Top 10 News : सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे ते राज्यात 4,943 अंगणवाडी पदांची मेगाभरती..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या…
Top 10 News : सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे ते राज्यात 4,943 अंगणवाडी पदांची मेगाभरती..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या...

Top 10 News : १) महाराष्ट्रासह २२ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील ७ दिवस मान्सून सक्रिय
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय. पुढील सहा ते सात दिवस उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून सक्रिय राहणार असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मंगळवार-बुधवारी मध्यम स्वरूपाचा, तर गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, पालघर आणि विशेषतः रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानातील काही भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केलेय. (Top 10 News)
२) राज्यात 4,943 अंगणवाडी पदांची मेगाभरती; आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू
महिला व बालविकास विभागामार्फत राज्यभरात 4,943 अंगणवाडी पदांसाठी मेगाभरती सुरू झालीय. या भरतीत 1,015 अंगणवाडी सेविका आणि 3,928 अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश असून, पात्र महिला उमेदवारांना 20 जुलै ते 31 जुलै 2026 दरम्यान अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या सेविकांना दरमहा 13,000, तर मदतनीसांना 7,500 रुपये मानधन दिले जाणार आहे. अर्जांची छाननी 3 ते 7 ऑगस्ट, गुणवत्ता यादी पडताळणी 10 ते 12 ऑगस्ट, हरकती 13 ते 26 ऑगस्ट दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून 27 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्तीपत्रे वितरित केली जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आलेय. (Top 10 News)
३) हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; ट्रेकिंगला गेलेले मालाडचे चार पर्यटक गंभीर जखमी
अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग करून परतणाऱ्या मुंबईतील मालाड येथील पर्यटकांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. पावसामुळे गड उतरत असताना अचानक माती आणि दगडांचा भाग कोसळल्याने चार जण गंभीर जखमी झाले. रेलिंगमुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदत करून जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यांच्यावर प्रथम राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारांसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींमध्ये रामप्रकाश यादव, निलेश विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश साहू यांचा समावेश असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलेय. (Top 10 News)
४) सोनम वांगचुक यांनी 22 दिवसांनंतर उपोषण सोडले; सरकारशी चर्चेनंतर मोठा निर्णय
पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी तब्बल 23 दिवसांचे आमरण उपोषण सोमवारी सोडले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. प्रकृती खालावल्यामुळे वांगचुक यांना 18 जुलै रोजी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे लेखी निवेदनही सादर केले. दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आपले उपोषण मागे घेतले. ‘चलो संसद’ आंदोलनाला हजारोंचा प्रतिसाद मिळाला होता. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठीचा लढा मात्र पुढेही सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. (Top 10 News)
५) त्रिपुराचे DGP अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू
त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनखड यांचा सोमवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह अगरतळा येथील राज्य पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळून आला. त्यांना तातडीने जी.बी. रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनंतर पोलीस मुख्यालयाचा परिसर सील करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा केले जात आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अनुराग धनखड हे 1994 बॅचचे IPS अधिकारी होते. त्यांनी 2025 मध्ये त्रिपुराचे DGP पद स्वीकारले होते आणि CBI मध्ये नीरव मोदी प्रकरण तसेच 1984 शीखविरोधी दंगलींच्या SIT तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Top 10 News)
