Top 10 News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान, शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार? आणि आणखी एका गायकाचा बॉलिवूडला रामराम, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय 'मास्टरस्ट्रोक' लगावला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान,
6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी
Top 10 News : राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ लगावला आहे. या अकरापैकी तब्बल सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. विधानपरिषदेच्या सहा बिनविरोध जागा वगळता आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार? (Top 10 News )
ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिल्याचं एकीकडे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे या राजकीय घडामोडीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहा खासदार नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला ठाम विश्वास आहे. सहापैकी दोन खासदारांची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळं त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं ते दोन खासदार आजच्या बैठकीला निश्चित येतील, असा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांचे सर्वच्या सर्व लोकसभा खासदारसोबत असल्याची अधिकृत माहिती नाही. पण त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून सहा खासदारांच्या स्वाक्षरी अधिकृत ठरल्यायत किंवा ओम बिर्ला यांना सहा खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं याबाबत अजूनही अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही. त्यामुळं आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंची सावध खेळी; (Top 10 News)
एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन टायगर फुलप्रूफ झालेले असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार 19 जूनला वर्धापनदिनी एकत्र दिसतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
बारामतीमध्ये एसटी बसला भीषण आग;
काही मिनिटांत फक्त सांगाडा शिल्लक राहिला
बारामती तालुक्यातील पणदरे खिंडीमध्ये निरा-बारामती दरम्यान धावणाऱ्या सीएनजी बसला अचानक भीषण आग लागली.ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस पणदरे खिंडीतून निरेकड़े जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. चालकाच्या आणि प्रवाशांच्या ही गोष्ट वेळेत लक्षात आल्यामुळे बस तातडीने थांबवण्यात आली. बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली.या भीषण आगीमध्ये एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. मात्र, सुदैवाने चालक, वाहक आणि सर्व प्रवाशांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
मुंबईत ‘अटलांटिक’ इमारतीत आग;
एकाचा होरपळून मृत्यू, २ जवान गंभीर Top 10 News :
बांद्रा (पश्चिम) येथील शेर्ली राजन रोडवरील ‘अटलांटिक’ इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू झाला असून, आग विझवताना दोन अग्निशमन जवान जखमी झाले आहेत. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९.१२ च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री ९.५५ वाजता ही लेव्हल-१ ची आग असल्याचे घोषित करण्यात आले.दरम्यानआग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान बांद्रा अग्निशमन केंद्राचे शिवशंकर भारत पुरी आणि नवनाथ मोहन बिटे हे दोन जवान धुरामुळे गुदमरल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.
पावसाची दडी, राज्यात उकाडा कायम राहणार
हवामान विभागाचा यलो अलर्ट
जून महिना निम्मा उलटूनही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मॉन्सूनच्या आगमनाची ओढ कायम आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाची दडी असल्याने चटका तापदायक ठरत आहे. आज राज्यात उष्ण हवामान आणि उकाडा कायम राहणार आहे. तसेच तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने राज्यात यलो अलर्ट हवामान विभागाने दिला. पावसाची दडी, तसेच पोषक प्रणाली अभावी नैॡत्य मॉन्सून अरबी समुद्रात अडखळले असून, महाराष्ट्रात आठ दिवसांपेक्षा अधिक काळ मॉन्सूनची प्रगती ठप्प आहे. त्यातच राज्यात पारा चाळिशीखाली आला असला, तरी उन्हाचा चटका कायम आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरतोय.
भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत..
.
मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन
फ्रान्समध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी भारताच्या समर्थनार्थ महत्वाचे विधान केले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाला तर अमेरिका भारताच्या मदतीसाठी त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहील, असा शब्द ट्रम्प यांनी दिला. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुकही केले. पंतप्रधान मोदी दिसायला अगदी शांत आहेत, पण चर्चा करताना ते कठोर असतात, असं ट्रम्प म्हणाले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. मोदी खूपच कठोर नेते आहेत, पण तितकेच चांगले देखील आहेत, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी ट्रम्प यांनी मोदींच्या स्वभावाचा उल्लेख केला. मी पंतप्रधान मोदींसारखा संयमी, शांत आणि जबरदस्त नाही. पण जरा त्यांच्याकडे बघा, असं ते म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगती करत राहणार आहे. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत भारत खूपच प्रगती करेल, असेही ट्रम्प म्हणाले.
अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण
दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर (एमओयू) औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून हा करार तात्काळ अंमलात आला आहे, अशी देखील माहिती आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात मॅक्रॉन यांच्यासोबतच्या चर्चे दरम्यान अमेरिका-इराण कराराच्या छापील प्रतीवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थ देशांना पाठवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, दोन्ही देशांचे वाटाघाटी करणारे संघ शुक्रवारी जिनिव्हा येथे एकत्र येणार आहेत.
वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा;
सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात
आयपीएल स्पर्धेत चमकलेल्या वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. भारत ए आणि श्रीलंक ए संघात दांबुला याठिकाणी १५ जून रोजी झालेल्या सामन्यात वैभवची कृती वादग्रस्त ठरली. या सीरीजमधील सामन्यात विशेन हलम्बगे आणि वैभव सूर्यवंशीमध्ये मोठा वाद झाला. मॅच रेफ्री प्रदीप जयप्रकाश यांनी वैभव सूर्यवंशीवर हलम्बगे याच्याशी वाद घालणे आणि मैदानात गोंधळ घातल्यप्रकरणी दोषी मानलं. विशेन हलम्बगे आणि वैभव सूर्यवंशीच्या सामन्याच्या मानधनातून दंड म्हणून ५० टक्के फीमध्ये कपात करण्यात आलीय . टीम इंडिया ए संघाचा कर्णधार तिलकच्या सामन्याच्या मानधनातून दंड म्हणून ३० टक्के कपात केली. तर श्रीलंका ए संघाचा विकेटकीपर निरोशन डिकवेलाच्या सामनाच्या मानधनातून २० टक्के कपात केली.
आणखी एका गायकाचा बॉलीवूडला रामराम ?
गूढ पोस्टमुळे चाहते पुरते हैराण Top 10 News :
प्रसिद्ध संगीतकारआणि गायक प्रीतम चक्रवर्ती सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या एका गूढ पोस्टमुळे चाहते पुरते हैराण झाले आहेत .14 जून रोजी आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त, प्रीतमनं इन्स्टाग्रामवर काही ब्लॅक-अँड-व्हाइट फोटो शेअर केलेत आणि त्यासोबतच बदलत्या प्राधान्यक्रमांविषयी आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली स्वप्न पूर्ण करण्याविषयी एक मेसेजही लिहिला. या संगीतकारानं निवृत्तीचा स्पष्ट उल्लेख केला नसला, तरी अनेक चाहत्यांनी त्याच्या या वक्तव्याचा अर्थ असा लावलाय की, ते कदाचित बॉलिवूड प्रकल्पांतून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा विचार करत असावेत. प्रीतम यांच्या त्या सविस्तर पोस्टमधील “वेगळ्या पद्धतीनं जगण्याला प्राधान्य देण्याबाबतच्या उल्लेखानं त्यांच्या निवृत्तीच्या अफवांना अधिकच बळ मिळालंय.





