Today Top 10 News: 1. पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांची नावे गायब; मुंढवा जमीन गैरव्यवहारात तेजवानी आरोपी पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात १८८६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केलेय. मात्र, या आरोपपत्रात केवळ शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले असून, चर्चेत असलेले पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे गायब असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात. या दोन्ही नेत्यांना तुर्तास मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात असले, तरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. ‘हा न्याय नसून न्यायाची थट्टा आहे,’ अशी टीका करत त्यांनी तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार अवैध ठरवलेला असताना बड्या व्यक्तींना क्लिन चिट कशी मिळते, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. 2. ‘बैठकीला नव्हते, त्यांना काय माहिती?’; फडणवीसांच्या दाव्यावर शरद पवारांचा पलटवार दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय. १७ जानेवारी रोजी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावताना, अशी कोणतीही चर्चा झाली असती तर अजितदादांनी नक्कीच सांगितले असते, असे म्हटले होते. यावर शरद पवारांनी उत्तर दिलेय. “जे चर्चेला उपस्थितच नव्हते, त्यांना बैठकीतील तपशिल कसा माहीत असणार?” असा सवाल करत पवारांनी फडणवीसांचा दावा खोडून काढला. दरम्यान, पवार मंगळवारी दिल्लीला रवाना होत असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 3. मुंबई-पुणे अंतर 48 मिनिटांत पार होणार; पुणे-हैदराबाद अवघ्या 2 तासांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात देशातील आठ प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केलीये. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे ही दोन आर्थिक केंद्रे एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. मुंबई-पुणे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल. तसेच पुणे ते हैदराबाद हा प्रवासही आता केवळ १ तास ५५ मिनिटांत पूर्ण होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, या ४००० किमी लांबीच्या जाळ्यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारत वेगवान कनेक्टिव्हिटीने जोडला जाणार आहे. या प्रकल्पात १६ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर प्रादेशिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळेल. 4. राहुल गांधींचे ‘डोकलाम’वरून खळबळजनक विधान; सत्ताधारी आक्रमक, कामकाज तहकूब लोकसभेत सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाम मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधींनी दावा केला की, डोकलाममध्ये चार चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले होते. या विधानावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र आक्षेप घेतला. राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला जात आहे ते अद्याप प्रकाशित झालेले नाही, त्यामुळे पुराव्याशिवाय असे दावे करणे चुकीचे आहे. सभापती ओम बिर्ला यांनीही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत राहुल गांधींना रोखले. या वादामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले आणि अखेर मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले. 5. प्रिंस अँड्र्यू पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; लैंगिक शोषणाचे नवे आरोप prince Andrew ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य प्रिंस अँड्र्यू यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. अमेरिकन फायनान्सर जेफ्री एपस्टीन प्रकरणातील एका महिलेने अँड्र्यू यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडालीय. २०१० मध्ये आपल्याला लैंगिक संबंधांसाठी लंडनला पाठवण्यात आले होते आणि विंडर इस्टेटमध्ये अँड्र्यू यांच्यासोबत रात्र घालवण्यास भाग पाडले, असा दावा पीडितेने केलाय. संबंधित महिलेने आता कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली असून, या घटनेनंतर तिला बकिंघम पॅलेसची सफरही घडवण्यात आली होती, असे तिच्या वकिलांनी सांगितले. अमेरिकन न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि ईमेल्स समोर आल्याने ब्रिटनमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंतप्रधान कीर स्टारमर यांनी अँड्र्यू यांना अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष देण्याचे आवाहन केलेय. 6. