Toll plaza : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना मोठा दिलासा; 1 नोव्हेंबरपासून वार्षिक पास
Toll plaza : टोल प्लाझापासून २० किमी परिसरात राहणाऱ्या पात्र खासगी वाहनधारकांना १ नोव्हेंबर २०२६ पासून वार्षिक टोल पास मिळणार. जाणून घ्या शुल्क आणि नियम.

Toll plaza : राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या पात्र खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने वार्षिक टोल पासची सुविधा जाहीर केली आहे. हा नवीन नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. पात्र वाहनधारकांना वार्षिक पाससाठी १,५०० किंवा ३,००० रुपये शुल्क द्यावे लागेल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. वारंवार टोल प्लाझातून ये-जा करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. मात्र, केवळ टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या अंतरात घर असणे पुरेसे नाही. वाहन आणि संबंधित टोल प्लाझा सरकारने ठरवलेल्या अटी पूर्ण करणारे असणे आवश्यक आहे.
कुठे किती शुल्क?
नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेर असलेल्या टोल प्लाझासाठी वार्षिक पासचे शुल्क १,५०० रुपये असेल. नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीत असलेल्या टोल प्लाझासाठी ३,००० रुपये शुल्क आकारले जाईल. हा पास केवळ संबंधित टोल प्लाझासाठी लागू असेल. त्यामुळे तो देशभरातील सर्व टोल प्लाझांवर वापरता येणार नाही.
कोणाला मिळणार पास?
या सुविधेचा लाभ पात्र खासगी आणि बिगर-व्यावसायिक वाहनधारकांना मिळेल. वाहनावर वैध आणि कार्यरत FASTag असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित वाहन आणि टोल प्लाझाने नियमांमधील इतर पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.
कुठे मिळणार नाही सुविधा?
टोल प्लाझाला जाण्यासाठी सेवा रस्ता किंवा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यासही या सवलतीचा लाभ मिळणार नाही.





