आता होतेय टोमॅटोची चोरी.! ‘या’ राज्यात चक्क टॉमेटोने भरलेला ट्रक पळवला

बेंगळुरू – येथून जवळच असलेल्या चिक्काजाला येथे तीन जणांच्या टोळीने टोमॅटोने भरलेल्या ट्रकचे अपहरण करून पळ काढल्याची घटना घडली आहे. सध्या टोमॅटोच्या किंमती शंभरीच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे झालेल्या प्रकाराविषयी मोठीच चर्चा आहे. पळवून नेण्यात आलेल्या टॉमेटोची एकूण किंमत 2 लाख 70 हजार रूपये इतकी आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील शेतकरी मल्लेश शनिवारी कोलार येथे टोमॅटोची वाहतूक करत असताना ट्रकने चुकून आरोपी ज्या कारमध्ये प्रवास करत होते त्या कारला धडक दिली त्यात कारचा आरसा तुटला.
यानंतर आरोपींनी शेतकरी व त्यांच्या चालकाला शिवीगाळ करून भरपाई म्हणून मोठ्या रकमेची मागणी केली. दोघांकडे पैसे नसल्याने त्यांनी आरोपींशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी ट्रक जबरदस्तीने ताब्यात घेतला आणि तो पळवून नेला.





