प्रकाश राज यांनी लगावला टोला; म्हणाले…, ‘तुम्ही या फाईल्सकडेही लक्ष द्याल का?’

मुंबई – नुकतंच प्रदर्शित झालेला विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट घेतली. आणि सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा असं सुद्धा सांगितलं आहे. सध्या सर्वच ठिकाणी या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. सिनेमामुळे देशातलं राजकारण, समाजकारण ढवळून निघालं आहे. ‘द कश्मीर फाईल्स’वर कौतुक आणि टीका दोन्हींचाही वर्षाव होत आहे.
दरम्यान, आता अभिनेते ‘प्रकाश राज’ यांनी सुद्धा या सिनेमावर भाष्य केलं आहे. प्रकाश राज यांनी एक ट्विट केलं असून या फोटोमध्ये गोध्रा हत्याकांड, दिल्ली दंगल, जीएसटी लागू केल्यावेळची आंदोलनं, नोटबंदीच्या वेळची परिस्थिती, कोविडच्या सुरुवातीच्या काळात मजुरांचं होणारं स्थलांतर, गंगेचं प्रदुषण या सगळ्याच्या फोटोंचं कोलाज केलेलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
Dear supreme Actor turned Producer.. will you arm twist these files too .. and release them #justasking pic.twitter.com/IuiEslWidB
— Prakash Raj (@prakashraaj) March 19, 2022
या ट्वीटमध्ये प्रकाश राज म्हणतात… ‘निर्माते झालेले प्रिय सर्वोच्च अभिनेते, तुम्ही या फाईल्सकडेही लक्ष द्याल का आणि तेही प्रदर्शित कराल का? प्रकाश राज हे देशातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर सातत्याने भाष्य करत असतात. आणि आता त्यांनी विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमावर भाष्य केलं आहे.





