राज्य, राष्ट्र आणि जगातील टॉप १० बातम्या ; वाचा फक्त एका क्लिकवर

…नाही तर निवडणुकाच रोखू – सुप्रीम कोर्ट
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू, असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलाय. आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केलाय. या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याने राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार आलीय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत ओबीसी प्रवर्गासाठी सरसकट 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे अनेक पालिकांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जातीय याकडे सुप्रीम कोर्टाचं याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलं. त्यावरूनच कोर्टाने राज्य सरकारला इशारा दिलाय.
==================
1800 कोटींचा जमीन घोटाळा होतो, पण -शर्मिला ठाकरे
मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता, लेकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आई शर्मिला ठाकरे यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी याविषयी बोलताना त्यांनी आता आपल्यावर कधी गुन्हा दाखल होतो याची आपण वाट पाहत असल्याचं म्हटलं. तसेच 1800 कोटींचा जमीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावरून टीका केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून धुळ खात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
==================
महायुतीची ‘कर्जव्याज परतावा’ योजनेची घोषणा
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. हाच मुहूर्त साधत राज्य सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी ‘कर्जव्याज परतावा’ योजनेची घोषणा केलीय. त्यानुसार या तिन्ही समाजातील निवडक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरवर्षी व्यवसाय आणि उद्योगासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडल्यास लाभार्थ्यांना व्याजाची रक्कम परत मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या या योजनेमुळे ब्राह्मण, राजपूत अन् आर्यवैश्य समाजातील तरुणांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
=======================
जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी होणार जाहीर ?
राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. याच निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची माहिती देण्यात आलीय. महसूल विभाग प्रशासनात मोठे बदल करण्यात आलेत. राज्यातील ११२ तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आलीय. अधिकारी रुजू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतीय. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर २०२५ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
==========================
पुणेकरांना भरली हुडहुडी
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झालीय. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमान कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीय. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झालीय. शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेमध्ये गारवा टिकून असल्याने पुणेकरांना हुडहुडी भरत आहे.
=================
दहशतवादी डॉ. उमर याचा नवीन व्हिडिओ समोर
दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात तपास यंत्रणांनी आणखी एक महत्त्वाचा पुरावा उघड केलाय. स्फोटातील मुख्य आरोपी दहशतवादी डॉ. उमरचा एक नवीन व्हिडिओ समोर आणलाय. या व्हिडिओत उमर थेट आत्मघाती बॉम्बस्फोटाचे समर्थन करत असल्याचे दिसून येतंय. समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी उमरने स्वतः हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ उमरच्या विचारसरणी, योजना आणि कट्टरपंथी विचारसरणीचे प्रतिबिंबित करतो असा दावा तपस पथकाने केलाय. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून तो बऱ्याच काळापासून अशा हल्ल्याची तयारी करत होता असं दिसून येतय.
====================
भारतातील ‘या’वस्तूंवरील 50 टक्के कर रद्द
अमेरिकेने कॉफी, चहा, मसाले, उष्णकटिबंधीय फळे आणि फळांचे रस यासारख्या भारतीय उत्पादनांवरील 50 टक्के परस्पर कर रद्द केला आहे. यामुळे सुमारे 1 अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹9,000 कोटी) किमतीच्या कृषी निर्यातीला मोठा दिलासा मिळेल. व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशाद्वारे ही सूट 12 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आणि 13 नोव्हेंबरपासून लागू झाली. अमेरिकेने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 50 टक्के कर लादला होता. मात्र अमेरिकेच्या या निर्णयाने भारताला मोठा दिलासा मिळणार आहे.
++++++++++++++++++++
शेख हसिनांच्या फाशीच्या शिक्षेवरून बांगलादेश हिंसाचार
बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, देशाच्या अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. शिक्षेनंतर रात्रभर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आतापर्यंत या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झालेत. ढाकामध्ये दंगलखोरांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच घर जाळण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शिवाय, शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर काही लोक मिठाई वाटत होते. यादरम्यान, दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
=======================
भारतासाठी आजची ‘करो या मरो’ची लढत
आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये पाकिस्तानने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. ग्रुप-बी मधून पाकिस्तानने सेमीफायनलची मजल मारलीय. मात्र दुसऱ्या सेमीफायनल स्लॉटसाठी तब्बल तीन संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावलय. भारत गुणांसहदुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमान आणि यूएई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. भारत आणि ओमान या दोन्ही संघांकडे समान प्रत्येकी 2 गुण आहेत. त्यात आज होणारा भारत-ओमान सामना दोन्ही संघांसाठी तो करो या मरो’ची लढत ठरणार आहे. भारत जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये जाईल. जर ओमान जिंकल्यास त्याचे सेमीफायनल तिकीट पक्के होईल. म्हणजे आजचा सामना दोन्ही संघांसाठी सर्वस्व पणाला लावण्यासारखा आहे.
================
अभिनेत्री ऐश्वर्या शर्माचे ट्रोलर्सला उत्तर
टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा ही सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या ती आणि तिचा नवरा निल भट्ट घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सगळीकडेच होताना दिसतायत. याच चर्चांना कंटाळून ऐश्वर्याने एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केलीय, ज्यामध्ये तिने तिला ट्रॉल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आपण कधीही कोणाला त्रास दिला नाही, आणि लोक माझ्याशी न बोलता मला जज करतायत असं तिनं म्हटलंय. त्यासोबतच आपण शांत आहोत म्हणून आपण चुकीचे आहोत असं नसल्याचंही तिने म्हटलंय. मात्र यातून या चर्चा खऱ्या आहेत कि खोट्या हे मात्र तिने स्पष्ट केलं नाही.

