भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रातील आज दुसरा दिवस; राहुल गांधींची ‘या’ ठिकाणी होणार सभा

Bharat Jodo Yatra| राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारनंतर आता ही यात्रा आज धुळे, मालेगावमध्ये धडकणार आहे. मालेगावत दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे, त्यानंतर त्यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे. यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी ज्या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा तेथील कामाचा आढावा घेतला.
राहुल गांधी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचा धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा येथून मनोहर टॉकीजपर्यंत जुना आग्रा रोड मार्गे रोड शो होणार आहे. त्याचबरोबर धुळे शहरातील मनोहर टॉकीजजवळ असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहुल गांधी यांची सभा देखील होणार आहे.
त्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थित महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या महिला मेळाव्या दरम्यान राहुल गांधी तेथील जनतेशी संवाद साधणार आहे. धुळेमार्गे यात्रा बुधवारी (ता. १३) दुपारी अडीच ते तीनदरम्यान मालेगावला येणार आहे. झोडगे गावाजवळ यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर राहुल गांधी मालेगावजवळच्या सौंदाणे गावात मुक्काम करतील.
महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 14 मार्चला शरद पवार राहुल गांधींना भेटणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत भव्य सभेनं समारोप होणार आहे. राहुल गांधींची मुंबईतील शिवाजी पार्क येथे भव्य सभा पार पडणार आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे 17 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपवेळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा घेतली जाणार आहे. यानिमित्त मोठे शक्ति प्रदर्शन महाविकास आघाडीकडून होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
Rashmika Mandanna । रश्मिका मंदान्नाच्या ‘पिंक टोपी’ने उघड केले तिचे नाते!