६) अमेरिकेचे सलग नवव्या दिवशी इराणवर हवाई हल्ले
इराण आणि अमेरिकेतील संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिकेने सलग नवव्या दिवशी इराणवर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आलाय. हल्ल्यांदरम्यान चाबहार बंदर परिसरालाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिलीय. होर्मुज खाडीतील तणाव वाढल्याने व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून कच्च्या तेलाच्या किंमतींवरही त्याचा परिणाम होत आहे. भारतासाठी महत्त्वाचे असलेले चाबहार बंदर धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्याने या घडामोडींवर नवी दिल्लीचे बारकाईने लक्ष आहे. दरम्यान, होर्मुज खाडीतील वाहतूक विस्कळीत झाल्यास जागतिक पुरवठा साखळी आणि भारतातील इंधन दरांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (Top 10 News)
७) ऑगस्टमध्ये येणार दोन दमदार 7-सीटर SUV; महिंद्रा आणि MG सज्ज
ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय बाजारात दोन नवीन 7-सीटर एसयूव्ही दाखल होण्याची शक्यता असून ग्राहकांसाठी मोठी उत्सुकता निर्माण झालीय. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रीमियम इलेक्ट्रिक 7-सीटर एसयूव्ही सादर करू शकते. या मॉडेलमध्ये 69kWh बॅटरी, सुमारे 600 किमी रेंज, 12.8 इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS सारखी आधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, महिंद्रा 15 ऑगस्टच्या सुमारास Scorpio N फेसलिफ्ट सादर करू शकते. नव्या मॉडेलमध्ये अपडेटेड ग्रिल, बंपर, हेडलॅम्प्स, नवीन अलॉय व्हील्स आणि 10.25 इंच टचस्क्रीनसह सुधारित इंटिरियर मिळण्याची शक्यता आहे. इंजिन पर्याय मात्र सध्याच्या 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेलसह कायम राहण्याची अपेक्षा आहे. (Top 10 News)
८) Airtelचा 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन बंद; लाखो ग्राहकांना मोठा धक्का
देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत ₹549 चा लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन बंद केलाय. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपवरून हटवण्यात आला असून, त्याऐवजी आता थेट ₹699 चा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहे. ₹549 प्लॅनमध्ये अनलिमिटेड 4G/5G डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्याद कॉलिंग, दररोज 100 एसएमएस तसेच Airtel Xstream Play, Wynk Premium आणि Handset Protection यांसारखे फायदे मिळत होते. नव्या ₹699 प्लॅनमध्ये एक प्रायमरी आणि एक अॅड-ऑन अशा दोन सिमची सुविधा, अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जाते. त्यामुळे कमी किमतीचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. (Top 10 News)
९) “तो आधी माझा जिवलग मित्र”; गिरिजा ओकने सांगितलं सुखी संसाराचं रहस्य
अभिनेत्री गिरिजा ओक हिने पती आणि निर्माता सुहृद गोडबोले यांच्याबद्दल मनमोकळेपणाने बोलताना त्यांच्या यशस्वी वैवाहिक आयुष्याचं रहस्य उलगडलं. ती म्हणाली, सुहृद हा केवळ पती नसून तिचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि कोणत्याही नात्याचा पाया मैत्री, विश्वास व संवाद असतो. दोघांचं लग्न लहान वयात झाल्याने एकमेकांच्या स्वभावाची चांगली ओळख झाली आणि नातं अधिक घट्ट झालं. घरातील जबाबदाऱ्यांची समान वाटणी हेही त्यांच्या संसाराचं महत्त्वाचं सूत्र असल्याचं तिने सांगितलं. शूटिंग किंवा कामानिमित्त एक जण व्यस्त असला तरी दुसरा घराची जबाबदारी सांभाळतो. मतभेद आणि भांडणंही होतात, मात्र संवाद कायम ठेवणं हेच सुखी संसाराचं खरं गमक असल्याचं गिरिजाने स्पष्ट केलं. (Top 10 News)
१०) लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माचा टीकाकारांवर हल्लाबोल!
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत निसटत्या पराभवानंतरही रोहित शर्माने इतिहास रचला आहे. निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत रोहितने लॉर्ड्सवर शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. या खेळीनंतर बीसीसीआयच्या व्हिडिओमध्ये बोलताना रोहितने स्पष्ट केले की, “माझे लक्ष नेहमी मैदानावरील कामगिरीवरच असते, बाहेर कोण काय बोलतो याने मला फरक पडत नाही. पदार्पणापासून फॉर्म, कप्तानी आणि भविष्यावर प्रश्न उपस्थित केले गेले; पण मी या चर्चांना खेळावर वरचढ होऊ दिले नाही.” या वादळी शतकाने त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. (Top 10 News)





