Top 10 News : आणखी एक विमान अपघात ते समृद्धी महामार्गावर ९ दिवसांचा ब्लॉक..: वाचा आजच्या टॉप १० बातम्या एका क्लिकवर…
Top 10 News : आजच्या १० मोठ्या बातम्या: जिल्हा परिषदेचा उद्या निकाल, रशियन तेलाला कात्री आणि टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Top 10 News : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान संपन्न
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, राज्यभरात सरासरी ६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ७ हजार ४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतयंत्रात बंद झाले असून, उद्या सोमवारी (९ फेब्रुवारी) याचे निकाल जाहीर होतील. उद्या सकाळी १० वाजेपासून संबंधित तालुका मुख्यालयांत मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता असून, निकाल जाहीर होताच राज्यातील आचारसंहिता संपुष्टात येईल.
२) उद्धव ठाकरे भाजपसोबत, तर एकनाथ शिंदे पवारांबरोबर जाणार
महाराष्ट्राच्या राजकारणात 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल होण्याची शक्यता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलीय. सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना हाके यांनी खळबळजनक भाकीत केलंय. लक्ष्मण हाके यांच्या मते, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करू शकतात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करतील. सध्या सुरू असलेल्या पंचायत राज निवडणुकांतील युती-आघाड्यांमधून नवीन राजकीय ध्रुवीकरणाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत असल्याचे हाके म्हणालेत.
३) अजित पवारांच्या विमानात आत्मघाती बॉम्बर-अमोल मिटकरी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर शंका व्यक्त केलीय. त्यांनी अजित पवार यांच्या हत्येसाठी आत्मघातकी बॉम्बरचा वापर झाला असावा का? पायलट सुमित कपूर यांना संमोहित करण्यात आले होते का? असा सवाल उपस्थित केलाय. अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीचे पायलट दोन वेळा बदलण्यात आल्याचा आणि कंपनीवर आधीच बंदी असल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली.
४) समृद्धी महामार्गावर तब्बल ९ दिवसांचा ब्लॉक
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ९ दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारणीचे काम केले जाणार असून ९ ते १८ फेब्रुवारीदरम्यान २१ टप्प्यांत वाहतूक बंद राहील. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तसेच जालना तालुक्यात किमी ३०० ते ३६५ दरम्यान हे काम होणार आहे. प्रत्येक टप्प्यात ४५ ते ६० मिनिटांसाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाईल. या कालावधीत वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन MSRDC आणि वाहतूक प्रशासनाने केले आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते ठाणे दरम्यान १० जिल्हे थेट जोडले गेले आहेत.
५) संघाने आदेश दिल्यास पद सोडण्यास तयार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत झालेल्या संवाद कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या निवृत्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडलीय. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदावर न राहण्याचे संकेत असले तरी संघाने आपल्याला सक्रिय राहण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितलंय. संघ जेव्हा पदमुक्त होण्यास सांगेल, तेव्हा तात्काळ पायउतार होईन, मात्र कामातून निवृत्ती हा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. सरसंघचालक पदासाठी निवडणूक नसून प्रादेशिक व विभागीय प्रमुखांमार्फत सर्वोत्तम उमेदवाराची निवड होते, असंही त्यांनी नमूद केलंय. या पदासाठी ब्राह्मण असणे आवश्यक नाही, तसेच अनुसूचित जाती-जमातीचा असणे अपात्रता नाही, कोणताही हिंदू गुणवत्तेच्या जोरावर या पदापर्यंत पोहोचू शकतो, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
६) कर्नाटकमध्ये खासगी विमान कोसळले
कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यात रविवारी दुपारी एक खासगी मिनी विमान कोसळल्याची घटना घडलीय. बालेश्वर तालुक्यातील मंगलुरु गावाजवळ हे विमान मोकळ्या मैदानात क्रॅश झालंय. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने पायलट आणि दोन्ही प्रवासी सुरक्षित बचावले आहेत. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाने नियंत्रण गमावले आणि ते शेतात आदळले. जोरदार आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. विमान लोकवस्तीपासून दूर रिकाम्या मैदानात कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हे विमान कुठून कुठे जात होते आणि अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून केला जाणार आहे.
७) रशियाला मोठा आर्थिक फटका बसणार?
भारत-अमेरिका व्यापार करारानंतर रशियाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यताय. भारत आणि अमेरिका यांच्यातील करारानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केले असून भारतानेही व्यापार सवलती दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारत रशियाकडून तेल खरेदी हळूहळू कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. तेल कंपन्यांना अद्याप अधिकृत आदेश नसला तरी अनौपचारिकरित्या रशियन तेल खरेदी कमी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. एचपीसीएल, एमआरपीएल आणि एचएमईएल या कंपन्यांनी आधीच रशियाकडून तेल खरेदी थांबवलीय. लवकरच आयओसी आणि बीपीसीएल देखील हा मार्ग अवलंबण्याची शक्यताय. यामुळे रशियाच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
८) बॅालीवूडमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं
बॉलिवूडमध्ये प्रयोगशील चित्रपट तयार होत असल्याचे मत अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने व्यक्त केलंय. ‘गांधी टॉक्स’ या मूकपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने चित्रपटसृष्टीविषयी स्पष्टपणे भूमिका मांडलीय. प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध करावे लागते, असे सांगत मूकपटात काम करणे हे नेहमीचे स्वप्न होते, असं आदिती हिने म्हटलंय. संवादांशिवाय भावना व्यक्त करण्याची प्रक्रिया तिला विशेष आवडते, असंही तिने नमूद केलंय. मूकपटात देहबोली, डोळ्यांची भाषा आणि अंतर्मनातील भावना महत्त्वाच्या असतात. तसेच बॉलिवूडविषयी बोलताना, चांगले काम मिळाले तरच हिंदी चित्रपट करेन, असं आदितीने यावेळी स्पष्ट केलंय.
९) टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
टी२० विश्वचषक २०२६ च्या सुरुवातीला भारताने धमाकेदार पदार्पण केले आहे. मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेला पराभूत केले. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरलेल्या टीम इंडियाने या विजयासह केवळ स्पर्धेतील आपले अभियान यशस्वी सुरू केले नाही, तर टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एक अनोखा विक्रमही आपल्या नावे केलाय. भारत या स्पर्धेत सलग ९ सामने जिंकणारा जगातील पहिला संघ ठरलाय. या विजयापूर्वी, भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह पहिल्या संयुक्त स्थानावर होता, ज्यांनी प्रत्येकी सलग आठ सामने जिंकलेत.
१०) टीम इंडियाला आणखी एक धक्का
आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 ला सुरुवात झाली आहे. काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला. हा सामना जिंकून भारताने मोहिमेची विजयी सुरुवात केलीय. मात्र या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना अभिषेक शर्माची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी संजू सॅमसनने सबस्टिट्यूट फील्डर म्हणून क्षेत्ररक्षण केले. भारताचा पुढचा सामना १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापर्यंत अभिषेक फिट होतो का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.









