Tokyo Olympics : महिला हॉकी संघाचा दारूण पराभव

टोकियो – भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी पुन्हा एकदा दारूण पराभव पत्करावा लागला. ग्रेट ब्रिटनने भारतीय महिला संघावर 4-1 अशी मात केली. या पराभवामुळे भारताच्या पदकाच्या आशांना धक्का लागला.
भारताच्या महिला संघाचा साखळी फेरीत स्थान मिळवण्याचा मार्ग आणखीनच कठीण झाला. आता भारतीय महिला संघाला त्यांचे पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. भारतीय संघाचे पुढील सामने आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहेत. आजच्या पराभवामुळे भारताच्या शर्मिला देवीने पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करत कमेव गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी हान मार्टीनने दोन तर लिली ओस्ले आणि ग्रेस बाल्सडोनने प्रत्येकी एक असे एकूण चार गोल नोंदवले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. सामना सुरू झाल्यानंतर 75 व्या सेकंदाला ग्रेट ब्रिटनने पहिला गोल केला. त्यानंतर भारताला गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्यात गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मार्टीनने संघासाठी दुसरा गोल केला. या गोलनंतर सहाव्या मिनिटामध्ये भारताने आपला सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. गुरजीत कौरने हा गोल केला.
सामन्याच्या उत्तरार्धामध्ये भारताला एकही गोल करता आला नाही.
तर ब्रिटनने एक गोल नोंदवत भारतावर 4-1 च्या फरकाने विजय मिळवला. यापूर्वी भारताला जर्मनीकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला. तर त्याआधी नेदरलॅंडने भारताला पराभूत केले होते. भारताचा सामना 30 जुलै रोजी आयर्लंडशी तर, 31 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. 2 ऑगस्टपासून बाद फेरी सुरू होणार आहे.





