Ayush Mhatre Reaction on IND vs PAK Final : एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये खेळल्या गेलेल्या या विजेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानने भारताचा १९१ धावांनी एकतर्फी पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत ना गोलंदाजीत छाप पाडता आली, ना फलंदाजीत. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मोठी चूक – नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय फसला. भारतीय गोलंदाजांना त्यांच्या लाईन आणि लेंथवर नियंत्रण राखता आले नाही, ज्याचा फायदा घेत पाकिस्तानी फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. गोलंदाजीसोबतच भारताची क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले. अनेक महत्त्वाच्या क्षणी झेल सुटल्याने पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेनेही मान्य केले की, संघासाठी हा दिवस खराब होता आणि प्रतिस्पर्धी संघाने सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी केली. पराभवानंतर कर्णधाराची प्रतिक्रिया – सामन्यानंतर बोलताना आयुष म्हात्रे म्हणाला, ” आमचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता. मात्र, त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. आमच्यासाठी आजचा दिवस खराब होता. गोलंदाजांच्या कामगिरीत उणिवा होत्या आणि क्षेत्ररक्षणही म्हणावे तसे झाले नाही. क्रिकेटमध्ये असे घडते. ५० षटके फलंदाजी करण्याचा आमचा मानस होता, परंतु आम्ही त्यात अपयशी ठरलो. असे असले तरी, संपूर्ण स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी काही सकारात्मक गोष्टी दाखवल्या आहेत.” हेही वाचा – BCCI : भारतीय दृष्टीहीन महिला संघाचा BCCIकडून सत्कार! सचिव देवजित सैकिया यांनी केली मोठी घोषणा कर्णधार आयुष म्हात्रेची निराशाजनक कामगिरी – या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रे पुन्हा एकदा अपयशी ठरला. सलामीवीर म्हणून संपूर्ण स्पर्धेत झगडणाऱ्या म्हात्रेला अंतिम सामन्यात केवळ २ धावा करता आल्या. केवळ कर्णधारच नाही, तर इतर प्रमुख फलंदाजही दबावाखाली कोसळले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला आणि कोणतीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. हेही वाचा – Shubman Gill : गिलला टी-२० विश्वचषकातून डच्चू; संघ व्यवस्थापनाने दोन दिवस निर्णय ठेवला गुलदस्त्यात! आता लक्ष अंडर-१९ विश्वचषकावर – आशिया चषकातील पराभव विसरून आता भारतीय संघाचे लक्ष २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकावर असेल. या जागतिक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणारी ही मालिका तयारीसाठी शेवटची संधी असेल. त्यानंतर १५ जानेवारीपासून विश्वचषकाचा थरार सुरू होईल. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारख्या युवा खेळाडूंना या पराभवातून धडा घेत विश्वचषकात दमदार पुनरागमन करावे लागेल.