Top 10 News : १) अशोक खरातचा आणखी एक नवा पॅटर्न समोर Top 10 News नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, आता त्याच्या कारवायांचा आणखी एक गंभीर पैलू उघड झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, खरात स्वतःला आध्यात्मिक शक्ती असलेला व्यक्ती म्हणून सादर करत लोकांचा विश्वास संपादन करत असे. वैयक्तिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली तो महिलांशी आणि पुरुषांशी जवळीक साधायचा. तसेच काही व्यक्तींना “उपचार” किंवा “ऊर्जा संतुलन”च्या नावाखाली एकमेकांशी संबंध ठेवण्यास प्रवृत्त करायचा. धक्कादायक बाब म्हणजे, हे संबंध गुप्तपणे रेकॉर्ड करून पुढे त्याच व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचेही आरोप समोर आलेत. तसेच, एका उद्योजकाला विवाहित महिलेशी संबंध ठेवण्यास प्रवृत्त करून, नंतर गर्भधारणेचे कारण पुढे करत मोठी रक्कम उकळल्याचा आरोपही समोर आलाय. या प्रकारामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनलंय. २) सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला Top 10 News राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांचा विवाह २० जूनला मुंबई येथे पार पडणार आहे. हा विवाहसोहळा अत्यंत शाही पद्धतीने होणार असून देशातील अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नानंतर मुंबई, नागपूर आणि दिल्ली येथे भव्य स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. सारंग लखानी हे उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र असून ते बॅडमिंटनपटूही आहेत. दरम्यान, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा विवाह ठरल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलीय. ३) “पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या” मुंबईत कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, आपण अजून किती खालच्या पातळीवर जाणार? जादूटोणा विरोधी कायदा असताना कायद्याचे रक्षण करणारेच अशा लोकांच्या नादी लागतात, हे चिंताजनक आहे. ठाकरेंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, “पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या,” असे स्पष्ट सांगितले. तसेच, कोणत्याही पक्षाशी संबंध असला तरी अशा भोंदूबाबांवर कठोर कारवाई व्हावी, असं त्यांनी ठामपणे नमूद केलंय. राज्यातील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी अधोरेखित केलंय. ४) महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता असून दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे: वैशाली नागवडे या पुण्यातील राष्ट्रवादीच्या सक्रिय नेत्या आहेत. महिला विभागात त्यांची मजबूत पकड असून विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्या चर्चेत असतात. तसेच प्रतिभा शिंदे या उत्तर महाराष्ट्रातील नेत्या आहेत. महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. या दोन्ही नावांवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असून लवकरच सरकारकडून नव्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. ५) वीज बिलाचा आकडा पाहून चहावाल्याने सोडला जीव उत्तर प्रदेशातील भरथना परिसरात धक्कादायक घटना घडलीय. चहाची टपरी चालवणारे शिवपाल यांचा अवाजवी वीज बिलामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. पूर्वी 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान येणारे वीज बिल ‘स्मार्ट मीटर’ बसवल्यानंतर अचानक वाढले. अवघ्या तीन महिन्यांत त्यांना तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले. हे बिल पाहून शिवपाल यांना मोठा धक्का बसला. त्यांनी वीज विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली नाही. या सततच्या तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट वीज विभागाच्या कार्यालयात ठेवून आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, स्मार्ट मीटरच्या अचूकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. ६) पीएम मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद साधला- अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पाझाश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. या संभाषणात पंतप्रधानांनी ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा देत मध्यपूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच तेल, वीज यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला. मोदी यांनी स्पष्ट केले की, जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित राहणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत समुद्री मार्गांवरील अडथळ्यांचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होऊ शकतो. याशिवाय, इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले. या संवादातून भारताने शांतता आणि स्थैर्याचा ठाम संदेश दिला आहे. ७) डिएगो गार्सियावर इराणचा मिसाईल हल्ला- मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होत असताना इराणने मोठी कारवाई केलीय. हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर, डिएगो गार्सिया येथे दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती समोर आलीय. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून डागण्यात आलेली दोन्ही क्षेपणास्त्रे लक्ष्यावर आदळली नसल्याचे सांगण्यात आलंय. डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ मानला जातो. या ठिकाणाहून बॉम्बर विमानांसह टँकर विमाने आणि टेहळणी विमाने ऑपरेट केली जातात. हा तळ इराणपासून हजारो किलोमीटर अंतरावर असूनही केलेला हा हल्ला हा मोठा धोरणात्मक इशारा मानला जातोय. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ८) सोने-चांदीच्या दरात पडझड- गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळालाय. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि MCX च्या आकडेवारीनुसार दरात लक्षणीय घट नोंदवली गेलीय. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,399 रुपयांवरून घसरत 1,47,218 रुपयांवर आला असून तब्बल 11,100 रुपयाची घसरण झालीय. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून ती 28,100 रुपयांनी कमी होत 2,32,362 रुपये प्रति किलोवर आलीय. जागतिक बाजारात COMEX वर सोनं 2.47 टक्क्याने घसरून 4,492 डॉलर प्रति औंसवर आले, तर चांदी 4.78 टक्के घसरलीय. तज्ज्ञांच्या मते, नफा वसुली, डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक धोरणांमुळे ही घसरण झालीय. मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भविष्यात पुन्हा दर वाढवू शकतात. ९) सलमानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं- बॉलिवूड अभिनेता सलमान याचा बहुचर्चित ‘मातृभूमी’ चित्रपट सध्या चर्चेत असतानाच त्याच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर आलीय. चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. या निर्णयामागे दुःखद कारण समोर आले असून, चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे प्रशांत तामांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण टीमवर शोककळा पसरली असून निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. हा चित्रपट याआधी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. आता तो स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, ‘मातृभूमी’ हा चित्रपट ‘गलवान संघर्ष’ या घटनेवर आधारित असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे. १०) KKR मेंटॉर ड्वेन ब्राव्होची जीभ घसरली- आयपीएल २०२६ पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) पत्रकार परिषदेत मेंटॉर ड्वेन ब्राव्हो एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलाय. माईक सुरू असल्याचे भान न राहिल्याने ब्राव्होने खासगी चर्चेदरम्यान महिलांबाबत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केलाय. “मला बोलावले तेव्हा घरी दोन ‘गर्लफ्रेंड’ होत्या,” असे विधान त्याने केलंय. त्याच्या शेजारी बसलेला कर्णधार अजिंक्य रहाणे याने तत्काळ माईक सुरू असल्याचे सांगत ब्राव्होला सावध केले. आपली चूक लक्षात येताच ब्राव्होने दिलगिरी व्यक्त केलीय. मात्र, सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. Top 10 News