळण्यात आला आहे. सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. थेट ड्रग्स तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आठ आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि आलिशान मोटारी असा एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बिपिनकुमार पंडित हा सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्या मदतीने ग्रामीण भागात एमडी बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची या टोळीची तयारी होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त केले. पंतप्रधान मोदी- एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी वेळी पंतप्रधान यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या चर्चेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझ्यावर प्रेम आहे. मुंबईमध्ये हवामान खराब झाल्याने मला एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना हेलिकॉप्टर अचानक लँड करावे लागले होते. याबाबत मोदींनी विचारणा केली. त्यांना माझी काळजी वाटली म्हणून त्यांनी विचारपूस केली, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी आज सातारा दौऱ्यावर आले असता दिली. शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं डोंबिवलीत आन ठाकूर, मान ठाकूर शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसे नेते राजू पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना नाव न घेता टोला लगावला आहे. या कार्यक्रमाचे पाटील यांना निमंत्रण देण्यात आले होते मात्र ते गैरहजर राहिले. याविषयी बोलताना त्यांनी कार्यक्रमाला गैरहजर राहण्यामागचे कारणही स्पष्ट केले. मी देखील शौर्यगाथा कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र कार्यक्रमस्थळी सर्वत्र कमळाचे चिन्ह लावलेले दिसत होते. त्यामुळे तो एका पक्षाचा कार्यक्रम असल्याचे जाणवले आणि मी जाणे टाळले,असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान , त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून नेमकं काय उत्तर येतंय हे पाहणं गरजेचं आहे. सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलं. हैदराबादमधील एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल नरेंद्र मोदींनी मतं मांडली. त्यासोबतच वर्षभर परदेशी प्रवास टाळा, आपल्याला भविष्यात कच्च तेल आणि परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही, जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा असं त्यांनी म्हटलंय. त्यासोबतच नोकरदारवर्गाला वर्क फ्रॉम होम वर भर आणि ऑनलाईन बैठकांवर भर देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आलीय. एलपीजी सिलिंडरच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. सरकारन एक नवीन नियम लागू केलाय. गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर आता तात्काळ बदलता येणार नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांनी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी एक नवीन प्रणाली लागू केलीय. एलपीजी सिलिंडरच्या नव्या नियमानुसार, गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर लगेच बदलता येणार आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी ९० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आल्या आहेत.यामुळे बदल करणारी व्यक्ती खरीच आहे याची खात्री केली जाणार आहे. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हंताव्हायरसचा एमव्ही होंडियस क्रूझवर विळखा! जगावर पुन्हा एका नव्या व्हायरसचे संकट घोंघावत असतानाच एमव्ही होंडियस जहाजावरील कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन भारतीय कर्मचाऱ्यांना हंताव्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून त्यांना नेदरलँड्समध्ये हलवण्यात आले आहे. तिथे त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मॅड्रिडमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली असून जहाजावरील सर्व व्यक्ती रविवारी स्पेनमध्ये पोहोचले आहेत. “जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि स्पेनच्या अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार जहाजावरील प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिलीय. तसेच क्रू मेंबर म्हणून प्रवास करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना नेदरलँड्समध्ये हलवण्यात आले असून तिथे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.” म्यानमारच्या खाणीत गवसला मौल्यवान खडा म्यानमारमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर मंडाले प्रांतातील जगप्रसिद्ध ‘मोगोक’ भागात खाण कामगारांना मौल्यवान माणिक रत्न गवसलंय. हा खडा जगातील वजनाने सर्वात मोठा दुसरा माणिक ठरलाय. म्यानमारच्या लष्करी राजवटीचे प्रमुख आणि नुकतेच राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेले मिन आँग ह्लाइंग यांनी राजधानी नायपिडोच्या आपल्या कार्यालयात मंत्रिमंडळासह या दुर्मिळ खड्याची पाहणी केली.याचे वजन 11 हजार कॅरेट म्हणजेच 2.2 किलोग्रॅम असून या खड्याचा रंग जांभळा-लाल आणि पिवळसर छटा असलेला आहे, तर त्याची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची असून पारदर्शकता आणि चमक जास्त आहे. दरम्यान, 1996 मध्ये सापडलेला 21,450 कॅरेटचा म्हणजेच 4.29 किलो माणिक म्यानमारमधील सर्वात मोठा माणिक आहे. आरसीबीने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला रजत पाटीदारने मुंबईविरुद्धच्या थरारक विजयानंतर मोठं वक्तव्य करत आपल्या संघालाच आरसा दाखवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला असला, तरी “हा सामना जिंकण्यास आम्ही पात्र नव्हतो,” अशी प्रामाणिक कबुली त्याने दिली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 166 धावांचं आव्हान उभं केलं होतं. प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवातच खराबच झाली. विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला, तर अवघ्या २७ धावांत संघाने ३ विकेट्स गमावल्या. अशा बिकट परिस्थितीत कृणाल पांड्या संकटमोचक बनला. त्याने 73 धावांची तुफानी खेळी करत आरसीबीला पुन्हा सामन्यात आणलं आणि विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. अखेरच्या षटकात आरसीबीला 15 धावांची गरज होती. मात्र राज बावाला त्या धावा रोखता आल्या नाहीत आणि शेवटच्या चेंडूवर बंगळुरूने सामना खिशात घातला. ‘साऊथच्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये सन्मान मिळत नाही…’ तमिळ सिनेसृष्टीतीलअभिनेत्री सिमरननंबॉलिवूडमध्ये साऊथच्या कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी अगदी ठामपणे आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूडमध्ये साऊथ इंडस्ट्री आणि तिथल्या कलाकारांना जेवढा मान मिळायला हवा, तेवढा मान त्यांना दिला जात नाही. मी अनेकदा हिंदी सिनेमे नाकारले आहेत, कारण तिथल्या लोकांशी मला मनापासून जोडून घेता येत नाही. तिथे गेल्यावर असं वाटतं की, या लोकांनी आमचं काम पाहिलंच नाहीये किंवा त्यांना आमच्या योगदानाची काहीच कल्पना नाहीये. मी माझ्या आयुष्यातील अर्धा काळ सिनेसृष्टीला समर्पित केला आहे, आणि त्या समर्पणाच्या बदल्यात जर काहीच मान मिळत नसेल, तर ती गोष्ट खरोखरंच खूप वेदनादायी असते…”काही निर्मिती संस्था तर अगदी मूलभूत सुविधांच्या बाबतीतही घासाघीस करतात. राहण्याची सोय असो किंवा जेवणाची, अशा सुविधांसाठी सतत वाटाघाटी कराव्या लागणं, हा एक अत्यंत त्रासदायक अनुभव असतो…”असंही तिने म्हटलंय.