Top 10 News : एसटी प्रवाशांना मोठा झटका ते ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका…; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या
Top 10 News : एसटी प्रवाशांना मोठा झटका ते ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका...; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या

Top 10 News : 1) फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? अकार्यक्षम मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता
केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महाराष्ट्रातही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील सुमार कामगिरी करणारे आणि वादग्रस्त ठरलेले काही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडू शकतात. काही बड्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील निर्णयाला वेग येण्याची शक्यता असून, कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
2) विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, अटकेची शक्यता
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुनेने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, एफआयआरमधील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने तातडीचा दिलासा देण्यास कारण नसल्याचे नमूद करण्यात आले. मुख्य जामीन अर्जावरील सुनावणी 23 जुलै रोजी होणार असून, तोपर्यंत पोलिसांना चौकशीसाठी कारवाई करण्यास अडथळा नाही. त्यामुळे सुनावणीपूर्वी कोणत्याही क्षणी विनायक राऊत यांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Top 10 News)
3) 48 हजार कोटींची थकीत वीजबिले माफ; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
राज्य सरकारने कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीजजोडण्यांची 48 हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची जुनी थकबाकी पूर्णपणे रद्द होणार असून वसुलीची भीतीही संपणार आहे. यापूर्वी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नसून शेतकरी हितासाठी घेतलाय. मात्र, कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसून शेती अधिक सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवरही सरकार भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Top 10 News)
4) समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; 25 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
बुलढाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार गट विकास अधिकारी संदीप मोरे यांना 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केलीय. शासकीय काम करून देण्यासाठी एका शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार मिळाल्यानंतर अमरावती एसीबीने सापळा रचून ही कारवाई केलीय. विशेष म्हणजे, संदीप मोरे यांना यापूर्वी ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यामुळे या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, राज्यभर एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू असून, काही दिवसांपूर्वी बीडमध्येही सहाय्यक निबंधकासह दोन जणांना 13 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. (Top 10 News)
5) एसटी प्रवाशांना मोठा झटका! पुन्हा भाडेवाढ होणार
राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला असून, परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी लागू करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ आज संपत असल्याने नव्या दरांची घोषणा होऊ शकते. तसेच, सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी तिकिटांचे दर पाच रुपयांच्या पटीत ठेवण्याचाही प्रस्ताव आहे. डिझेलचे वाढलेले दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ आणि बसच्या सुट्या भागांचा वाढलेला खर्च यामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नवीन भाडेदर तातडीने लागू होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
6) ईडीच्या नोटिसीनंतर ममतांना मोठा धक्का; विश्वासू नेते मदन मित्रांचा सर्व पदांचा राजीनामा
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. नगरपालिकेतील कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मदन मित्रा यांनी आपण पक्ष सोडलेला नसून “रूम बदलली आहे, खोली नाही,” असे म्हणत भूमिका स्पष्ट केलीय. त्यांनी पक्षातील नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका करत अभिषेक बॅनर्जी यांच्याभोवती पक्ष फिरत असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, ईडीने मित्रा यांच्या घरासह अनेक ठिकाणी छापे टाकले असून या घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. (Top 10 News)
7) होर्मुझमध्ये इराणचा भीषण हल्ला; पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू, 10 जण जखमी
अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव आणखी वाढलाय. इराणने दोन यूएई जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा करण्यात आला असून या घटनेत पुण्यातील मर्चंट नेव्ही इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झालेत. एमव्ही जीएफएस गॅलेक्सी या कंटेनर जहाजावर हल्ल्यानंतर 23 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली, मात्र हेरंब करमरकर यांना वाचवता आले नाही. यूएईने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचे म्हटलेय. तसेच अशा कारवायांना योग्य प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. या घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षा आणि जागतिक सागरी वाहतुकीबाबत चिंता वाढलीय. (Top 10 News)
8) जूनमध्ये Maruti Ertiga ठरली देशातील नंबर-1 MPV; Innova-Carens ला टाकले मागे
जून 2026 च्या MPV विक्री अहवालात Maruti Suzuki Ertiga ने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या महिन्यात अर्टिगाच्या 16,111 युनिट्सची विक्री झाली असून वार्षिक आधारावर 13.9 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. Toyota Innova 7,332 युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, मात्र तिच्या विक्रीत 16.7 टक्क्यांची घट झाली. Kia Carens Clavis 4,847 युनिट्ससह तिसऱ्या स्थानावर असून विक्रीत 38.8 टक्क्यांची घसरण झालीय. चौथ्या क्रमांकावर Maruti XL6 (2,711 युनिट्स) तर पाचव्या क्रमांकावर Toyota Rumion (2,376 युनिट्स) राहिली. परवडणारी किंमत, उत्तम मायलेज आणि विश्वासार्ह कामगिरीमुळे अर्टिगाने पुन्हा एकदा 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. (Top 10 News)
9) रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 192 देशांत धुमाकूळ
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने थिएटरनंतर आता ओटीटीवरही मोठी कामगिरी केलीय. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत हा चित्रपट 192 देशांमध्ये पाहिला जात असून नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या जागतिक यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. 26 जून 2026 रोजी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख तर जेनेलिया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. सुमारे 75 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही 130 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठे यश मिळवले आहे. (Top 10 News)
10) आयसीसीचा मोठा निर्णय; वनडे आणि टी-२० विश्वचषकाचे नियम बदलले!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष वनडे आणि टी-२० विश्वचषक स्पर्धांच्या स्वरूपात मोठे फेरबदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, १४ संघांच्या वनडे विश्वचषकात आता ‘सुपर ७’ हा नवा साखळी टप्पा असेल, ज्यामधून अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दुसरीकडे, टी-२० विश्वचषकात आता ‘सुपर १०’ टप्पा खेळवला जाईल. दोन्ही गटांतील अव्वल संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरतील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ‘क्रॉस-ओव्हर एलिमिनेटर’ सामना खेळावा लागेल. या बदलांमुळे स्पर्धेतील चुरस आणि उत्सुकता अधिक वाढणार आहे. (Top 10 News)





