टोकियो ऑलिम्पिक : भारतीय पथकाला आयनॉक्सचे प्रायोजकत्व

नवी दिल्ली – करोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असलेल्या भारतीय खेळाडूंना प्रसिद्ध आयनॉक्स समूहाने प्रायोजकत्व बहाल केले आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) दिली आहे.
मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांची साखळी असलेल्या या समूहाने प्रथमच क्रीडा स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिले आहे. करोनाचा धोका वाढल्याने यंदा जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेसाठी पुढील महिन्यापासून प्रमोशन कार्यक्रम होणार आहेत, अर्थात त्यापूर्वी देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये ऑलिम्पिकला पात्र ठरलेले खेळाडू सहभागी होतील, असेही संघटनेने सांगितले आहे.
2004 सालापासून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके पटकावली आहेत. त्यांना सहकार्य करत देशाच्या क्रीडाक्षेत्रात खेळाडूंनी यापेक्षाही सर्वोत्तम यश मिळवावे यासाठी हे प्रायोजकत्व देण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत समूहाचे संचालक सिद्धार्थ जैन यांनी सांगितले.





