Top 10 News : राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार ते ३८ जणांची फाशी कायम..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News :

Top 10 News : १) राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पालघर, रायगड, रोहा, सिंधुदुर्ग आणि चिपळूणमध्ये पूरस्थितीचा धोका कायम आहे. मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत आहेत. त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचा तात्पुरता भराव वाहून गेलाय. पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे घाट, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. (Top 10 News)
२) देहूत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रमुख उपस्थिती
देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृती, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगत संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्मरण केले. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह निवारा, वैद्यकीय सेवा, पाणी व इतर आवश्यक सुविधांची प्रशासनाने प्रभावी व्यवस्था केल्याची माहितीही त्यांनी घेतली. या पालखी प्रस्थान सोहळ्यास विविध लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मंदिर संस्थानचे पदाधिकारी तसेच हजारो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिरसाने भारावलेल्या वातावरणात पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला. (Top 10 News)
३) जयंत पाटील-तावडे भेटीने राजकीय चर्चा; महायुतीत जाणार? सुप्रिया सुळे, रोहित पवारांचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात मुंबईत झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. या भेटीत राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीची माहिती नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, राजकीय समित्यांमधून विविध पक्षांचे नेते नियमित भेटत असतात, त्यामुळे अशा भेटींना वेगळा अर्थ काढू नये. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही महायुतीत जाण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलेय. आम्ही भाजपविरोधात लढलेला पक्ष आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचे मान्य केले असले, तरी ती केवळ अनौपचारिक चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. (Top 10 News)
४) नवी मुंबईत भरधाव कारचा कहर; १० जणांना चिरडलं, २ ठार
नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-१० परिसरात मंगळवारी सकाळी भरधाव कारने भीषण अपघात घडवून आणला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील ८ ते १० नागरिकांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. (Top 10 News )
५) ना पेट्रोल, ना डिझेल, आता कचऱ्यावर धावणार बस; नितीन गडकरींची मोठी घोषणा
देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखलीय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यात दिल्लीतील बसेस म्युनिसिपल कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालवल्या जाणार असल्याची घोषणा केलीय. भाजपच्या युवा संमेलनात बोलताना त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून बायो-डायजेस्टर तंत्रज्ञानाद्वारे हायड्रोजन तयार करण्याचा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे सांगितले. दिल्लीतील लँडफिलमधून आतापर्यंत सुमारे 80 लाख टन कचरा हटवून त्याचा वापर एक्स्प्रेसवे उभारणीत करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 2027 पर्यंत देशातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात संपवण्याचे लक्ष्य असल्याचे गडकरी म्हणाले. या उपक्रमामुळे प्रदूषणात घट, इंधनावरील खर्चात बचत आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Top 10 News)
६) बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांची फाशी कायम; गुजरात हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
२००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय कायम ठेवत ३८ दोषींची फाशी आणि ११ जणांची जन्मठेप कायम ठेवली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर आणि २०२२ मधील विशेष न्यायालयाच्या निर्णयावरील अपीलांवर हा निकाल देण्यात आला. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये २२ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा मृत्यू, तर सुमारे २०० जण जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण ७७ आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी ४९ जण दोषी, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सरकारी पक्षाच्या मते, २००२ च्या गोध्रा-पश्चात दंगलींचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित आरोपींनी हा कट रचला होता. (Top 10 News)
७) सीरियात मॅक्रॉन यांच्या हॉटेलजवळ दोन स्फोट; राष्ट्राध्यक्ष सुरक्षित, खळबळ
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यादरम्यान दमास्कसमधील त्यांच्या वास्तव्यास असलेल्या ‘फोर सीझन्स’ हॉटेलजवळ दोन स्फोट झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडालीय. मॅक्रॉन हे त्यावेळी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांची राष्ट्राध्यक्ष भवनात भेट घेत होते. स्फोटानंतर घटनास्थळी धुराचे लोट दिसून आले. सीरियन सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट स्फोटकांमुळे झाले असल्याची प्राथमिक माहिती एका सुरक्षा अधिकाऱ्याने दिलीय. मात्र, या घटनेबाबत सीरियन अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सुदैवाने या स्फोटात इमॅन्युएल मॅक्रॉन सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. स्फोटामागील कारण आणि जबाबदार घटकांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केलाय. (Top 10 News)
८) फेरारीचा मोठा धमाका! 14 वर्षांनंतर मॅन्युअल सुपरकार लॉन्च; फक्त 1,499 जणांनाच संधी
इटलीची लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता फेरारीने तब्बल 14 वर्षांनंतर मॅन्युअल ड्रायव्हिंगचा अनुभव देणारी नवीन 12 Cilindri Manual Limited Edition सुपरकार सादर केलीय. कंपनी या कारच्या केवळ 1,499 युनिट्स तयार करणार असून तिची सुरुवातीची किंमत सुमारे 6.42 कोटी रुपये आहे. या सुपरकारमध्ये 6.5-लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड V12 पेट्रोल इंजिन असून ते 830 हॉर्सपॉवर आणि 678 Nm टॉर्क निर्माण करते. ‘मॅन्युअल बाय-वायर’ तंत्रज्ञानामुळे चालकाला पारंपरिक मॅन्युअल गिअरबॉक्ससारखा अनुभव मिळतो. ही कार अवघ्या 2.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते, तर तिचा टॉप स्पीड 340 किमी प्रतितास आहे. अॅल्युमिनियम फिनिश गिअर लिव्हर, रेसिंग सीट्स आणि तीन डिजिटल स्क्रीनसह आधुनिक तंत्रज्ञान व क्लासिक ड्रायव्हिंगचा उत्कृष्ट संगम या सुपरकारमध्ये पाहायला मिळतो.
९) ‘नावाला जागला, मिसिंग झाला’; मिसिंग लिंक दुर्घटनेवर हेमंत ढोमेचा टोला
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून संरक्षक भिंतीचा स्लॅब पुलावर पडल्याची घटना घडल्यानंतर अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय. सुदैवाने घटनेवेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत हेमंत ढोमेने केवळ चार शब्दांत, “नावाला जागला, मिसिंग झाला”, अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून अनेक नेटकऱ्यांनीही प्रकल्पाच्या दर्जा आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. (Top 10 News)
१ ०) अमिताभ बच्चन वादाच्या भोवऱ्यात ; फ्रान्सच्या फुटबॉल संघावर केली वर्णभेदी टीका
सध्या जगभरात ‘फिफा विश्वचषक २०२६’चा फिवर पाहायला मिळत असून ही स्पर्धा आता कमालीची रंगात आली आहे. यंदाच्या विश्वचषकात अनेक अनपेक्षित उलटफेर पाहायला मिळाले असून, छोट्या देशांनी दिग्गज संघांना धूळ चारली आहे. तर दुसरीकडे फ्रान्सच्या फुटबॉल संघावर केलेल्या एका वक्तव्यामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. “T 5794 – चला स्पष्टच बोलूयात, फ्रान्सचा विश्वचषक २०२६ फुटबॉल संघ… फ्रान्सचा संघ!! संघात ११ खेळाडू… १० कृष्णवर्णीय…!! १ गोरा!!? कृष्णवर्णीयांची ताकद (POWER of BLACK)…” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. (Top 10 News)