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 4 दिवसांत चांदी 2 लाखांनी स्वस्त गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक उच्चांकावर असलेल्या सोन्या-चांदीच्या किमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळतेय. देशांतर्गत बाजारपेठेत चांदीच्या दरात अवघ्या चार दिवसांत सुमारे १,९४,२४३ रुपयांची मोठी घट झाली असून, उच्चांकावरून चांदी ४६ टक्क्यांनी खाली आली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी ५० डॉलरने घसरली असून सोन्याच्या किमतीतही २४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आलीये. जागतिक स्तरावर डॉलरची मजबूती आणि गुंतवणूकदारांकडून झालेली नफावसुली यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही अल्पकालीन घसरण असली तरी, पुरवठ्यातील टंचाई आणि जागतिक अनिश्चितता पाहता दीर्घकाळात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 7. विना डाय पांढरे केस पुन्हा काळे करा; शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण दावा बदलती जीवनशैली आणि वाढत्या मानसिक तणावामुळे आजकाल लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागतेय. मात्र, आता शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक शोध लावला असून, विना डाय केस पुन्हा काळे करणे शक्य असल्याचे म्हटलेय. केसांचा रंग हा ‘मेलानिन’ पिगमेंटवर अवलंबून असतो, ज्याची निर्मिती मेलानोसाइट पेशी करतात. संशोधनानुसार, जेव्हा आपण अतिशय तणावात असतो, तेव्हा शरीरात ‘नॉरपेनेफ्रिन’ हार्मोन तयार होऊन रंगद्रव्य तयार करणाऱ्या स्टेम सेल्सना हानी पोहोचवते. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तींनी आपला मानसिक ताण कमी केला किंवा सुट्ट्यांमध्ये निवांत वेळ घालवला, त्यांच्या केसांचा मूळ रंग नैसर्गिकरित्या परत आल्याचे दिसून आलेय. जर केस केवळ तणावामुळे पांढरे झाले असतील, तर पुरेशी झोप, सकस आहार आणि तणावमुक्तीद्वारे ते पुन्हा काळे होऊ शकतात, असा दावा या संशोधनात करण्यात आलाय. 8. 5G असूनही इंटरनेट स्लो चालतंय? करा हे छोटे बदल! तुमच्या फोनवर ५जी नेटवर्कचे सिग्नल दिसत असूनही इंटरनेट स्लो चालत असेल, तर काळजी करू नका. अनेकदा काही सोप्या सेटिंग्स बदलल्या की हा प्रॉब्लेम सुटू शकतो. सर्वात आधी तुमच्या फोनमधील ‘VPN’ सेटिंग बंद आहे ना, याची खात्री करा, कारण यामुळे स्पीड कमी होऊ शकतो. जर इंटरनेट अडकत असेल, तर फोन एकदा ‘एअरप्लेन मोड’वर टाकून १० सेकंदांनी पुन्हा चालू करा; यामुळे नेटवर्क रिफ्रेश होते. तसेच, मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क मोड ‘5G/4G/3G (Auto)’ वर ठेवा, जेणेकरून फोन योग्य सिग्नल पकडू शकेल. तुमचा फोन नेहमी अपडेट ठेवा, कारण सॉफ्टवेअर अपडेटमुळे नेटवर्कची रेंज सुधारते. जर या कशानेच फरक पडत नसेल, तर कदाचित तुमचे सिमकार्ड जुने असू शकते, अशा वेळी कंपनीकडून नवीन सिम घेणे फायद्याचे ठरते. या साध्या ट्रिक्स वापरून तुम्ही ५जी च्या सुपरफास्ट स्पीडचा आनंद घेऊ शकता. 9. रश्मिका-विजयच्या लग्नाची चर्चा ठरली अफवा; २ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीने सोडले मौन दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. २ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये हे जोडपे गुपचुप लग्न करणार असल्याचा दावा एका व्हिडिओद्वारे करण्यात आला होता. मात्र, आता स्वतः रश्मिकाने या चर्चांवर अधिकृत प्रतिक्रिया देत या सर्व बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. एका पोर्टलशी बोलताना तिने लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे सांगत या वृत्ताला ‘बिनबुडाचे’ ठरवले. रश्मिकाच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा पडली असली, तरी सोशल मीडियावर आता लग्नाची नवी तारीख म्हणून २६ फेब्रुवारीची चर्चा सुरू झालीय. यापूर्वी २०१७ मध्ये रश्मिकाचा रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता, जो काही कारणास्तव मोडला. सध्या रश्मिका आणि विजयने त्यांच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही. 10. T20 वर्ल्ड कप: सराव सामन्यांसाठी ‘इंडिया ए’ जाहीर; आयुष बडोनीकडे नेतृत्व! तिलक वर्माचे पुनरागमन 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी बीसीसीआयने दोन सराव सामन्यांसाठी १५ सदस्यीय ‘इंडिया ए’ संघाची घोषणा केलीये. युवा फलंदाज आयुष बडोनी याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली असून, दुखापतीतून सावरलेल्या तिलक वर्माचे संघात पुनरागमन झालेय. वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे अष्टपैलू रियान परागलाही आपली छाप पाडण्याची मोठी संधी मिळालीय. भारतीय संघ एकूण तीन सराव सामने खेळणार असून, त्यातील ४ फेब्रुवारीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना मुख्य संघ खेळेल, तर २ आणि ६ फेब्रुवारीच्या सामन्यात ‘इंडिया ए’ संघ मैदानात उतरेल.